दादा कोंडके- अशोक सराफ जोडीच्या भांडणात बाळासाहेबांना पुढाकार घ्यावा लागला होता.

महाराष्ट्रात रडक्या चित्रपटांचा ट्रेंड बंद करून दादा कोंडके नावाच्या माणसाने कॉमेडी चित्रपटांचा धुरळा उडवून दिला होता. माहेरच्या साडीला क्रॉस म्हणून त्यांनी सासरचं धोतर नावाचा चित्रपट काढलेला. अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले.  दादा कोंडके यांच्यासोबत जोडी जमली ती अशोक सराफांची.

आता अशोक सराफ म्हणजे काय चीज आहे हे सांगायला नको. म्हणजे आज मार्केटमध्ये जे मीम फिरतात त्यातले निम्म्याहून अधिक हे अशोक सराफांच्या पात्रांशी रिलेटेड असतात. ‘ माझा बायको पार्वती ‘ असो किंवा ‘ अतिसामान्य ‘ अनेक डायलॉग आणि डान्सवर अशोक सराफांचा एक युनिकनेस अगदी वठलेला आहे. शनिवार-रविवार त्यांच्या चित्रपटांची वाट पाहणारी पिढी आजही अशोक सराफांचे चित्रपट आवर्जून बघते.

आता मेन विषयावर येऊ. पांडू हवालदार नावाचा ब्लॉकबस्टर चित्रपट दादांनी बनवलेला. यात सखाराम हवालदाराच्या भूमिकेत होते अशोक सराफ. अशोक सराफ हे नाव त्यावेळी नाटकात गाजत होतं. एका नाटकातील अशोक सराफांचा अभिनय बघून दादांनी त्यांना चित्रपटासाठी साइन केलं.

जिथं लोकं आपलं सगळं आयुष्य स्टारडम मिळवण्यात घालवतात ते स्टारडम अशोक सराफांनी पांडू हवालदार मधील अभिनयाच्या जोरावर केवळ तीन तासात मिळवलं होतं. दादा कोंडकेंसोबत त्यांच्या ट्युनिंगबद्दल बरीच तारीफ झाली होती. त्यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांमधून धमाल उडवणार असं चित्र दिसत होतं.

दादा कोंडकेंनी अशोक सराफांना सुरवातीला बरीच मदत केली. दादांना अशोक सराफांचा अभिनय खूप आवडायचा. पांडू हवालदार चित्रपटात दादा लीड हिरो असूनही त्यांनी अशोक सराफांना जास्तीचे सीन दिले होते. सेटवर अशोक मामांचा सीन चांगला झाल्यावर दादा म्हणायचे, व्वा अशोक, टॉप हं…!

अरुण कर्नाटकी यांनी दादांना विचारलं कि चित्रपटाचे हिरो तुम्ही असून अशोकचे सीन जास्त का ? त्यावर दादा म्हणाले अरे असू दे, हशा घेतो ना तो. अन माझी गाणी नाहीएत का ? सीनचा प्रश्न येतोच कुठं ? तो चांगलं काम करतोय ना मग काय बिघडलं.

चित्रपटाचं यश बघून दादांना वाटलं होत कि लॉरेल अँड हार्डीची जशी जोडी होती तशी हि अशोक सराफांसोबत आपली जोडी होईल. राम राम गंगाराम चित्रपटानंतर दादा आणि अशोक सराफांमध्ये काहीतरी बिनसलं. अशोक सराफ दादा कोंडकेंसोबत काम करायला तयार होईना. त्यावेळी हि कॉंट्रोव्हर्सी चांगलीच गाजली.

आता त्यावेळी अशी बोंब उठली होती कि अशोक सराफांच्या अभिनयाने दादा कोंडकेंचं वजन कमी केलं किंवा दादांना सराफ वरचढ ठरले वैगरे. त्यामुळे दादांनी अशोक सराफांना काम देणं बंद केलं. पण दादा कोंडके आपल्या आत्मचरित्रात म्हणतात कि,

टीका करणारे मात्र हे विसरले होते कि अशोक माझ्यापेक्षा सरस ठरला काय किंवा मी हलका पडलो काय निर्माता मीच होतो.

त्याचं काम चांगलं झाल्यामुळे चित्रपट हिट ठरला तर आर्थिकदृष्टया त्याचा मलाच फायदा होणार होता. मग मी त्याला कशाला बाहेर काढू ?

हे प्रकरण बराच काळ चर्चेत राहिलं. तेरे मेरे बीच में हा दादांचा हिंदी चित्रपट होता यात अमजद खानला बघून बाळासाहेब ठाकरेंनी दादांना विचारलं होत कि, तुम्ही अशोकला न घेता त्या मुसड्याला घेतलंत ? दादांनी बाळासाहेबांना सांगितलं कि अशोकलाच चित्रपटात घेणार होतो पण त्याने नाही म्हणून सांगितलं. तुम्ही त्याला माझ्यासमोर बोलवा आणि विचारा ?

बाळासाहेबांनी लगेच अशोक सराफांना फोन केला पण ते तेव्हा उपलब्ध नव्हते. नंतर एका कार्यक्रमाप्रसंगी दादा कोंडके आणि बाळासाहेब, अशोक सराफ एकत्र आले तेव्हा बाळासाहेबांनी अशोक सराफांना विचारलं कि दादांनी तुला चित्रपटासाठी फोन करूनही तू गेला नाहीस ? त्यावेळी अशोक सराफांनी नाटकाच्या दौऱ्यात बिझी असल्याने जाता आलं नाही म्हणून सांगितलं.

अशोक सराफांच्या पांडू हवालदार चित्रपटातल्या भूमिकेने भाव वधारला होता. त्यामुळे ते सतत व्यस्त होते. हिरो म्हणून अशोक सराफ नावाजले जाऊ लागले होते. दादा कोंडके आणि अशोक सराफ हि एकेकाळची पडद्यावर कहर करणारी जोडी परत एकत्र कधी दिसलीच नाही.

पण पांडू हवालदार आणि राम राम गंगाराम हे दोन चित्रपट दादा कोंडके आणि अशोक सराफांनी तुफ्फान हाऊसफुल्ल केले होते.

संदर्भ :एकटा जीव- दादा कोंडके

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.