दादा कोंडकेंच्या कुठल्याही गाण्याचं रेकॉर्डिंग शालिनीताईं शिवाय व्हायचंच नाही

दादा कोंडके म्हंटल कि, आपल्या समोर खळखळून हसवणारा एक दिग्गज अभिनेता समोर येतो. ज्यांनी अनेक सुपर-डुपरहिट चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिले. आजही  त्यांच्या अभिनयाची तितकीच चर्चा होते. इंडस्ट्रीमधला एक ऑलराउंडर म्हणून त्यांची ओळख.

पण यासोबतच राजकारणात सुद्धा त्यांनी तशी ओळख तयार केलेली. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये दादा कोंडके यांचं नाव आजही घेतलं जात. त्यांनी कधी दुसऱ्या पक्षाची वाट धरण्याचा साधा विचार सुद्धा केला नाही. पण शिवसेनेत असून सुद्धा काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यांसोबत त्यांचे अगदी घरगुती संबंध होते.

ते नेते म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील.

वसंतदादा पाटील मुळात साधे सरळ माणूस. मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांनी कधी ना कोणाला कमी लेखलं ना जास्त. आपल्या घरात निवांत बसलेलं असताना सुद्धा कोणीही दारावर मदतीसाठी आलं, कि त्याला रिकाम्या हातानी पाठवायचं नाहीचं, हे जसं काय दादांनी  कोरूनच घेतलं होत.

म्हणजे अगदी शेतात मोटार नाही, पैश्यांची अडचण आहे दादा, अमुक- तमुक असे साधे प्रश्न घेऊन सुद्धा कोणी त्यांच्याकडे आलं तरी ते कोणाला नाही म्हणायचे नाही. 

आणि त्यांच्यातली सगळ्यांना भावणारी गोष्ट म्हणजे नेता किंवा कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो वसंतदादांसोबत त्यांचे मैत्रीचेच संबंध असायचे. कधी त्यांनी कोणाशी दुजाभाव केला नाही. यातलचं एक नाव दादा कोंडके.

वसंतदादांशी पाटील आणि दादा कोंडके यांचे फार घरगुती संबंध. एवढे की बाबूराव गौड यांच्यापेक्षा दादां कोंडके वसंतदादांना जवळचे  वाटायचे. अगदी घरातलाचं माणूस.

दादा कोंडके शालिनीताईंना आपली बहीण मानायचे. शालिनीताईसुद्धा त्यांच्यावर भावासारखं प्रेम करायच्या. हे नातं इतकं जिव्हाळ्याचं होत कि, दादा कोंडकेंच्या प्रत्येक चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मुहूर्त शालिनीताईंच्या हस्ते व्हायचा. म्हणजे पार ‘सोंगाड्या’पासून. आणि चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळीदादा कोंडके ताईंना आवर्जून साडी द्यायचेचं.

दादा कोंडके आणि सुषमा शिरोमणी दोघे पूर्वी दादांच्या घरी नेहमी जायचे. सुषमाचंसुद्धा पाटील दाम्पत्याकडे येणं-जाणं असायचं. त्यावेळी वसंतदादा मुख्यमंत्री असल्याकारणाने पैशांची कमतरता नव्हती. या पैशातल्या नव्याकोन्या नोटा दादा कोंडके आणि सुषमा शिरोमणी मोजायचे. पैसे मोजायला बसले कि दोघ सोबत एक मोठं पाण्याचं पातेलं घेऊन बसायचे. त्यांची  बोटं दुखायची नोटा मोजता मोजता.

त्यावेळी दादा कोंडकेंकडे फार पैसाही नव्हता. पण आपल्या चांगल्या संबंधाचा त्यांची कधी फायदा म्हणून वसंतदादांकडे पैसे मागितले नाहीत.

पण ‘सोंगाड्या’च्या टायमाला कोहिनूरच्या मालकाने मोठा गोंधळ केलेला. या अवघड परिस्थितीत दादा कोंडके सगळ्यात आधी गेले  वसंतदादांकडेच. ते केवळ त्यांच्या जवळचे होते म्हणून नाही. पण  त्या वेळी परिस्थितीच तशी गंभीर होती आणि वसंतदादा मंत्री होते म्हणूनच वसंतदादांशिवाय दादा कोंडकेंना दुसरा कुठला चेहरा दिसला नव्हता. 

कारणही तसंच होत कारण वसंतदादा -शालिनीताई दादा कोंडके यांना घरच्या सदस्याप्रमाणे वागवायचे. वसंतदादांकडे अनेक क्षेत्रांतील दिग्गज मंडळी यायची, त्यांच्या अनेक सिक्रेट मीटिंग व्हायच्या. आणि दादा कोंडके दुसऱ्या पक्षातले असून सुद्धा या सिक्रेट मिटींगचे साक्षीदार असायचे.

कारण दादांना खात्री होती कि दादा कोंडकेकुठल्या गोष्टीची बाहेर वाच्यता करणारा माणूस नाही, एवढंच काय बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा काही बोलणार नाही. आणि त्यामुळंच वसंतदादांनी दादा कोंडके यांना कधी म्हंटल नाही कि, शिवसेनेशी किंवा बाळासाहेब ठाकरेंशी संबंध सोड.

उलट वसंतदादा कोंडकेना नेहमी सांगायचे, “दादा, शिवसेना सोडायची नाही. बाळासाहेबांशी चांगले संबंध ठेव.”

वर्षानुवर्षे दादा कोंडके शालिनीताईंकडे भाऊबीजेला जायचे. कित्येक वर्षे दादा कोंडके सगळ्यात आधी शालिनीताईंकडेचं जायचे.  आणि मग आपल्या सख्ख्या बहिणींकडे. पण जेव्हा वसंतदादा गेले तेव्हापासून दादा कोंडके यांनी मात्र पाटील घराण्याकडे पाठ केली.

संदर्भ : दादा कोंडके यांचं आत्मचरित्र ‘एकटा जीव’

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.