ते सेन्सॉर बोर्ड नसून ‘ शेणसार बोर्ड ‘ आहे म्हणून दादा कोंडकेंनी वाभाडे काढले होते.

दादा कोंडके यांचे चित्रपट हे गाण्यांनी आणि विनोदी भाषेने परिपूर्ण असायचे. मराठी भाषेचं सौंदर्य कुणाला कळलं असेल तर ते दादा कोंडकेंना. चित्रपटाची गाणी आणि कथा स्वतः ते लिहायचे त्यामुळे रसिकांची मागणी आणि कुठल्या शब्दाने पंच निर्माण होईल याचं पूर्ण नॉलेज त्यांना होतं.

सेन्सॉर बोर्डाशी दादा कोंडकेंचं कधीच पटलं नाही. सेन्सर बोर्ड बऱ्याचदा त्यांच्या चित्रपटातल्या एखाद्या सीनला किंवा गाण्याच्या ओळीला कात्री लावायचे हा प्रकार दादांना खटकू लागला होता त्यामुळे ते स्वतः सेन्सॉरच्या ऑफिसला जात आणि तिथे बसून ती ओळ कशी बरोबर आहे हे तिथल्या अधिकाऱ्यांना पटवून द्यायचे.

दादा कोंडकेंनी लिहिल्या एकटा जीव या आत्मचरित्रात त्यांनी सेन्सॉर बोर्डला शेणसार बोर्ड म्हणून वाभाडे काढले होते, दादांचं ट्युनिंग मात्र सेन्सॉर बोर्डच्या लोकांशी चांगलंच जमलं होत. पण खटके मात्र प्रचंड उडायचे.

पहिला खटका उडाला तो सोंगाड्या चित्रपटाच्या वेळी. या संपूर्ण चित्रपटात कुठेही अश्लील शब्द दादांनी टाकलेला नव्हता. हा सगळं चित्रपट भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केला असल्याने त्यात डबल मिनिंग वगैरे असं काहीच नव्हतं. चित्रपट सेन्सॉरला गेला तेव्हा माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी या गाण्याच्या अंतऱ्यातील  अंघोळीला बसले , माझं मलाच येई हसू गं या ओळीवर सेन्सॉरने आक्षेप घेतला.

सेन्सॉर अधिकाऱ्यांनी दादांना विचारलं ” हि बाई एकटीच अंघोळ करताना का हसलीय ?

दादांचं डोकं सणकलं. या ओळीत काहीच अश्लीलता नव्हती. दादांनी त्यांना म्हटलं,

मुळात एका सभ्य बाईच्या बाथरूममध्ये तुम्ही डोकावता का ? हि कविकल्पना आहे.

सेन्सर बोर्डवर तेव्हा शांताबाई शेळके, अपर्णा मोहिले, वंदना विटणकर अशा मातब्बर महिला होत्या पण दादा या सगळ्यांना भरपूर हसवायचे आणि त्यांच्याशी वादही घालून पिच्चर सहीसलामत सोडवून घ्यायचे.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटात एक गाणं होतं ‘ चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी ‘. या गाण्याची एक ओळ अशी होती कि तुला पाहून माझी कळी लई खुलते . सेन्सॉरने कळी हा शब्द कट मारायला लावला. दादा म्हणाले कि उलट हा सॉफ्ट शब्द मी टाकलाय. तुला पाहून माझा कळा लई खुलतो हे असं टाकलं तर ते घाणेरडं वाटलं असतं.

फुलाची कळी असाच शब्द ओरिजनल आहे, कळा नाही हे दादांनी त्यांना पटवून दिलं. सेन्सॉरवाले म्हणाले हो पण बाईची कळी खुलते ना ? यावर दादा म्हणाले मग काय पुरुषांचा कळा खुलतो का ? ठीक आहे मी कळा शब्द घेतो . यावर वंदना विटणकर यांनी सांगितलं कि नको कळी हाच शब्द ठीक आहे, कळा जरा डायरेक्ट वाटतो.

दादांचे या लोकांशी बरेच वाद चालायचे आणि ते मजेशीर असायचे. शांता शेळकेंसोबत त्यांचा वाद थेट शब्दकोशापर्यंत गेला होता. मारणे, घासणे, काढणे, घालणे, करणे अशा अनेक शब्दांना पर्यायी शब्द मराठी शब्दकोशात नाही हे दादांनी शांता शेळकेंना दाखवून दिलं होतं. 

दादा कोंडके म्हणायचे कि सेन्सॉर बोर्डामुळे आर्थिक फटका बसतोच पण वेळही फार जायचा. एकतर सेन्सर बोर्डवर सगळ्या रिटायर्ड मास्तरणी असायच्या आणि त्या चर्चा प्रचंड खोलवर घेऊन जायच्या. सेन्सॉर मेंबर पैकी एका महिलेने दादांना विचारले कि,

दादा तुम्ही मुळात चावट आहात कि आता चावट झालाय ?

यावर दादासुद्धा वात्रट उत्तर द्यायचे ,

म्हणजे काय ? खरं म्हणजे माझ्या आई वडिलांनी चावटपणा केला म्हणून मी निर्माण झालो यात माझा काय दोष ?

काही तरीच बोलू नका ओ ? दादा गंमत करण्यासाठी विचारायचे,

मला एक सांगा बाई तुम्हाला किती मुलं आहेत ?

तीन मुलगे , दोन मुली .

मग ती काय चावटपणा केल्याशिवाय झाली का ? कानातून , नाकातून झाली आहेत का ?  दादांच्या या उत्तरावर या बायका पोटधरून हसायच्या.

दादांना या सेन्सॉरमुळे प्रचंड फायदा व्हायचा. चित्रपट चर्चेत राहिल्याने भरपूर चालायचे. व्यावसायिकदृष्ट्या हि फायदेशीर बाब होती.  दादा या सेन्सॉर बोर्डच्या महिलांना प्रचंड हुशार आणि बुद्धिमान समजत असे कारण त्या तार्किक वाद घालत आणि दादांना त्यांच्याशी चर्चा करताना मजा येत असे.

मुका घ्या मुका या दादांच्या चित्रपटाला जेव्हा सेन्सॉरचा एकही कट लागला नव्हता तेव्हा दादांनी तो चित्रपट पुन्हा सेन्सॉरला पाठवला होता कि नीट चेक करा म्हणून.

ग्रामीण भागात त्यांचे चित्रपट हिट व्हायचे, शहरातील पांढरपेशी लोकं त्यांच्या चित्रपटाला नावं ठेवायची. अश्लीलता हा गावाकडे विरंगुळा म्हणून वापरला जातो तर शहरात त्याला नाकं मुरडली जातात. पण दादांनी नाव ठेवणाऱ्या सगळ्यांना फाट्यावर मारून मराठी भाषेचं सौंदर्य आणि तीच व्यापक रूपही लोकांपर्यंत पोहचवलं.  

दादांना मराठी भाषा वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते हे सूत्र माहिती झालं होतं. दादा कोंडकेंचे चित्रपट अश्लील आणि डबल मिनिंग असतात असं सेन्सॉरने त्यांना बदनाम केलं होतं पण दादा याविषयी बोलताना आपल्या आत्मचरित्रात लिहितात कि,

पैशासाठी किती नागडं व्हायचं हे मलाही माहिती आहे, मलाही माझ्या मर्यादा कळतात. त्या मर्यादा सांभाळूनच आजपर्यंत मी चित्रपट बनवत आलोय !

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.