त्या सिनेमानंतर मराठी सिनेमाला सर्वात सुपरहिट जोडी मिळाली

जेव्हा तुम्ही कलाकार असता तेव्हा अभिनय क्षेत्रात, खूप वेळेस तत्वांना मुरड घालून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. अभिनय शिकणं आणि कॅमेरासमोर आत्मविश्वासाने उभं राहून अभिनय करणं, यात खूप मोठा फरक आहे.

खूपदा आपण मनात काहीतरी गोष्टी गृहीत धरून एखाद्या क्षेत्रात काम करायला सुरुवात करतो. पण जेव्हा आपण त्या क्षेत्राचा जवळून अनुभव घेतो तेव्हा गोष्टी कल्पनेपेक्षा किती वेगळ्या असतात याची जाणीव होते.

असाच काहीसा अनुभव आला होता उषा चव्हाण यांना.

दादा कोंडके त्यांच्या पायाला स्पर्श करणार तोच त्यांनी नकार दिला. असं का झालं होतं??

तेव्हा जयश्री गडकर सारख्या मोठ्या अभिनेत्रीच्या तमाशापटांची मराठी सिनेमात चलती होती. या अभिनेत्रीच्या नृत्यावर सर्वजण फिदा होते. सिनेमांमध्ये जेव्हा जयश्री गडकर नृत्य करायच्या तेव्हा त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून उषा चव्हाण काही गाण्यांमध्ये दिसल्या होत्या.

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचणारी मुलगी पुढे सिनेमात प्रमुख भूमिका करेल याची खुद्द, तिलाही कल्पना नव्हती.

उषा चव्हाण यांचा जन्म पुण्यातला. १७ ऑक्टोबर १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून स्वतःच्या वेगळ्या दुनियेत उषा चव्हाण रममाण असायच्या. शाळेसमोर असलेल्या ‘आर्यन टॉकीज’च्या बाहेर पोस्टरकडे उषा एकटक पाहत राहायची.

‘कधीतरी आपण सुद्धा असेच भल्यामोठ्या पोस्टरवर दिसू’,

असं स्वप्न ती त्यावेळी पाहत असावी. लहानपणापासून गणेशोत्सवामध्ये असलेल्या सांस्कृतीक समारंभात गाणी गाणं, नृत्य सादर करणं ही तिची विशेष आवड. त्यामुळे अभ्यासापेक्षा अशा वेगळ्या गोष्टींमध्येच उषाचं मन रमत होतं.

अखेर उषाचं स्वप्न पूर्ण झालं. १९६५ साली आलेल्या अनंत माने यांच्या ‘केला इशारा जाता जाता’ या सिनेमात उषा झळकली.

लीला गांधी, अरुण सरनाईक या मोठ्या नटांसोबत उषाने काम केलं. ज्या आर्यन टॉकीजच्या बाहेर ती इतर सिनेमाचे पोस्टर बघायची त्या आर्यन टॉकीजच्या बाहेर आज तिच्या सिनेमाचं पोस्टर झळकलं होतं.

याआधी १९६४ साली आलेल्या ‘सवाल माझा ऐका’ या सिनेमात ‘सोळावं वरीस धोक्याचं’ या गाण्यामध्ये उषा चव्हाण यांनी जयश्री गडकर यांच्यासोबत नृत्य केले. हे गाणं तुफान लोकप्रिय झालं.

या सिनेमामुळे जयश्री गडकर यांची उषा चव्हाण वर विशेष माया जडली.

उषा चव्हाण यांच्या घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे मिळेल त्या सिनेमात काम करून पैसे कमावणं, हे उषा चव्हाण यांचं उद्दिष्ट होतं. म्हणून वयाच्या केवळ १८ व्या वर्षी चंद्रकांत मांढरे यांच्यासोबत ‘आई उदे ग अंबाबाई’ या सिनेमात एक अतिशय गरीब, रापलेल्या बाईची भूमिका त्यांनी केली.

प्रसिद्धी जरी भरपूर मिळत असली तरी हवं तसं आर्थिक यश उषा चव्हाण यांना मिळत नव्हतं. त्यामुळे ऐन तरुणपणात त्यांनी ही भूमिका स्वीकारली.

या प्रवासात उषा चव्हाण यांना दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी मार्गदर्शन केलं.

उषामध्ये असलेला न्यूनगंड, आत्मविश्वासाची कमतरता या अनेक गुणांवर मात करण्यासाठी भालजींनी उषाला अनेक गोष्टींची शिकवण दिली. सिनेमांच्या प्रवासात उषा चव्हाण यांना एक अवलिया माणूस भेटला, तो म्हणजे दादा कोंडके.

हा किस्सा ‘सोंगाड्या’ सिनेमावेळचा..

कोल्हापूरच्या ‘जयप्रभा स्टुडिओ’मध्ये ‘सोंगाड्या’ सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. गोविंद कुलकर्णी सिनेमाचे दिग्दर्शक तर दादा कोंडके यांनी स्वतः हा सिनेमा लिहिला होता. सिनेमातील एक सीन असा होता की…

उषा चव्हाण यांच्या पायात खिळा अडकतो आणि उषाच्या पायात अडकलेला खिळा दादा काढतात.

परंतु उषा काही केल्या दादा कोंडके यांना पायाला हात लावून देईना.

यामुळे सिनेमाचं शूटिंग लांबत चाललं होतं. दादा कोंडकेंना काय करावं कळेना, त्यांनी भालजी पेंढारकर यांना ही गोष्ट सांगितली.

भालजी पेंढारकर यांनी उषाला बोलवलं.

“हे बघ उषा, काय असेल ते स्पष्टपणे सांग. मी काय तुला खाणार नाही. पण उगाच शूटिंगचा खोळंबा करू नकोस. काय झालं ते मला नीट सांग !”

भालजी पेंढारकर यांनी शांतपणे उषाला विचारलं.

“दादा कोंडके एवढे मोठे नट आहेत. मी त्यांना माझ्या पायाला हात कसा लावू देऊ. मला ही गोष्ट पटत नाहीय”

उषाने मनमोकळेपणाने भालजींना स्वतःची अडचण सांगितली.

भालजींनी उषाचं म्हणणं ऐकून शांतपणे तिला समजावलं आणि म्हणाले,

“भिकाऱ्याची भूमिका असल्यावर तू शालू नेसशील का? भीक मागणं आवडत नाही म्हणून भीक कशी मागू असं म्हणणार का? हे बघ उषा… दादा या सिनेमात तुझे नायक आहेत. त्यांना काही गोष्टी करणं भाग आहे. त्यामुळे मोठेपणाचं अंतर बाजूला ठेव आणि त्यांच्याकडे फक्त एक सोंगाड्या म्हणून बघ आणि हा सीन पूर्ण कर.”

उषाला भालजींचं हे म्हणणं पटलं आणि त्या सीन करण्यास तयार झाल्या.

‘सोंगाड्या’ सुपरडुपर हिट झाला. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे. दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीने अनेक हिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले.

उषा चव्हाण यांच्या सिनेकारकिर्दीत भालजी पेंढारकर यांनी वेळोवेळी उषाला मार्गदर्शन केलं. एखादी कलाकृती सादर करताना काही वेळेस स्वतःची तत्व बाजूला ठेवून न पटणाऱ्या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात, हे उषाला कळालं. बॅकग्राऊंड डान्सर ते सिनेमातली हिरोईन हा उषा चव्हाण यांचा प्रवास नक्कीच विलक्षण म्हणावा लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.