आपलीच माणसं सोडून जातात तेव्हा कस उभारायचं ते दादा पॅटर्न शिकवतो..!!!

सत्ता क्रूर असते. ती निर्दयी असते. ती आपल्या माणसांना तोडते. मग ती राज्याची सत्ता असो की आपल्या घरात कुटूंबप्रमुख होणारी सत्ता असो. सत्ता ही सत्ता असते… 

गोष्ट आहे इतिहासातली, 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडायचा होता. रिगल सिनेमाच्या समोर असणाऱ्या जून्या विधानभवनात कॉंग्रेसपक्षाकडून विधिमंडळ नेता निवडण्याची प्रक्रिया पार पडत होती. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणारा नेता अर्थात वसंतदादा पाटलांची विधिमंडळ नेता म्हणून निवड झाली, अर्थात ते मुख्यमंत्री होणार होते. यावेळी प्रचंड गर्दी होती..

या गर्दी भावी मुख्यमंत्री होणाऱ्या वसंतदादांची चप्पल छातीला कवटाळून एकजण उभा राहिला…

तर मावळते मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना आपलं चप्पल सापडत नव्हतं.. 

राज्यात आत्ता वसंतदादा पाटलांच सरकार सत्तेत आलं होतं. दादा मुख्यमंत्री होते. दादांकडे सत्ता होती. तेव्हा शरद पवार दादांना सोडून गेले. शरद पवार म्हणजे दादांसाठी आपला माणूस. आपण घडवलेला, बळ दिलेला माणूस. यशवंतराव चव्हाणांची या बंडाला मुकसंमती होती अशा चर्चा आजही चालतात. चव्हाण साहेब देखील दादांसाठी आपले माणूस. अगदी हक्काचा माणूस. पण साहेब देखील सोबत नव्हते… 

विधानसभेत कपातप्रस्ताव आणण्यात आला. चार मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि दादांच सरकार कोसळलं. दादांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. कालपर्यन्त असणारं वलय गेलं आत्ता आजूबाजूला राहिली ती फक्त शांतता.. 

या काळात नेमकं काय झालं, दादा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे झाले आपल्या माणसांना त्यांनी कसं माफ केलं हेच सांगणारी गोष्ट म्हणजे दादा पॅटर्न…

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर वसंतदादा विधानसभेच्या लॉबीत एकटेच बसून रहायचे. राज्यात पुलोदचं सरकार होतं. या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते. दादांच सरकार पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि पक्षनेते यांचाच शपथविधी पार पडलेला. मात्र इतर मंत्री अजून ठरायचे होते. पवारांच्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा होती.. 

याच दरम्यान एकटे दादा आपली काठी घेवून लॉबीतल्या बाकड्यावर बसून रहायचे. कालपरवा पर्यन्त दादांनी फक्त नजर टाकावी यासाठी पुढंमागं करणारे आमदार दादांची नजर टाळायचे. का तर दादांसोबत दिसलं तर संभाव्य मंत्रीपद जाईल. दादांनी एखाद्याला हाक मारलीच तर पाणी पिवून आलो अस कारण सांगून आमदार पळ काढायचे..

सत्ता काय असते तर ही असते सत्ता, जी गेल्यावर कळते. कालपर्यन्त हांजी हांजी करणारे आज साधी ओळखही दाखवत नाहीत हे दादांना या काळात कळून चुकलं. पण दादा घरात बसून राहिले नाहीत. ते विधीमंडळात येत गेले. या काळात त्यांच्यासोबत असायची ती फक्त त्यांची काठी..

पुढे सांगली लोकसभेच्या मध्यावधी निवडणूकीत ते खासदार झाले, पक्षाने त्यांना सरचिटणीस करून महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेरच ठेवण्याचे प्रयत्न केले. पण वसंतदादा या काळात एक गोष्ट करत राहिले अन् ते म्हणजे पुन्हा परत येण्याची.. 

मधल्या काळात पुलोद गेलं, अंतुले आले..अंतुले गेले..बाबासाहेब भोसले आले..

या काळात वसंतदादांना जाणिव झाली ती पुन्हा मुख्यमंत्री होण्याची..

राज्यात चर्चा होवू लागल्या वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री होतील. या काळात वसंतदादा पण अंदाज घेत होते. त्यांनी दिल्लीत भेटलेल्या कुमार सप्तर्षींना वाऱ्याचा अंदाज विचारला, तेव्हा त्यांनी अंतुलेंचा प्रभाव आमदारांवर असल्याचं सांगितलं या भेटीत दादा सप्तर्षींना एक वाक्य बोललेले ते म्हणालेल,

आमच्यात म्हणजे मराठ्यांच्यात सत्तापद हीच एकमेव प्रतिष्ठा असते… 

बऱ्याच अडचणींचा सामना करून दादा पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण पुन्हा सत्तेवर येवून प्रश्न मिटत नसतो. दादांच्या अखेरीच्या काळात दादा म्हणाले होते, कॉंग्रेसने शरद पवारांच नेतृत्व मान्य करायला हवं. अन् त्याचं कारण त्यांनी दिलेलं माझ्या पश्चात माझा गट म्हणून शरद बरोबर भांडण काढत बसू नये. बेरजेचं राजकारण आणि सत्तेचं राजकारण दादांनी ओळखलं होतं.

दादांना वाईट वाटलं नसेल का? कालचा मुख्यमंत्री आज लॉबीत एकटा बसून राहतो, दादा एकटे कसे बसून राहत असतील. या काळात दादांना परत उभारी कशी मिळाली असेल. वेळ घेवून एका दिशेनं काम करत ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पण अखेरच्या काळात त्यांनी शरद पवारांना माफ केलं का? चव्हाण साहेबांना माफ केलं का? तर आपल्या माणसांसाठी त्यांनी माफ केलं.

सत्ता मिळवणं, ती टिकवणं, माणसं उभी करणं या सगळ्यात वाईट वाटणं, लोकं सोडून जाणं या गोष्टी देखील येतात. मग ते आपल्या घराचं राजकारण असो, भावकीचं असो की मुख्यमंत्र्यांच असो. माणूस म्हणून जगण्याचं बळ देणारा आणि लावून धरायला शिकवणारा हा दादा पॅटर्न प्रत्येकाला कळावा.. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.