वस्त्यांची नावे बदलण्याचा जाहीर सल्ला कोल्हापूरात ९२ वर्षांपूर्वीच दिला होता

राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता जातींऐवजी या वस्त्यांना महापुरूषांची नाव देण्यात येणार आहेत.
त्यामुळे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली अशी नाव जाऊन आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर अशी किंवा अश्या नव्या ओळखी या वस्त्यांना मिळतील. 
पण अशा प्रकारचा निर्णय करण्याचा जाहीर सल्ला आजपासून ९२ वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील दलितमित्र, जेष्ठ समाजसुधारक आणि ‘गरूड’कार दादासाहेब तथा दा. म. शिर्के यांनी कोल्हापूर म्युनिसिपालिटीला दिला होता. 
दादासाहेब शिर्के हे कट्टर आंबेडकरवादी व्यक्तिमत्त्व. कोल्हापुरातील दलित चळवळीतील एक महत्त्वाचं नाव. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन त्यांनी हयातभर परिवर्तनाच्या चळवळीला स्वतःला वाहून घेतलेले. पुढे सार्वत्रिक निवडणुकीत ते दलितांमधील पहिले आमदार म्हणूनही निवडून आले होते. 
दादासाहेबांनी आपल्या ‘गरुड’ साप्ताहिकाद्वारे १९२६ ते ७६ अशी पाच दशके जी हक्काची लढाई केली त्याला इतिहासात तोड नाही. दलितांसाठी क्रेडिट सोसायटी स्थापून त्यांना आर्थिक उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी  त्यांनी दलितांना केलेले साहाय्य, मिस क्लार्क बोर्डिंगच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात यासाठी सर्वार्थाने त्यांचे नाव घ्यावे लागते. 
दादासाहेब हे हाडाचे पत्रकार. पण त्यांनी बॅरिस्टर होऊन आपल्या समाजाची सेवा करावी असे छ. शाहू महाराजांना वाटत होते. महाराजांनी तास विचार देखील त्यांना बोलून दाखवला. पण दादासाहेबांची नाखुषी पाहून महाराजांनी कारण विचारले असता ते म्हणाले,
“मला माझ्या समाजासाठी पत्रकार व्हायचे आहे मला पत्रकार करा महाराज” 

समाजामध्ये वेगळी वाट चालणार हा तरुण पत्रकारितेचे शिक्षण घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी ‘गरुड’ साप्ताहिक काढून त्याचे संपादक झाले. त्यातून दलितांचे देखील न्याय्य हक्क असतात हे ठणकावून सांगितले.

दादासाहेबांची लेखणी कोल्हापूरमधील अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर चालायची.

एक दिवस त्यांनी वस्त्यांच्या नावांवरील मुद्द्यावर लिखाण केले. २८ जून १९२८च्या ‘गरूड’च्या अंकात एक महत्त्वाची सूचना ‘कोल्हापूर म्युनिसिपालिटीस सूचना’ या शीर्षकाखाली केली होती.
त्यात, पालिकेने ठिकठिकाणी लावलेल्या ‘ढोर गल्लीकडे’, ‘महार वाड्याकडे’ वा ‘मांग वाड्याकडे’ अशा जातिवाचक उल्लेख असणाऱ्या नव्याने लावलेल्या पाट्या काढून टाकण्याची सूचना दादासाहेबांनी केली होती.
ते म्हणाले,
राजर्षी शाहू महाराजांनी बहिष्कृत शब्दालाच बहिष्कृत केले असून अस्पृश्य समाजाला आपल्या मानवी हक्कांबद्दल जाणीव झाली आहे. त्यामुळे पूर्व बहिष्कृतांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा पाट्या लावाव्यात. 
आज ९२ वर्षांनंतर शासनाने राज्य स्तरावर हा कृतीशील निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायलाच हवे. पण, छ. शाहू महाराज यांचे पुरोगामी विचार कमी वयात अगदी तंतोतंत आचरणात आणणाऱ्या दादासाहेब दादासाहेब आपल्यापेक्षा ९२ वर्षे पुढे होते, हे देखील मान्य करायला हवे.
संदर्भ : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार. 
हे हि वाच भिडू. 
Leave A Reply

Your email address will not be published.