दगडाबाई शेळके यांना मराठवाड्याची “राणी लक्ष्मीबाई” म्हणून ओळखलं जातं…

१९३८ ते १९४८ हा मराठवाडा मुक्तीसंग्रामचा काळ म्हणुन ओळखला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि, भारत स्वतंत्र झाला तेंव्हा अनेक संस्थाने भारतात विलीन व्हायची बाकी होती.

५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली.

उरलेली ३ संस्थाने म्हणजे, हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही संस्थाने स्वतंत्र भारतात सामील व्हायची बाकी होती. हैदराबाद संस्थानामध्ये त्याकाळात तेलंगणा, सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातील काही भाग होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या होती तब्बल १ कोटी ६० लाख इतकी. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते परंतु या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वतंत्र व्हायचे होते आणि मग सुरु झाला मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम….!

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मराठवाड्याला हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घकाळ लढा द्यावा लागला होता.. त्यात कित्येकांनी बलिदान दिले होते.

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. पण या मुक्तिसंग्रामात मैलाचा दगड रचला तो जालन्यातील मर्दानी दगडाबाई शेळके यांनी. 

मराठवाडा दगडाबाई शेळके यांना कधीही विसरू शकत नाही.

या संग्राम चालू असतांना निजामांचे जनतेवर अत्याचार चालूच होते. निजामांच्या विरोधात लढा देण्यासाठी या जनतेचे प्रेरणास्रोत बनले ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा यांच्यासारखे खंबीर नेतृत्व. यांच्या नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यातल्या लहान-थोरांपर्यंत पोहचला.

या लढ्यात विशेष योगदान राहिले ते म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रियांचे…आणि त्यात एक म्हणजे दगडाबाई शेळके. 

असं म्हणतात या लढ्यात दगडाबाई झाशीच्या राणीप्रमाणेच भासायची.. पॅन्ट, शर्ट घालून आपल्या अपंग मुलाला पाठीला बांधून एका हातात बंदूक, दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम धरून सहकारी स्वातंत्र्यसैनिकांना या दगडाबाई रसद पुरवायच्या. दगडाबाईंनी बंदूक आणि हातगोळे चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. एकदा निजामच्या सैनिकांनी त्यांना शस्त्रासह रंगेहाथ पकडले होते. ज्यामुळे त्यांना तुरूंगवास देखील भोगावा लागला होता.

निजामी राजवट संपवायची या ध्यासाने दगडाबाई शेळके यांनी मुक्तिसंग्रामात उडी घेतली. दगडाबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर या गावाच्या.

त्यांच्या कामगिरीला समजणे तेंव्हा देखील नावेच ठेवली.  समाजाने त्यांच्यावर आक्षेप घेतला, त्यांना कुटुंबाच्या तसेच स्वतःच्या नवऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

त्यांनी या स्वातंत्र्य लढ्याला इतकं वाहून घेतलं कि, त्यांनी आपल्या पती देवराव यांचा स्वतःहून दुसरा विवाह लावून दिला.

दगडाबाईची माहेरची लढाईला देखील या स्वातंत्र्य संग्रामात विशेष स्थान आहे.

दगडाबाईंनी निजामाशी अनेकदा दोन हात केले. त्यांची सर्वांत गाजलेली लढाई म्हणजे माहेरची लढाई. दगडाबाई यांनी या लढ्यात टाकळी कोलते या कॅम्पवर जिवाची पर्वा न करता निझामाशी लढा दिला होता.  तेव्हा त्यांनी एकटीने माहेर असलेल्या कोलते टाकळी शिवारातील रझाकार कॅम्पवर हातबॉम्ब टाकून तेथील कॅम्प उध्वस्त केला होता.

अशा धाडसी होत्या दगडाबाई ! त्यांचं आयुष्य म्हणजे एक जिवंत दंतकथाच होती.  

दगडाबाईंचा ५ मे २०१३ रोजी वयाच्या ९ ८व्या वर्षी मृत्यू झाला. धोपटेश्वर येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार झाले. शेतकरी नेते शरद जोशी यांनी त्यांची दखल घेत त्यांना चांदवडच्या ‘शेतकरी महिला मेळाव्याचे अध्यक्षपद देऊ केले होते. 

मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून दगडाबाई शेळके यांना हा मराठवाड्याचा इतिहास कधीही विसरणार नाही !

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.