३०० वर्षांपूर्वी मराठ्यांची अधुरी राहिलेली दुर्गा पूजा बंगाली लोक पूर्ण करतात.

आजच्या पश्चिम बंगालमध्ये एक गाव आहे, दैन्हात. पूर्ब बर्धमान जिल्ह्यात कटवा या शहराजवळ असलेलं हे छोटं गाव. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वसवलं आहे मराठ्यांनी. हो हे खरं आहे ,

मराठा साम्राज्य एकेकाळी बंगाल पर्यंत पोहचलं होतं.

हे शक्य झालं होतं नागपूरकर रघुजीराजे भोसले यांच्यामुळे. वऱ्हाड प्रांतावर त्यांची सत्ता होती. नागपूर हि त्यांची राजधानी. रघुजी मोठे पराक्रमी होते. गनिमी कावा युद्ध आणि मैदानी युद्ध या दोन्ही प्रकारामध्ये त्यांची सेना तरबेज होती. रघुजीना राजकारणाची चांगलीच समज होती. शेजारच्या राज्यात घडणाऱ्या घटनांकडे ते दुर्लक्ष करत नसत. उलट याचा आपल्या राज्याच्या वाढीस काही फायदा आहे का याचा कायम कानोसा ते घेत असत.   

त्याकाळी अलीवर्दी खान बंगालचा नवाब होता. त्याच्या विरुद्ध त्याचा ओरिसाच्या सुभेदाराने बंड केले.

या बंडाला मराठ्यांची फूस होती. अलिवर्दी खानाने ते बंड मोडून काढले मात्र ओरिसाच्या सुभेदाराने रघुजी भोसलेंकडे मदत मागितली. त्याच्या मदतीला रघुजीनी आपला दिवाण पंडीत भास्कर राम कोल्हटकर यांना ४० हजार बारगिरांची खास सेना देऊन पाठवले.

पराक्रमी असलेल्या भास्करराम पंडिताने ओरिसा आणि बंगालचा काही भाग जिंकला. गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठा सैन्याचा अंदाज बंगालच्या नवाबाला येत नव्हता.

बंगालची तेव्हाची राजधानी मुर्शिदाबाद पर्यंत भास्कर पंडिताने मजल मारली होती. अख्ख्या बंगालमध्ये मराठ्यांची दहशत पसरली. मुघल सैन्याला कळतच नव्हते की मराठे येतात कधी आणि हल्ला करून जातात कधी.

१७४१ साली आपल्या पहिल्या मोहिमेत भास्कर पंडिताने बंगालमध्ये मोठी खंडणी वसूल केली. त्यांचं नाव ऐकलं तरी मुघल सरदार जमीनदार थरथर कापत होते. मराठा बारगिरांना बंगालीमध्ये बोर्गी म्हणून ओळखलं जाई. त्याकाळी तिथे अफवा पसरली होती की हे बोर्गी येतात आणि गावोच्या गावो लुटून जातात. खंडणी न देणाऱ्याला कापून टाकतात.

बंगाली स्त्रिया आपल्या मुलांना झोप नाही तर मराठा येतील अशी धमकी द्यायच्या. 

आपल्या दुसऱ्या बंगाल मोहिमेवेळी भास्कर पंडीतने दैन्हात नावाचे शहर वसवले. इथे मुख्य तळ उभारून बाकीच्या बंगालवर हल्ला करणे सोपे जात होते. 

ते साल होते १७४२. तो पर्यंत मराठ्यांबद्दलच्या अफवा बंगालमध्ये जोर धरल्या होत्या. भास्कर पंडिताच्या लक्षात आले की जर इथे आपली सत्ता कायमची स्थापण करायची असेल तर स्थानिक लोकांच्या मनातील आपल्या बद्दलची भीती मिटवून टाकावी लागेल.

यासाठी त्यांनी त्या वर्षीचा नवरात्रीचा दुर्गा उत्सव जोरात साजरा करायचं ठरवलं. दैन्हात मध्ये एक दुर्गा मंदिर होते. नवरात्रीत ते सजवण्यात आले. इथल्या दुर्गापूजेचे आसपासच्या सरदारांना, जमीनदारांना निमंत्रण देण्यात आले. मराठ्यांचा दरारा एवढा होता की संपूर्ण कटवा गाव व जवळपासचे प्रतिष्ठित व्यक्ती भेटवस्तू घेऊन दैन्हातच्या दुर्गापूजेला हजर झाले.

अष्टमीच्या रात्री मोठा समारंभ सुरु होता. खुद्द पंडित भास्करराम कोल्हटकर पूजेला बसले होते आणि अचानक हाकाटी उठली की मुघल आले.

मराठ्यांच्या गनिमी काव्याचा त्यांच्यावरच अलिवर्दी खानाने उलट वार केला होता. 

जमलेल्या भाविकांची प्रचंड तारांबळ उडाली. हातातली पूजा टाकून भास्कर पंडितांना दैन्हात गाव सोडावे लागले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण तयारीने मराठे नवाबावर चालून आले, त्याचा मोठा पराभव केला मात्र भास्कर पंडिताची दुर्गा पूजा अधुरी राहिली.

पुढच्या एक दोन वर्षांनी बंगालचा नवाब अलिवर्दी खानाने तहाची बोलणी करण्याचे निम्मित करून भास्कर पंडिताचा कटवा येथे आपल्या छावणीत खून घडवून आणला.

ही बातमी नागपूरला पोहचली. चिडलेल्या रघुजी भोसलेंनी स्वतः बंगालची मोहीम हाती घेतली. सगळा बंगाल भाजून काढला. मराठ्यांबद्दलच्या अफवा खऱ्या पटाव्यात एवढी भीती त्यांनी अलिवर्दी खानाच्या सैन्याला बसवली. आपल्या सरदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेला राजा मुघलांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

अखेर १७५१ साली बंगालच्या नवाबाने नागपूरकर भोसलेंचे पाय धरले, त्यांचा चौथाईचा हक्क मान्य करत तह केला आणि मराठयांच्या बंगाल मोहीम थांबवल्या.

आजही काही ठिकाणी बंगाली इतिहासकार मराठ्यांनी बंगाल लुटला म्हणून टीका करताना दिसतात. मात्र रघुजी भोसले आणि भास्कर पंडिताने जेवढा बंगाल जिंकला होता तिथे जास्त धर्मांतर झाले नाही आणि हाच प्रदेश फाळणीनंतर पश्चिम बंगाल म्हणून भारतात राहिला. मराठा आक्रमणे झाली नसती तर संपूर्ण बंगाल व ओरिसा आज बांग्लादेशाचा भाग असता.

कोणी काहीही टीका करो मात्र आजही भास्कर पंडिताने वसवलेल्या दैन्हात या गावामध्ये त्यांच्या बद्दलचा आदर कायम आहे.

तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८९ साली गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन भास्कर पंडितांची अधुरी राहिलेली दुर्गा पूजा पूर्ण करायचे ठरवले.

तिथून पुढे दरवर्षी नवरात्रीत कटवा दैन्हात येथे ही दुर्गा पूजा साधेपणाने साजरी होते. बंगालमध्ये हि पूजा भास्कर पंडितेर पूजा म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त भाविकचं नाही इतिहास संशोधक या दुर्गा पूजेला हजर राहतात. दुर्दैवाने महाराष्ट्रात या इतिहासाबद्दल विशेष कोणाला ठाऊक नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.