कोल्हापुरात घोषणा झाली, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’

१९७७ सालच्या लोकसभा निवडणुका अनेक अर्थाने भारतीय लोकशाहीसाठी महत्वाच्या होत्या. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणिबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं असं त्यांचं म्हणणं होतं.

या लोकसभा निवडणुकामध्ये इंदिरा गांधींचा गर्व ठेचून काढायचा असं म्हणत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले.

महाराष्ट्रातही या निवडणूक चुरशीच्या झाल्या. सर्वात गाजली ती कोल्हापूरची लोकसभा निवडणूक.

कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. गेल्या सलग तीन निवडणूक काँग्रेसने एकहाती जिंकल्या होत्या. पण या भागात शेतकरी कामगार पक्षाचं देखील मोठं अस्तित्व होतं. भाई बागल यांच्या पासून चालत आलेली पुरोगामी बहुजनवादी विचारांची चळवळ इथे चांगलीच रुजली होती. काँग्रेसने लोकसभेला शंकरराव माने या दिग्गज नेत्याला तिकीट दिलं होतं तर शेकाप कडून भाई दाजीबा देसाई उभे होते.

दाजीबा देसाई मूळचे बेळगाव जिल्ह्यातल्या उचगावचे.  त्यांचं शिक्षण बेळगांवच्या मराठा मंडळ हायस्कूलमध्ये झालं. विद्यार्थी दशेतच त्यांच्यात देशभक्ती जागी झाली. महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकून ते १९४२ च्या चलेजाव आंदोलनात उतरले.

तत्कालीन इंग्रज सरकारने त्यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढलं.  शेवटी पोलिसांना हुलकावणी देऊन लिंगराज कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी कोल्हापूर गाठले. तिथेच त्यांना आश्रय मिळाला. भूमिगत राहून स्वातंत्र्याची चळवळ तेवत ठेवली. पुढे स्वातंत्र्य आवाक्यात आले तेव्हा त्यांनी कोल्हापुरात राहून आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं.

अत्यंत लहान वयात एक स्वातंत्र्यलढ्यातील लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांना चांगली ओळख मिळाली.

१५ ऑगस्ट १९४७ साली मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर तत्कालीन राज्यातील नेतेमंडळींशी मतभेद झाल्याने डाव्या विचारांच्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून शेकापची स्थापना केली. यात दाजीबा देसाई देखील होते. चंदगड येथे भरलेल्या पहिल्या शेकापच्या पहिल्या विराट सभेचे आयोजन त्यांनी केलं होतं.

शेकापचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जात असणाऱ्या साप्ताहिक राष्ट्रवीरचे संपादकपण त्यांच्या कडे आले. सीमाप्रश्न , गोवा मुक्ती लढा, चीनचे आक्रमण , अशा महत्वाच्या राजकीय प्रश्नावर त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात , कुळ कायदा , पाटबंधारे योजना, शेती मालाच्या किंमती , सहकारी संस्था अशा प्रश्नांशी संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केली.

सीमाभागात मराठीचे जतन व्हावे म्हणून शिक्षण संस्था काढल्या आणि चांगल्या चालवून दाखवल्या.

आपल्या देशात अधिक प्रमाणात शेतकरी आणि कामगार यांची संख्या मोठी असतानाही त्यांच्या प्रश्नाकडे अधिक प्रामाणिकपणे लक्ष दिले जात नाही याबद्दल त्यांनी आवाज उठवला होता.

कोल्हापूर बेळगाव सीमा भागात भाई दाजीबा देसाई यांच्याबद्दल जनमानसात आदराची भावना होती. त्यांचा प्रचार देखील जोरात झाला होता. वरूण तीर्थ येथे झालेल्या जंगी सभेत पुलं देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे मोठे साहित्यिक आले होते. कोल्हापुरातील ती आजवरची सर्वात मोठी प्रचारसभा मानली जाते.

कॉंग्रेसचाही जोर मोठा होता. राज्यातील आणि देशातील मोठे नेते प्रचाराला येऊन गेले होते. निवडणूक चुरशीची ठरली.

निकालाच्या दिवशी सर्वानाच उत्सुकता लागून राहिली होती. मतमोजणीच्या वेळी कल एकदा शंकरराव मानेंच्या बाजूने तर कधी दाजीबा देसाईंच्या बाजूने झुकत होता. रात्रभर मतमोजणी चालली. दुसऱ्या दिवशी अवघ्या १६५ मतांनी दाजीबा देसाई निवडून आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा मतमोजणी झाली मात्र त्यातही दाजिबांच्या विजयावर शिक्का मोर्तब करण्यात आला.

संपूर्ण देशात सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले उमेदवार म्हणून दाजीबा देसाई यांना ओळखले गेले. अशी अभूतपूर्व निवडणूक कोल्हापुरात परत कधीच पाहायला मिळाली नाही. 

निकालाच्या दिवशी विराट विजयी मिरवणूक निघाली. गुलाल उधळले, हलगी कडाडू लागली. शिट्ट्यांच्या गजरात बिंदू चौकापासून निघालेल्या या मिरवणुकीत अख्ख गाव सहभागी झालं होतं. कोल्हापुरात तर काँग्रेसला हरवले पण देशात काय झालं याचे वेध सगळ्यांना लागले होते.

मिरवणूक कशीबशी भाऊसिंगजी रोडवर येऊन पोहचली. गुजरीच्या कोपऱ्यावर असलेल्या एका कट्ट्यावर जेष्ठ नेते एन.डी.पाटील उभे राहिले आणि त्यांनी घोषणा केली,

गाय बी गेली आणि वासरू बी

या एका वाक्यात संपूर्ण मिरवणुकीमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट झाला. त्याकाळी काँग्रेसचं चिन्ह गाय वासरू होतं. त्या घोषणेचा अर्थ कोल्हापूरकरांनी समजावून घेतला की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव तर झालाच पण खुद्द इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी हे देखील पडले होते.

लोक आणीबाणीच्या निर्बंधांना आणि अत्याचारांना इतके वैतागले होते की देशाच्या एका कोपऱ्यात असलेल्या कोल्हापूर सारख्या छोट्याशा गावात देखील इंदिराजींचा पराभव जल्लोषात साजरा केला जात होता. हुकुमशाहीच्या पर्वाचा अंत झाला होता. विरोधकांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली होती.

संदर्भ- सुधाकर काशीद दैनिक सकाळ कोल्हापूर

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.