सचिन द्रविडला सुद्धा धास्ती वाटणाऱ्या स्टेन गनने क्रिकेटमधून संन्यास घेतलाय…

क्रिकेटमध्ये बॉलिंग म्हणजे बॅट्समन लोकांनी तुडवायचं डिओर्टमेंट आहे असं समीकरण तयार झालं होतं. 2000 च्या दशकानंतर हे चित्र बदललं ते स्टेन गनने. या स्टेन गनला रफ्तार का सौदागर म्हटलं जाऊ लागलं. सचिन द्रविड सारखे फलंदाज चांगल्या चांगल्या बॉलर्सला रडकुंडीला आणायचे तिथं या पठ्यानं मांड ठोकली आणि सगळ्यांना आपल्या बाऊन्सर आणि भेदक बॉलिंगची धार दाखवली.

तर आपण बोलतोय डेल स्टेन विषयी, डेल स्टेन प्रतिस्पर्धी जरी असला तरी तो जगभरात जिथं जिथं क्रिकेट खेळलं जातं तिथं तिथं त्याचं नाव स्टेन गन म्हणून फेमस आहे. डेल स्टेनने क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आणि तमाम फॅन्स लोकांनी त्याच्या बॉलिंगच्या चर्चा करायला सुरुवात केली. तर आपण स्टेन गनच्या वैयक्तिक आणि क्रिकेटमधल्या आयुष्याकडे नजर टाकूया.

२७ जून १९८३ साऊथ आफ्रिकेमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात डेल स्टेनचा जन्म झाला. लहानपणापासूनच स्टेन खेळांकडे आकर्षित होता. खेळाचं वेड इतकं होतं की अभ्यास ,जेवण वैगरे गोष्टींकडे त्याचं लक्ष नसायचं. खेळायला बूट नसल्याने तो अनवाणी पायाने बॉलिंग करायचा. वयाच्या ११ व्या वर्षी स्टेन क्रिकेट खेळू लागला. शॉन पॉलॉक आणि डोनाल्ड यांची बॉलिंग बघून स्टेनने लहानपणीच ठरवून टाकलं होतं की आपल्याला फास्टर बॉलर व्हायचं. शाळेत त्याच्याइतकी फास्ट बॉलिंग कुणाचीही नव्हती. त्याच्या बॉलिंगला सगळी मंडळी टरकून असायची.

डेल स्टेनला खेळाचं वेड फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये घेऊन आलं. इथं स्टेन गन धडाडली आणि फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये अशी कामगिरी त्याने केली की फक्त ७ सामन्यानंतर स्टेनला आफ्रिकेच्या नॅशनल टीममध्ये निवडण्यात आलं. इंग्लंड विरुद्ध टेस्टमध्ये डेल स्टेनला संधी मिळाली.

बॉलर म्हणून खेळणारा स्टेन आपल्या पदर्पणाच्या पहिल्याच मॅचमध्ये बॅट्समन म्हणून खेळायला आला आणि पहिल्याच बॉलवर त्याने सिक्सर लगावला. या मॅचमध्ये ८ धावा त्यानं केल्या. इंग्लडविरुद्ध सिरीजमध्ये स्टेनला फक्त १ विकेट मिळाली आणि सिरीजभर त्याला काहीच कमाल दाखवता आली नाही.

आपल्या पहिल्या टेस्टचा अनुभव सांगताना स्टेन म्हणतो की,

त्यावेळी माझ्याकडे चांगले बूटही नव्हते आणि मी नवखा असल्याने माझ्यासाठी कुणीही स्पॉन्सर नव्हता. त्यावेळी मी खेळण्यास नकार दिला होता पण शॉन पोलॉक ने मला दोन जोड्या बूट दिले त्यामुळे मी खेळलो.

भले टेस्टमधून स्टेन बाहेर फेकला गेला पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दोन वर्षे त्यानं जबरदस्त कामगिरी केली. यानंतर न्यूझीलँड विरुद्ध स्टेनची पुन्हा निवड झाली आणि न्यूझीलँडच्या बॅटिंग ऑर्डरचं कंबरडं डेल स्टेनने मोडलं. या मॅचमध्ये त्याने ५ विकेट पटकावल्या. या सिरीजमध्ये डेल स्टेनने आपल्या बॉलिंगने दाखवून दिलं की तो काय ताकदीचा प्लेअर आहे.

२००६ साली स्टेन आफ्रिकेच्या वनडे संघात आला. सुरवातीच्या ११ मॅचमध्ये डेल स्टेनने ७५ विकेट घेतल्या आणि मुरलीधरन सोबत जागतिक क्रिकेटमध्ये नंबर वन स्थान पटकावलं. यानंतर असा काळ आला की डेल स्टेन नावाने खेळाडूंना धडकी भरू लागली.

हा तो काळ होता जिथं डेल स्टेनने कहर केलं होतं. २००९ ते २०१५ या काळात डेल स्टेनने स्वतःला क्रिकेट मधला सगळ्यात वेगवान आणि भेदक गोलंदाज बनवलं. हा काळ स्टेन साठी गोल्डन पिरियड म्हणून ओळखला जातो. बराच काळ टेस्ट क्रिकेट रँकिंग मध्ये डेल स्टेन बादशहा होता.

२०११ साली वर्ल्ड कप झाला तेव्हा आफ्रिकेला क्वार्टर फायनल मध्ये पोहचवण्यात डेल स्टेनचा सिंहाचा वाटा होता. २०१५ सालीसुद्धा स्टेनच्या जोरावर आफ्रिकी टीम सेमी फायनलला पोहचली होती. डोळ्याला आवडणारी बॉलिंग ऍक्शन, दोन्ही बाजूने बॉल स्विंग करण्याची धमक आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारा स्टेन हे चित्र अस्सल क्रिकेट शौकीन कधीही विसरू शकणार नाही.

दुखापत ही डेल स्टेनच्या क्रिकेट आयुष्याला लागलेली कीड होती. दुखापतीमुळे सतत तो संघाबाहेर राहू लागला. २०१५ पर्यंत क्रिकेटचा बॉस बनून राहिलेला स्टेन दुखापतीमुळे बेजार झाला. टेस्टमध्ये ४०० पेक्षा जास्त विकेट स्टेनच्या नावावर आहेत. डेल स्टेनने ८३ वेळा फलंदाजांना शून्यावर आउट केलेलं आहे. वनडेमध्ये १९६ आणि टी-२० मध्ये ६४ विकेट स्टेनच्या नावावर आहेत.

स्टेनची एक खासियत म्हणा किंवा दोष म्हणा नोबॉल सुद्धा त्याचे इतके डेंजर असायचे कि बॅट्समनची गाळण उडायची. ३१ ऑगस्ट २०२१ ला स्टेन गन बिरुद असलेला डेल स्टेन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण त्याची भेदक बॉलिंग क्रिकेट विश्वात कायम लक्षात ठेवली जाईल.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.