पार्टी असो वा लग्न, दलेर मेहंदीच्या गाण्यावर नाचल्याशिवाय मजा येत नाही

१९९५ वगैरे साल असावं. टिपीकल बाॅलिवूड गाणी कोणत्याही समारंभात वाजली जायची. वेगळेपणा म्हणुन कधी ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्यावर लोकं आनंद साजरा करायची. या सर्व प्रवाहात एक पंजाबी गायक दाखल झाला. त्याच्या गाण्यांवर लोकांचे पाय थिरकलेच शिवाय आजही कोणतीही पार्टी असो…

फक्त गप्पा मारण्यापेक्षा डान्स करुन आनंद साजरा करणा-या मंडळींसाठी ‘नन्ना नन्ना ना रे ना रे’, ‘बोलो ता रा रा रा’ हि गाणी म्हणजे खास जवळचा विषय.

काही माणसं मोजकंच तरीही दर्जेदार काम करुन वर्षानुवर्ष स्वतःची ओळख जपुन ठेवतात. गायक दलेर मेहंदी हे यापैकीच एक नाव. त्यांनी गायलेली गाणी कधीही ऐका, ती कायम फ्रेश वाटतात. मरगळलेल्या मनात पुन्हा उत्साह निर्माण करतात. आज दलेर मेहंदीचा वाढदिवस.

पटना येथे १९६७ साली एका पंजाबी कुटूंबात दलेर मेहंदीचा जन्म झाला.

लहानपणापासुन दलेरला गायनाची आवड. त्याचे आई-वडिल ‘गुरु ग्रंथ साहिब’ मधील शब्द आणि रागांची शिकवण दलेरला द्यायचे. वयाच्या ६ व्या वर्षापासुनच दलेरचा आवाज गायनासाठी तयार होत होता.

१४ व्या वर्षी आवाजावर संस्कार करण्यासाठी दलेरने गोरखपुर येथील उस्ताद राहत अली खान यांच्याकडुन गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. तीन वर्ष गुरुंच्या हाताखाली दलेरने गायनासोबतच तबला, ढोलक, हार्मोनियम आणि तानपुरा यांसारखी वाद्य वाजवायला शिकली.

गायनामध्ये तरबेज होत असलेला दलेर पुढे परदेशात गेला.

अमेरिकेतील सॅन फ्रासिस्को येथे थोडेफार पैसे कमावण्यासाठी दलेर टॅक्सी ड्रायव्हरचं काम करायचा. १९९१ साली भारतात पुन्हा परत येऊन त्याने स्वतःचा बँड निर्माण केला. उर्दुतले मोठे गझलकार कातिल शिफाई आणि फिराक गोरखपुरी यांच्या गझला दलेर सुरुवातीला गायचा. हळूहळू पंजाबमध्ये दलेर मेहंदी लोकप्रिय होत होते.

भारतीय शास्त्रीय संगीताचं पाॅप कल्चर मध्ये रुपांतर करण्यासाठी दलेर मेहंदीचं मोठं योगदान आहे. १९९५ साली ‘बोलो ता रा रा रा’ हा त्यांचा पहिला अल्बम बाजारात आला. तेव्हा मोबाईल, युट्युबचा जन्म झाला नसल्याने दलेर मेहंदीचा हा पहिला अल्बम संगीतक्षेत्रात सुपरहिट झाला. या अल्बमच्या जवळपास दोन कोटी कॅसेट विकल्या गेल्या.

१९९७ साल. बाॅलिवुडचा शहनशाह अमिताभ बच्चन पाच वर्ष इंडस्ट्रीतुन जणु गायब होता.

मधल्या काळात अमिताभच्या व्ययक्तिक आयुष्यात अनेक वादळं आली. बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव आलं. अमिताभने जी स्वतःची ABCL प्राॅडक्शन कंपनी सुरु केली होती, ती डब्यात गेली. अमिताभला बाॅलिवुडमध्ये कमबॅकसाठी काहीतरी वेगळं करायची गरज होती. आणि इथेच अमिताभने लढवली एक शक्कल.

याच वर्षी आलेल्या ‘मृत्युदाता’ सिनेमात अमिताभने दलेर मेहंदीसोबत एक गाणं केलं. या गाण्याचं नाव ‘ना ना ना ना रे ना रे’. दलेर मेहंदी यांनी फक्त गाणं गायलंच नाही तर सिनेमात अमिताभ सोबत दलेर मेहंदी मनसोक्त नाचले. ‘मृत्युदाता’ सिनेमा इतका चालला नाही पण या गाण्याने मात्र अमिताभला पुन्हा चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

१९९७ साली V चॅनलचा ‘सर्वोत्कृष्ट पाॅप गायक’ हा पुरस्कार दलेर मेहंदीने पटकावला.

सध्या स्वतःच्या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करुन गायक आणि गायिका प्रसिद्ध होतात. पण दलेर मेहंदींनी इंटरनेट आणि इतर समाजमाध्यमांचं महत्व ओळखुन १९९७-९८ सालातच या गोष्टी करुन लोकप्रियता मिळवली. ‘तुनुक तुनक तुन’, ‘काला कौआ काट खाएगा’ अशा गाण्यांचे दलेर मेहंदींचे म्युझिक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान हिट आहेत. दलेर मेहंदींचं गाणं गायचा अनोखा अंदाज, गाण्यावर त्यांनी केलेला हटके डान्स यामुळे त्यांच्या या व्हिडीओची लोकांमध्ये क्रेझ आहे.

विविध वादात अडकल्यामुळे बाॅलिवूडमध्ये कायम चर्चेत असलेला गायक मिका सिंग हा दलेर मेहंदीचा छोटा भाऊ. दलेर मेहंदींनी आयुष्यात जो मोठा वाद निर्माण करुन ठेवलाय, त्यापुढे मिका सिंग काहीच नाही.

हि गोष्ट २००३ सालची.

म्युझिक व्हिडीओ, बाॅलिवुड सिनेमात पार्श्वगायन इत्यादी गोष्टींमुळे दलेर मेहंदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. केवळ भारतातच नाही तर दक्षिण आफ्रिका, अमेरिका, कॅनडा, बेल्जियम अशा देशांमध्ये दलेर मेहंदींनी स्वतःच्या बँडसह परफाॅर्मन्स केले. करियरची गाडी सुसाट असताना याच वर्षी एका मोठ्या वादाने दलेर मेहंदीच्या आयुष्याला वळण मिळालं.

बक्शिस सिंग या माणसाने दलेर मेहंदीच्या विरुद्ध FIR दाखल केला.

गैरमार्गाने दलेर मेहंदींनी मानवी तस्करी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला गेला. १० माणसांना त्यांनी अवैध मार्गाने परदेशात पोहचवले होते. तसेच काही माणसांकडून याच कामाचे त्यांनी पैसे उकळले, परंतु त्या माणसांना त्यांनी परदेशात पाठवलं नाही, असे आरोप दलेर मेहंदीवर लावले गेले. या आरोपाखाली दलेर मेहंदीला अटक करण्यात आली.

जेलमध्ये पोलीसांनी त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांचे सर्व कपडे उतरवले.

पोलीसांचं म्हणणं होतं की, बेकायदेशीर पासपोर्ट दलेर मेहंदींनी त्यांच्या तबल्यामध्ये लपवले आहेत. १५ वर्ष दलेर मेहंदीवर कोर्टात हि केस चालली. २०१८ साली त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावली.

इतका मोठा वाद ओढवुनही दलेर मेहंदीच्या लोकप्रियतेत अजिबात फरक पडला नाही.

दलेर मेहंदी गाताना त्यांची असलेली आकर्षक वेशभुषा हा देखील चर्चेचा विषय. रंगीबेरंगी पगडी, झगमगती शेरवानी अशी त्यांची वेशभुषा प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस नव्या डिझाईनसह बदलायची. दलेर मेहंदींच्या नव्या गाण्यांबद्दल सांगायचं झालं, तर ‘बाहुबली 2’ सिनेमात ‘जियो रे बाहुबली’ हे गाणं त्यांनी गायलं.

पंजाबी माणसांची कला त्यांच्या स्वभावासारखीच दिलदार असते. बाॅलिवूडमध्ये नाव कमावलेला आणि संपुर्ण जगभरात प्रसिद्धी मिळवलेला दलेर मेहंदी हा पहिला पंजाबी गायक आहे.

तर मग भिडूंनो, लाॅकडाऊनमध्ये दररोजच्या दिनक्रमाचा कंटाळा आला असेल, तर दलेर मेहंदीची गाणी ऐकुन आळस झटकून पुन्हा कामाला लागा.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.