स्वातंत्र्याची 75 वर्ष : आजची बातमी, पाणी पिलं म्हणून दलित मुलाचा मारहाणीत मृत्यू

शाळेच्या प्रांगणात एक लहान मुलगा उभा होता. त्या मुलाची नजर एकाच गोष्टीवर खिळली होती. त्याच्या समोर पिण्याच्या पाण्याचा नळ होता. एक एक करून शाळेतील विद्यार्थी तिथे येत होते. पाणी पीत होते आणि निघून जात होते. मुलाचा घसा देखील कोरडा पडला होता. त्याला देखील खूप तहान लागली होती पण तो पाणी पिऊ शकत नव्हता. कारण त्याला नळ सुरु करून देणारा व्यक्ती बराच वेळ झाला आलाच नव्हता.

बरं मग नळ सुरु करायला त्या मुलाला हात नव्हते का? धडधाकट मुलगा होता पण नळ सुरु करू शकत नव्हता. शाळेतला शिपाई जेव्हा येऊन नळ सुरु करून देईल तेव्हाच त्या मुलाला प्यायला पाणी मिळणार होतं. तो नाही आला तर इतर विद्यार्थी त्याला नळ सुरु करू देत नव्हते. 

का? 

आडवी येत होती त्याची जात! तो मुलगा जातीने महार होता. पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकण्याचा त्याचा हक्क यामुळे काढून घेतला होता कारण तो अस्पृश्य होता, दलित होता. 

कुणाबद्दल बोललं जातंय आत्तापर्यंत कळलं असेलच. तो शाळकरी पोरगा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांच्या आयुष्यात घडलेल्या या प्रसंगाची आठवण होण्याचं कारण काय? तर…  

राजस्थानमध्ये अवघ्या ९ वर्षाच्या ‘दलित’ मुलासोबत अशीच एक घटना घडली.. 

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा हे गाव. गावात सरस्वती विद्या मंदिर नावाची एक खासगी शाळा आहे. २० जुलै रोजीचा दिवस होता. या शाळेत शिकणारा ९ वर्षांचा इंदर मेघवाल नावाचा पोरगा शाळेत ठेवलेलं पाणी पीत होता. 

अचानक त्याच्या शाळेतील चैल सिंग नावाच्या शिक्षकाने जवळ येत त्याला चापट मारली आणि शिवीगाळ गेली. 

का? तर इंदर मेघवाल हा दलित समाजाचा मुलगा होता. त्याने शिक्षकासाठी बाजूला ठेवलेल्या मातीच्या भांड्याला स्पर्श केला होता आणि त्यातील पाणी तो प्यायला होता. हे उच्च जातीच्या चैल सिंग यांना काडीमात्र आवडलं नाही आणि संतापून त्यांनी  इंदरला इतक्या जोरात चापट मारली की तो जमिनीवर खाली पडला. इंदर रडत होता आणि त्याच्या शिक्षकांची जातीवाचक शिवीगाळ सुरु होती. 

इंदर घरी आला तसा तो घरच्यांना सांगत होता की त्याच्या कानात दुखत आहे. आधी घरच्यांना जाणवलं नाही की दुखापत अंतर्गत आहे पण जेव्हा मुलाची तक्रार सुरू राहिली, तेव्हा घरच्यांनी त्याला जालोर जिल्ह्यातील बागोडा आणि भिनमल इथल्या रुग्णालयात नेलं. 

तिथून त्यांना उदयपूरला जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिथून पुढे  गुजरातच्या मेहसाणा इथल्या रुग्णालयात मुलाला नेण्यात आलं. शेवटी त्याला अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

२० जुलैला झालेल्या घटनेनंतर  इंदरला १३ ऑगस्टपर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात हलवण्यात येत होतं. २४ दिवसांपासून सुरु असलेला घरच्यांचा हा प्रवास आणि  इंदरचं दुखणं याला १३ ऑगस्टला फुलस्टॉप लागला. अहमदाबादच्या रुग्णालयात  इंदरने शेवटचा श्वास घेतला… 

हे सर्व झालं एका जोरदार चापटेमुळं जी त्याच्या जातीला मारण्यात आली होती. जातीच्या तिरस्कारामुळे इंदरला त्याचा जीव गमवावा लागला…

भरीस भर म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा देखील प्रयत्न झाला.

मुलाच्या मृत्यूची बातमी पसरताच पोलिसांनी परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली, असा आरोप इंदरच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांचा असा दावा आहे की, अहमदाबादच्या रुग्णालयातून मुलाचा मृतदेह परत आणत असताना पोलिसांनी इंदरचे काका खिमाराम यांचा फोन आणि मुलाचे मेडिकल रिपोर्ट्स काढून घेण्याचा प्रयत्न केला.

तर काही दिवसांपूर्वी शाळेत राजपूत, देवासी आणि मेघवाल समाजातील सुमारे ४० जणांची मिटिंग झाली. ज्यात इंदरचे दुसरे काका किशोर कुमार मेघवाल यांना राजपुतांनी बोलावलं आलं होतं आणि सांगितलं होतं की, अजूनही तुमची इतर मुलं शाळेत शिकत आहेत तेव्हा आमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू नका. त्यांनी मेघवाल यांना शिक्षकांशी तडजोड करण्यास सांगितलं होतं. 

तर शिक्षक चैल सिंग इंदरच्या उपचारासाठी अडीच लाख दयायला तयार होते, असं किशोर मेघवाल यांनी माध्यमांना सांगितलं.

मात्र आपलं मुलंच गमावलेल्या कुटुंबाला पैसा नाही तर न्याय हवा आहे. त्यांनी पोलिसांमध्ये FIR दाखल केली आहे. ज्यात म्हटलंय…

इंदर तिसरीत शिकत होता, लहान होता, ज्या मटक्यातून त्याने पाणी प्यायले होतं ते मटके सवर्ण जातीच्या शिक्षकासाठी वेगळं ठेवण्यात आलं होतं, हे त्याला माहीत नव्हतं. 

चैल सिंग यांनी त्याला इतक्या जोरात मारलं की त्याच्या कानाला आणि डोळ्याला दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

इंदरच्या घरच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३०२ (हत्या) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ च्या कलमांखाली चैल सिंग यांना अटक केली आहे.  

सिंग यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सरस्वती विद्या मंदिर या खासगी शाळेची मान्यता रद्द करावी, या मागणीसाठी इंदरचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ निदर्शने करत आहेत. 

तर दलित हक्क केंद्राने (सीडीआर) सुराणा गावात सत्य शोधण्यातही एक पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आणि कुटुंबाला ५० लाखांची भरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची देखील मागणी केली आहे. 

भीम सेना या दलित संघटनेच्या स्वयंसेवकांनी आणि गावकऱ्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी इंदरच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 

तर दुसरीकडे या प्रकरणाला राजकीय वळण देखील आलं आहे. 

राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत, असं म्हणत भारतीय जनता पक्षाने देखील राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, राज्याच्या शिक्षण विभागाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि राजस्थान एससी कमिशनचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांनी या प्रकरणाचा तपास केस ऑफिसर स्कीम’ अंतर्गत लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र घटनेची दुसरी बाजू बघणं देखील गरजेचं आहे…

जालोर जिल्ह्याचे कलेक्टर निशांत जैन यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाने पाण्यासाठी स्वतंत्र भांडं ठेवल्याचा पुरावा पोलिसांना अजून मिळालेला नाहीये. कारण खासगी शाळा संघटनेचे सदस्य सुखराम खोखर यांनी असा दावा केला की, हा आरोप “खोटा” आहे.

खोखर यांनी असं देखील सांगितलं आहे की, या शाळेत पाच शिक्षक आहेत, त्यापैकी चार दलित आहेत. पाण्याची एकच टाकी आहे आणि शाळेतील प्रत्येक जण एकाच भांड्यातून पाणी पितो. वेगळं भांडं नाहीये. 

इंदर नेहमी कानात कापसाचा बोळा घालून येत होता. कारण त्याला कानाचं इन्फेक्शन होतं. त्यावर उपचार सुरु होता, असाही दावा करण्यात आला आहे. 

तरीही… 

या घटनेने राजस्थानमधील दलित अत्याचाराची घटना पुढे आली आहे. राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

दलित शोषण मुक्ती मंचचे जिल्हाध्यक्ष रमेश बैरवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत दलित छळाच्या घटनांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दलित महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऍक्शन काय घेण्यात आली? तर पोलिसांनी ४२% प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर एससी/एसटी कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या ७३ प्रकरणांमध्ये पोलिसांनी फाईल बंद केल्या. दलित खटल्यांचं प्रलंबित राहण्याचं प्रमाण ९३% आहे आणि दोषसिद्धीचं प्रमाण केवळ ४८% आहे.

अशा या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे दलित समाजाला भीतीच्या वातावरणात जगणं भाग पडत आहे, याकडे देखील रमेश बैरवा यांनी लक्ष वेधलं. 

भारत जेव्हा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे तेव्हा या घटनेचं पुढे येणं हा प्रश्न विचारायला भाग पडत आहे की, खरंच देश स्वातंत्र्य झाला आहे का? दलितांवर अजूनही होणाऱ्या या भेदभावावरून प्रश्न पडतोय… स्वातंत्र्याची व्याख्या नक्की काय आहे? अशी संतापाची लाट सोशल मीडियावर आली आहे.

भारताच्या भविष्याबद्दल काही प्रण करण्यात आले आहेत. त्यात ‘एकता आणि एकजुटता’ हा प्रण देखील आहे. मात्र या घटनेतून वेगळंच वास्तव्य समोर येतंय. तेव्हा ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणती पावलं सरकार उचलेल, हे बघणं गरजेचं ठरणार आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.