दामिनी पथक पुन्हा एकदा सक्रीय होणार !

पुणे म्हणलं कि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून थोडीफार ‘सेफ सिटी’ मानली जायची. मात्र गेल्या काही काळात पुणे शहरात तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे  दिसून येतंय.

पुणे शहर शिक्षणासाठी महत्वाचं केंद्र मानलं जातं आणि इथे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विध्यार्थी येत असतात त्यात  मुलींचे प्रमाण मोठे आहे.  फक्त शिक्षणासाठीच नाही तर नोकरीच्या अनुषंगाने देखील महिलांचा वावर वाढला आहे. मात्र या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची सार्वजनिक अवकाशातील सुरक्षितता.

यात अनेक धोके येतात, त्यात महिला, तरुणी, विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, मंग़ळसूत्र हिसकावणे, शाळा, कॉलेज ठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास, बलात्कारासारख्या घडणाऱ्या घटना इत्यादी पासून महिलांना सुरक्षितरित्या समाजात वावरता यावं यासाठी महिला मार्शल पथक ‘दामिनी’ पथकाची स्थापना २०१५ मध्ये केली होती. 

शहरात दामिनी पथकाच्या स्थापनेमुळे शहरातील युवती- महिलांचा आत्मविश्वास वाढला असं एकंदरीत दामिनी पथकचा इतिहास सांगतो. 

या पथकानुसार, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून आयटी आणि इतर कंपन्या, मॉल, बस स्टॉप, गार्डन, मार्केट, झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणांभोवती गस्त घालणे आणि तेथील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाय योजना करणे हा पुणे शहराच्या दृष्टीने उद्देश असल्याचे पोलीस प्रशासन सांगते.

मात्र अलीकडे राज्यात आणि शहरात बलात्काराच्या आणि छेदछाड प्रकरणं वाढली आहेत.

कोरोनाकाळाच्या दरम्यान बंद असलेले ‘बडीकॉप’, ‘पोलीस काका’, ‘पोलीस दीदी’ तसेच महत्वाचं म्हणजे दामिनी या योजना पुन्हा सक्रिय करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले असल्याच वृत्त आहे. 

पोलीस प्रशासनाने सांगितल्यानुसार, मागील काळात शहरात ज्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी पोलिस आयुक्तालयात गुन्हे आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी सर्व पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीत महिला सुरक्षेबाबतचे उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे.

पुणे पोलीस दलाकडून सध्या महिला सुरक्षेसाठीचे दामिनी पथक चालवण्यात येत आहे.

दामिनी पथक नेमकं काय काम करते?

दामिनी पथक हे दोन टप्प्यांमध्ये काम करणार आहे. पहिला टप्पा म्हणजे, पोलीस गणवेषात एक पथक  शहरात गस्त घालण्याचे काम करेल तर दुसरं पथक बाईक वरून पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालेल.

दुसरा टप्पा म्हणजे, दुसरे पथक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली काम करणार आहे. थोडक्यात याचं काम वेगळं असणारे.  या पथकाकडून साध्या वेशात शाळा-महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. दामिनी मार्शलनी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुली आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्यासाठी यावर्षी १४० आणि गेल्या वर्षी आणखी १३४ कार्यशाळा आयोजित करून जागरूकता निर्माण केली आहे.

प्रत्येक बीट मार्शलमध्ये दुचाकीवर असलेल्या दोन महिला पोलिसांचा समावेश असतो आणि दोन पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचा समावेश होतो. त्यानुसार, १५ बीट मार्शल पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ३० पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र व्यापतात. मार्शल सकाळी ८ च्या सुमारास कामासाठी येतात आणि सुमारे १२ तास कर्तव्ये पार पाडतात.

ज्यात शाळा, महाविद्यालयांच्या सभोवतालच्या भागात तसेच इतर ठिकाणांभोवती गस्त घालणे. रस्त्यांवर महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर बारीक नजर ठेवणे आणि कारवाई करणे हे काम हे पाठक करत असते.

पोलीस काका व पोलीस दीदी काय योजना आहे ?

शाळा,महाविद्यालय बंद असल्याने सध्या पोलीस काका आणि  पोलीस दिदि सारखे उपक्रम काही काळ बंद होते. पण काहीच काळात हे उपक्रम पुन्हा सुरू केले जाणार आहेत. थोडक्यात या उपक्रमात शाळेतील मुलांमधील पोलिसांबद्दलची भिती दूर करण्याबरोबरच त्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहेत तसेच जनजागृतीच्या कार्यक्रमावर भर दिला जाणार आहे.

या पथकाद्वारे स्वसंरक्षण प्रशिक्षण देखील दिले जाते आणि शहरातील विविध शाळांमध्ये आयोजित केलेल्या सत्रांद्वारे शालेय मुलींमध्ये “गुड टच आणि बॅड टच” विषयी जागरूकता निर्माण केली जाते.

आयटीतील ‘बडीकॉप’ हि काय योजना आहे ?

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी पुणे पोलिसांकडून काही वर्षांपासून ‘बडीकॉप’ ही योजना राबवली जात होती. थोडक्यात या संकल्पनेत आयटीतील महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले व्हाट्सअपचे चारशे ते पाचशे व्हाट्सअप ग्रुप आहेत. हे ग्रुप सक्रिय असतात. त्यामुळे महिलांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाणार आहे.

महिला सुरक्षितेसाठी यापूर्वीच योग्य पावले उचलण्यात आली आहे त्याला आता विविध उपक्रमांद्वारे अधिक लक्ष देण्यात आले आहे रात्रीच्या वेळी महिलांना सुरक्षित वातावरण वाटावे यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष असणारे असे अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.