भर मांडवात बॉम्ब फोडून शाहू महाराजांना संपवण्याचा कट दामू जोशी याने केला होता?

देशभक्त आणि स्वातंत्रसैनिक यांची एक वेगळी व्याख्या आहे. छत्रपती शाहू महाराजांचे स्वातंत्रसैनिकांना पाठबळ होते का? स्वातंत्रचळवळीला पाठींबा होता का? या बाबत अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचा आपण काही दिवसात सखोल मांडणी करुच.

तुर्तास छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्येच्या विवाहात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या बोगस क्रांन्तीकारक दामू जोशी याचा हा किस्सा.

तर,

देशभक्तीच्या नावाने दरोडे घालणे ही दामू जोशीची विकृती होती. करवीर संस्थानात दहशतवादी कारवाया केल्यास इंग्रज छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात जातील अशी या कारवायांमागची शक्यता वर्तवली जाते.

स्वातंत्र्याच्या नावाने दरोडे घालणाऱ्या या दरोडेखोरांचा बंदोबस्त शाहू महाराजांनी केला होता.

शाहू महाराजांची ही कारवाई पाहून केसरी मध्ये शाहू महाराजांवर टिका करण्यात आली.

यामधील काही वाक्य खालीलप्रमाणे होती.

  • मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते, अशी महाराजांची स्थिती झाली आहे.
  • राजकीय चळवळींपासून कोल्हापूरचे रक्षण करण्यापेक्षा त्यांच्या मालमत्तेचे, अब्रुचे वा जिवाचे हल्लीपेक्षा अधिक संरक्षण करण्यास कोल्हापूर दरबारास पुष्कळ मार्ग होते.
  • कोल्हापूरचे महाराज हे आमच्या चांगल्या संस्थानिकात मोडतात खरे, पण पोटचे झाले म्हणून काय झाले? आडवे आल्यास कापून काढल्याखेरीज इलाज नसतो.
  • महाराज आमचे शत्रू की आम्ही महाराजांचे शत्रू याचा निकाल लागल्याखेरीज राहणार नाही.

ब्रिटीशांविरोधात कारवाया करण्यासाठी दहशतवादी तरुणांनी मुद्दाम करवीर संस्थान निवडले होते. वेदोक्त प्रकरणात त्यांच्या पूर्ण पराभव झाल्यामुळे शाहू महाराजांचा सूड घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

अशापैकी दामू जोशी हा होता. हा शिवाजी क्लबमधील सर्वात धाडसी तरुण म्हणून ओळखला जात. १९०२ साली व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांचा पाठलाग करुन त्याला ठार मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पण त्यात तो अयशस्वी ठरला होता.

त्यानंतर तो पुण्यात आला. पुण्यातून कोल्हापूरात येवून चोऱ्यामाऱ्या करणे, घरफोड्या करणे हे त्याचे उद्योग सुरू झाले. जोशी व त्याचे तीन सोबत हे उद्योग करत असताना पोलीसांनी त्याला पकडले. न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठून जेलात पाठवले.

१९०६ साली ते तुरुंगातून सुटले. तुरूंगातून सुटताना दरोड्याचे सत्र पुन्हा सुरू झाले. पुन्हा त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मात्र तुरूंगातून सुटून त्यांनी गुप्त कारवाया करण्यावर भर दिला.

स्वातंत्र मिळवणे या गोष्टीचा दामू जोशी आणि सहकाऱ्यांचा काहीच संबंध नव्हता. उलटपक्षी करवीर संस्थानवर इंग्रजांकडून कारवाई व्हावी या हेतूने, वेदोक्त प्रकरणाचा बदला घ्यावा या इच्छेने त्यांचे उपद्व्याप सुरू राहिले.

कर्नल फेरीस यांच्यावर बॉम्ब टाकून त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला.

याकामासाठी वेळ ठरवण्यात आली होती ती छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाई तथा अक्कासाहेब यांच्या लग्नाची.

कर्नल फेरीस यांच्यासोबत खुद्द छत्रपती शाहू महाराज व संस्थानातील वरिष्ठ लोकांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठीच हा कट बॉम्ब-फोडून करण्याचे नियोजन करण्यात आले.

करवीरच्या राजकन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब यांचा विवाह जुन्या राजवाड्यात दिनांक २१ मार्च १९०८ रोजी ठरवण्यात आला. देवासचे राजे तुकाजीराव यांच्यासोबत हा विवाह नियोजित करण्यात आला.

त्यासाठी राजवाड्याच्या अंगणात दुमजली आलिशान मंडप घालण्यात आला होता. देवासचे राजे तुकोजीराव आपल्या सहाशे लोकांसह खास रेल्वेने कोल्हापूरात येण्याचे ठरले होते.

दरम्यानच्या काळात शाहू महाराजांचे दिवाण सबनीस व भास्करराव जाधव यांच्यामुळे ब्रम्हवंद कोपला होता. भास्करराव जाधव यांना या काळात ब्रम्हवृंदाकडून मारहाण देखील करण्यात आली.

या निमित्ताने दामू जोशी व नारायण जोशी हे दोघे जहाल गटाचे पुढारी गणपतराव मोडक यांच्याकडे गेले. तिथे दामू जोशी याने कर्नल फेरीसचा वध करण्याचा विडा उचलला. मोडक यांनी यासाठी छत्रपतीच्या कन्येच्या विवाहादरम्यान हा कट पुर्णत्वास न्यावा असे सांगितले.

मात्र ही गोष्ट दामू जोशी याला पटली नाही. कारण या कटात महाराजांच्या जीवाला देखील धोका होता. मात्र मोडक यांनी दामू जोशी यास ए.डी कुलकर्णी या कट्टर ब्राह्मण्यवादाची भेट घडवून आणली.

या भेटील दामू जोशी हे कृत्य करण्यास तयार झाला. कर्नल फेरीस ही बडी आसामी असल्याने तो महाराजांच्या सोबतच लग्नमंडपात असेल हे स्पष्ट होते. अशा वेळी बॉम्ब फो़डल्यास त्यामध्ये महाराज व त्यासोबत इतर वरिष्ठ अधिकरी व नातलगांचा जीव जावू शकतो हे स्पष्ट असताना देखील दामू जोशी बॉम्ब फोडण्यास तयार झाला. 

या विवाह सोहळ्याची माहिती मिळाल्यानंतर दामू जोशी फेब्रुवारी १९०८ मध्ये पुण्याला गेला.

तिथे त्याने आर.बी. गद्रे यांना गाठले. त्यांच्याकडून त्याला जी.पी. बापट यांची माहिती मिळाली. त्यांच्या शिफारसीवरून दामू जोशी बापटांना जावून भेटला.

दामू जोशी याने बापटांकडे बॉम्बची मागणी केली. बापटांनी बॉम्ब कशासाठी हवा हे विचारताच जोशीने सांगितले की,

कर्नल फेरीस व करवीर संस्थानातील काही दृष्टांना मारण्यासाठी हा बॉम्ब हवा आहे.

बापट दामू जोशी याला घेवून भांबुर्डे गावातील पेरूच्या बागेत गेले. तिथे बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

हा बॉम्ब २१ मार्च पूर्वी दामू जोशी यास कोल्हापूरात मिळेल असा ठराव झाला. दामू जोशी भर मांडवात हा बॉम्ब फोडेल, त्याचे लक्ष्य कर्नल फेरीस असले तरी या बॉम्बमुळे छत्रपती महाराज व मांडवातील प्रमुख व्यक्ती देखील मृत्यूमुखी पडण्याची शक्यता होती.

ठरल्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्यात आला. बापटांनी हा बॉम्ब गद्रे यांच्या ताब्यात दिला. गद्र्यांनी हा बॉम्ब एका ट्रंकमधून गं.वि. गोखले यांच्या हवाली केला. गोखल्यांनी ती ट्रंक पुण्याहून कोल्हापूरात आणली व फडणीस यांच्या स्वाधीन केली.

दामू जोशी याला बॉम्ब असणारी ट्रंक मिळाली ती तारिख होती २३ मार्च.

इथेच माशी शिंकली. लग्नाच्या दोन दिवसानंतर त्याला बॉम्ब मिळाल्याने त्याचा डाव फसला. पुढे ही ट्रंक बेळगावला गेली. तिथून पुढे ती कोल्हापूर संस्थानात परत आणण्यात आली. नंतरच्या काळात कर्नल फेरीस याला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला व यामध्येच शाहू महाराजांच्या कन्येच्या विवाहातच घातपात घडवण्याचा कट उघडकीस आला.

संदर्भ 

  •  राजर्षी शाहू राजा व माणूस (कृ.व. सुर्यवंशी)  : प्रकरण शत्रूंच्या कारवाया. दामू जोशी (पृ.क्रमांक ३६०)
  •  धनंजय कीर : राजर्षी शाहू महाराज पृ. क्रमांक १९७

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.