जगात कितीही बदल होऊ द्या झाडीपट्टीमध्ये दंडारीचे महत्व अजूनही टिकून आहे

झाडीपट्टीत पिकातील तण काढण्याचं काम झालं आणि धान भरायला लागले की, दिवाळीचा सन येतो. झाडीपट्टीच्या दिवाळीत गायगोधन, खण, भोगी संपून भाऊबीज येते. भाऊबिजेची ओवाळणी सुरु असतांनाच झाडीपट्टी रंगभूमीचे पडदे उघडतात.

वर्षभर समाजमंदिरात गुंडाळून ठेवलेले हाताने रंगवलेले पडदे बाहेर काढले जातात आणि स्टेज सजवला जातो.

गावातले हौशी पुरुष मिश्या मुंडवून साड्या नेसतात. गावातलेच धोतरछाप मेकअपमन नोवामध्ये खाकी पावडर मिसळवून कलाकारांचा मेकअप करायला बसतात. डोक्यावर गंगावन, हातात बांगड्या, कानात बिऱ्या घालून काजळ, पावडर, लाली लावून पुरुषच बायकांचा वेष घेतात. तर दुसरीकडे धोतर-बांडी किंवा पँट-शर्ट घातलेल्या आणि पिळदार मिशा असलेल्या मंडळींचा मेकअप सुद्धा उरकला जातो. 

अधूनमधून लाऊड स्पीकरच्या कर्णमधुर आवाजाचे गोडवे गाणारा एखादा व्यक्ती लाऊड आवाजात दंडारीची माहिती देत जातो.

“दंडार रसिक जन हो लक्षात असु द्या..!! खास लोक आग्रहास्तव, आज आणि आजचेच दिवस…”

रात्रीचे १०-११ वाजेपर्यंत दंडारीची तयारी पूर्ण होते आणि गावातले लोकं सुद्धा जेवणखावण आटपूण गरमागरम गोधड्या अंगावर टाकून दंडारीच्या स्टेजसमोर गर्दी करायला लागतात. स्टेजसमोर गर्दी व्हायला लागली की गावातलल्या दोन-चार राजकारण्यांच्या हस्ते दंडारीचं उदघाटन सुरु होतं.

उदघाट्न समारंभात सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील आणि पुढाऱ्यांचे भाषण संपले की, अखेर स्टेजच्या मागे असलेले सर्व कलाकार हातात अगरबत्त्या घेऊन स्टेजवर हजर होतात आणि दंडारीच्या गणाला सुरुवात होते.

गणराया वंदितो पाया… वंदितो पाया… वंदितो पाया...

यावे शिवतनया धावोनि… यावे शिवतनया धावोनि…

गण संपला की, रंगमंचावरचा सर्व कलाकार स्टेजच्या आता जातात आणि रंगमंच मोकळा होती. रंगमंचाच्या एका कोपऱ्यात मृदूंग, हार्मोनियम आणि चिपळ्या वाजवणारे काही लोकं येऊन बसतात. त्यानंतर रंगमंचावर कलाकारांचा प्रवेश होतो आणि नाटकाप्रमाणेच दंडारीची सुरुवात होते. 

दंडारीत नाटकासारखेच संवाद असतात, पण यात नाटकापेक्षा एक वेगळेपण असतं. 

ते म्हणजे दंडारीत साधारणपणे १०-१२ वाक्यांचा संवाद पूर्ण झाल्यावर कोपऱ्यात असलेले लोकं त्या संवादालाच गाण्याच्या चालीवर गेला सुरुवात करतात. गाणं सुरु झालं की स्टेजवरचे कलाकार आपापली स्वतःची जागा बदलतात आणि येरझारा घातल्याप्रमाणे अभिनय करायला लागतात.

हाच क्रम संपूर्ण दंडार संपेपर्यंत चालतो. कलाकारांचे १०-१२ संवाद आणि त्यानंतर त्याचेच गाणे गेले जाते. अधूनमधून समोर बसलेले प्रेक्षक आवडलेल्या पात्राला वैयक्तिक रित्या १०-२० रुपयांचे पारितोषिक देत जातात. यासोबतच प्रेक्षकांकडून दंडार मंडळाला सुद्दा १० रुपयांपासून १ हजार रुपयापर्यंत देणग्या दिल्या जातात. या देणग्यांमधूनच दंडारीला उत्पन्न मिळतं त्यामुळे सर्व लोकांची यादी अगदी लाऊड आवाजात सांगितली जाते. 

ही झाली रात्री सादर केली जाणारी दंडार, पण दंडारीची परंपरा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

या दंडारीमध्ये एका जागी स्थिर राहून सादर केली जाणारी भडकी दंडार आणि गावभर फिरून सादर केली जाणारी भटकी दंडार असे दोन प्रकार पडतात. यात भडक्या दंडारीत खडी दंडार, बैठी दंडार आणि परसंगी (प्रसंगी) दंडार सादर केली जाते. खडी दंडार आणि बैठी दंडार ही तमाशासारखी असते तर प्रसंगी दंडार ही नाटकासारखी असते.

भाऊबीज झाल्यानंतर उत्तर झाडीपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर मांडया भरतात. या मांडया म्हणजे यात्रेसारखे आठवडी बाजार असतात. याच मंडयांमध्ये दिवस रात्र भडक्या दंडारीचे प्रयोग सादर केले जातात. या दंडारींना स्थानिक नेत्यांकडून वर्गणी मिळते तर प्रेक्षकांकडून काही पैसे मिळतात.

मात्र या भडक्या दंडारीचं मूळ स्वरूप असलेली भटकी दंडार हे पूर्णपणे वेगळी असते.

भडकी दंडार ही प्रामुख्याने नागरी समाजाकडून सादर केली जाते, तर भटकी दंडार ही आदिवासी समाजातील लोक सादर करतात. आदिवासी समाजातले ८-१० कलाकार लुंगीसारखे रंगीत कपडे घालतात. पायात घुंगरू बांधून गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालतात. डोक्यावर मोराच्या पिसांपासून बनवलेला मोठा झुपका त्यांच्या डोक्यावर असतो.

त्यानंतर हातात १.५ ते २ फूट उंचीची टहारा नावाची काठी घेऊन गावभर वेगवगेळ्या ठिकाणी नाचतात. हे एक प्रकारचं लोकनृत्य आहे. दंडारीचा हा प्रकार पश्चिम विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये पाहायला मिळतो.

याच लोकनृत्यामधून दंडारीची परंपरा निर्माण झाली असं सांगितलं जातं.

झाडीपट्टीच्या परंपरा आणि झाडीबोलीचे गाढे अभ्यासक हरिशचंद्र बोरकर यांनी ‘झाडीपट्टीची दंडार’ मध्ये दंडारीच्या उगमाबद्दल सांगितलंय.

त्यांच्या मते, “झाडीबोलीत भाताच्या शेताला दंड म्हणतात तर झाडाच्या फांदीला डार म्हटलं जातं. पूर्वी मळणी झाल्यानंतर धान्य घरी आणण्याच्या प्रसंगी फांदी हातात घेऊन शेतकरी लोकनृत्य करत असावेत आणि त्याच लोकनृत्यामधून दंडारीची उत्पत्ती झाली असावी.”

या लोकनृत्याचं खरं स्वरूप असलेली भटकी दंडार हळूहळू स्थिर व्हायला लागली. परंतु १९ व्या  शतकापासून दंडारीत खऱ्या अर्थाने बदल व्हायला लागला. इसवी सन १८८६ मध्ये सांगली जिल्ह्यातील नाटक कंपन्या नाटक सादर करण्यासाठी नागपुरात यायला लागल्या. तेव्हा झाडीपट्टीमधील कलावंतांनी त्या नाटकांपासून प्रेरणा घेतली. त्याच प्रभावाने दंडारीच्या कलाकारांनी दंडारीत नाटकासारखे बदल केले. 

पुढे यातूनच झाडीपट्टी रंगभूमी तयार झाली, पण झाडीपट्टीची लोककला असलेली दंडार अजूनही स्वतःचे अस्तित्व टिकवून आजही सुरु आहे. काल भाऊबीज झाली त्यामुळे आजपासून झाडीपट्टीच्या मांडया आणि गावोगावच्या चौकात दंडारीची सुरुवात होईल. 

हे ही वाच भिडू 

 

2 Comments
  1. अरूण झगडकर says

    छान लिहिले आहे.

  2. अरूण झगडकर says

    अगदी खरे आहे. दंडारीवर छान लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.