फाल्गुनी पाठक दांडियामध्ये गाण्याचे पैसे किती घेते?

नवरात्र सुरु झाली आहे. मोठमोठ्या लॉन्सवर दांडियाचे शोज रंगत आहेत. भारी भारी गाड्यातून घागरो चोली उतरून गरबा खेळायला आत जात आहेत. मोठमोठे सेलिब्रेटी गेस्ट येत आहेत. आम्ही हातात टिपऱ्या घेऊन गुजराती गरब्याचा दिमाख बघतोय. बाउन्सर आत सोडतील का याची वाट बघतोय.

आतून बाहेर फक्त एकच ओळखीचा आवाज येतोय, नव्वदच्या दशकापासून गरबा घुमवाणारा आवाज फाल्गुनी पाठक.

गुजरात मधल्या एका मिडल क्लास कुटुंबात तिचा जन्म झाला. आईवडिलाना मुलगाच हवा होता. मोजून चार मुली झाल्या. देवाच्या मनात नाही म्हणून त्यांनी हार मानली होती. परत आठ वर्षांनी शेवटचा अटेंप्ट केला. परत मुलगी झाली. नाव ठेवल फाल्गुनी. मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून वाट बघितली होती घरच्यांनी ठरवलं फाल्गुनीलाच मुलगा म्हणून वाढवायचं.

तिच्या सगळ्या मोठ्या बहिणी तिला लहानपणापासून मुलांचे कपडे घालायच्या, केस देखील मुलांसारखे कापले जायचे. पोरीला मात्र गाण्याची खूप आवड होती. खर तर घरातले सगळेच कायम काही न काही गुणगुणत असायचे, तेच संस्कार फाल्गुनीवर झाले.

कधी कुठे गाणं शिकायला वगैरे गेली नाही पण प्रत्येक गुज्जू गल्लीमध्ये खेळल्या जाणारा गरबाचा ठेका तिच्या रक्तातच होता.

एकदा त्यांच्या घराजवळच्या दांडियामध्ये ती गायला गेली. तिसरी चौथी मध्ये असेल. कोणीतरी तिला कौतुकाने कोरसमध्ये उभ केलं. पण जेव्हा गाण सुरु झालं तेव्हा ही छोकरी पुढे येऊन अगदी ठेका पकडून नाचत गाऊ लागली. ऑर्गनायझरनां खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी तिला एक सोलो गायची संधी दिली. तिने तो दांडिया गाजवून टाकला.
सुरवातीला वडिलांनी शाबासकी दिली पण जेव्हा तीला जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये गायची संधी मिळाली.

तेव्हा त्यांनी नकार दिला. फाल्गुनी नजर चुकवून गाण्यासाठी पळून गेली. पण घरी आल्यावर वडिलांनी चांगलाच चोप दिला. असं वारंवार घडू लागलं.

पण तीच गाण ते थांबवू शकले नाहीत. फाल्गुनीला डॉक्टर इंजिनियर बनवायचं स्वप्न त्यांनी गुंडाळून ठेवलं. तिच्या तर अगदी डोक्यातच बसल होतं की आपण जन्मालाच आलोय गाण्यासाठी. आणि तसच घडल. अगदी दहा वर्षाची होती तेव्हा तिला एका गुजराती सिनेमात गाण्याची संधी मिळाली. सगळ्या गुजरातमध्ये दांडियासाठी तीच नाव तेव्हा पासून गाजू लागलं.

फाल्गुनी पाठक म्हणजे गरब्याची सचिन तेंडूलकर झाली.

नव्वदच दशक सुरु झालं.

पारंपारिक गरब्याला दांडिया नाईट्समध्ये बदल याच काळात सुरु झाला. फाल्गुनीने देखील स्वतःचा ता थैय्या हा ग्रुप सुरु केला. मोठमोठ्या मंडळाकडून तिला सुपारी मिळू लागली. तिच्या नावाची कीर्ती मुंबईपर्यंत पोहचली होती. तिथल्या गुजराती समाजातूनही बोलवण येत होतं. याचा अर्थ म्युजिक कंपनीपर्यंत तीच नाव पोचायला कितीसा वेळ लागणार होता.

युनिव्हर्सल म्युजिक कंपनीने तिचा पहिला अल्बम बनवला. साल होतं १९९८. आधी सुरवातीला ते तिचा टिपिकल दांडिया सॉंगजचा अल्बम बनवणार होते मग त्यांनी त्यात बदल केला. गाण्याचा ठेका दांडियाचाच होता पण लुक अगदी पॉप अल्बम प्रमाणे होता. मुनमूनसेनची लेक रिया सेनवर चित्रित झालेलं हे एक टीन सॉंग होतं. 

“याद पिया की आने लगी हाय भिगी भिगी रातो में”

गाण रातो रात हिट झालं. या गाण्याच्या शेवटी गरबाच्या शोमध्ये गाणारी फाल्गुनी दिसली. गाण संपूर्ण देशभर गाजलं. एखाद्या क्युट गुब्ब्या गालावर खळी पडणाऱ्या मुलासारखी दिसणारी फाल्गुनी घराघरात ओळखली जाऊ लागली. तिने गरब्याला गुजराती गल्लीतून बाहेर काढून मुंबईच्या मोठ्या हायफाय इव्हेंट मध्ये बदललं होतं आणि ती त्याची अनभिषिक्त महाराणी बनली होती.

तिचे एकापाठोपाठ एक अल्बम येऊ लागले. मैने पायल है छनकाई मध्ये कठपुतली डान्सला दिलेला मॉडर्न टच, मेरी चुनर उडउड जाये मध्ये आयेशा टाकियाला, आय्यो रामा हाथ से मध्ये दिव्या खोसला अशा अनेक नव्यां मॉडेल्सना दिलेली संधी, शिवाय प्रत्येक गाण्यात स्वतःचा फ्रेश वावर यातून फाल्गुनी पाठक हा एक ब्रांड बनवला. तिची गोड गाणी नुकताच फेमस झालेल्या केबल टीव्हीवर रात्रंदिवस वाजत होती. शाळाकॉलेजला जाणाऱ्या मुलामुलीना ती जाम आवडू लागली होती.

युफोरिया,आलेशा चिनॉय, लकी अली,शान, सोनू निगम, बॉम्बे व्हायकिंगच्या नव्या दमाच्या ईंडीपॉपच्या जगात या दांडिया गाणाऱ्या मुलीनेही स्थान मिळवल.

पण काळगतीची चक्रे कोणाला चुकली आहेत? नव्वदच दशक माग पडल. केबल टीव्हीवर देखील शेकडो म्युजिक चनल्स त्यांना खुराक पोचवायला काटा लगा टाईपची लाखो रिमिक्स गाणी यांचा भडीमार झाला. नाजूक रिदम वाल्या अल्बम्सची मागणी घटली. फाल्गुनी स्पर्धेत मागे पडली. टीव्हीवर दिसायची कमी झाली. पण दांडिया थांबला नव्हता.

एरव्ही वर्षभर गायब असणारी फाल्गुनी नवरात्रीच्या मौसमात हमखास उगवते.

गुजरातपासून ते कॅलीफोर्नियापर्यंत तिला मागणी आहे. आजही लोकांना उत्सुकता असते की फाल्गुनी पाठक दांडियामध्ये गाण्याचे पैसे किती घेते?

एका मंडळाच्या कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला तिची सुपारी किती ती माहिती सांगितली. तीन वर्षापूर्वी फाल्गुनी पाठकने एका नवरात्रीसाठी जवळपास दीड कोटीरुपये घेतले होते जीएसटी पकडून. जेव्हा ती फॉर्मात होती तेव्हा दोन तीन कोटी सुद्धा कमावले आहेत. अजूनही एकही दांडियावाला सिंगर तिच्या आसपाससुद्धा पोहचला नाही.

काही दिवसापूर्वी भारताच्या सर्वात श्रीमंत लग्नात, मुकेश अंबानीच्या पोरीच्या लग्नातला गरबा तिनेच गायला होता. देशातले सगळे मोठे मोठे सेलीब्रेटी श्रीमंत माणस स्वतः अंबानी तिच्या गाण्यावर ठेका धरत होते.

तीने वयाची आता पंचावन्न वर्षे ओलांडली आहेत. लग्नाच्या नादाला न लागता गेली तीस वर्षे इंधवा विनवा गयी थी मेरे सैया म्हणत अख्ख्या देशाला नाचवल. गुजराती गरब्याला जगभरातल्या स्टेजवर अच्छे दिन आणायचं खर क्रेडीट तिलाच आहे हे नक्की.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.