पाकिस्तानी जेलमध्ये ५ वर्ष घालवणारा सिक्रेट एजंट आता पंजाबमध्ये सायकलरिक्षा चालवतो.

आजकाल आपण सिनेमात सिक्रेट एजन्टच्या स्टोरी पाहतो. सलमान खान किंवा अक्षय कुमार सारखे हिरो स्पाय बनून अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करतात, लाखो लोकांना वाचवतात. जेम्स  बॉण्ड, मिशन इम्पॉसिबल वगैरे बघून आपल्याला स्पाय लोकांची लाईफ स्टाईल अशीच असेल असं वाटत.

देशासाठी आपली आयडेंटिटी लपवून लढणाऱ्या प्रत्येक स्पायची स्टोरी अशी सिनेमा सारखी लिजेंडरी नसते, त्यांना बऱ्याच खाच खळग्यांना तोंड द्यावे लागते.

अशीच गोष्ट डॅनियल उर्फ बहादूर मस्सी या स्पायची. तो जन्मला ददवान या पंजाबमधल्या छोट्याशा गावात.  हे गाव पाकिस्तानी बॉर्डरच्या अगदी जवळ आहे. इथली भाषा, त्यांची संस्कृती, खाणेपिणे दिसणे बोलणे अगदी सीमेपलिकडच्या लोकांसारखेच. गरिबीदेखील तशीच.

गोष्ट आहे १९९२ सालची.

बहादूर मस्सी तेव्हा पंचवीस वर्षांचा असावा. मजुरी करायचा. शिक्षण काही जास्त नव्हतं मात्र बोलायला वागायला चलाख होता. भारतीय गुप्तचर संघटना रॉचे एक खोखर साहेब म्हणून ऑफिसर होते. ते गुरुदासपूरचे. त्यांची नजर या मस्सीवर पडली. त्याला त्यांनी आपला एजंट म्हणून काम करण्यासाठी तयार केलं.

अशिक्षित असलेल्या मस्सीच चार आठवडे ट्रेनिंग झालं. त्याला काही मोठं काम नव्हतं, लपून छपून बॉर्डरच्या पलीकडे जायचं. तिथले फोटो काढायचे, मॅप बनवायचा आणि परत यायचं. मस्सी जीवावरच धोका उचलायला तयार झाला.

त्याला नवीन नाव मिळालं डॅनियल.

पाकिस्तानमधल्या एका ट्रिप साठी त्याला ३००० रुपये मिळणार होते.

देशभक्ती तर होतीच पण शिवाय घरच्यांचं पोट भरायला हे पैसे उपयोगी पडणार होते.

पंजाब मधल्या डेरा नानक बाबा येथून मस्सीला पाकिस्तानात घुसवलं गेलं. त्याला रॉने एक कॅमेरा दिला होता, सोबत पाकिस्तानचा नागरिक असल्याची खोटी कागदपत्रे आणि पासपोर्ट.

मस्सी धाडसाने गेला आणि तीन दिवसांनी मिशन फत्ते करून आला. त्याने पाकिस्तानात जाऊन तिथल्या पुलाचे, रस्त्यांचे फोटो काढले होते याशिवाय रेल्वे स्टेशन वर जाऊन तिथल्या वेळापत्रकाचेदेखील फोटो काढले होते.

पुढच्या काही महिन्यात त्याने पाकिस्तान मध्ये अनेक वाऱ्या केल्या. अनेक दिवस पाकिस्तानमध्ये मुक्काम केला. सुरवातीला त्याला छोटे छोटे असाइनमेंट दिले जायचे नंतर नंतर त्याच्यावर महत्वाच्या गोपनीय जबाबदाऱ्या देण्यात येऊ लागल्या.

पण दुर्दैवाने जुलै १९९३ मध्ये त्याला पाकिस्तानच्या पोलिसांनी पकडले. आयएसआयच्या हेरांच्या मदतीने मस्सीचे लिंक शोधले गेले. पाकिस्तानी आर्मीचे जवान येऊन त्याला उपाशी पोटी जनावराप्रमाणे बडवत असत. मस्सी वर अनेक अमानुष अत्याचार करण्यात आले मात्र त्याने एकदाही तोंड उघडले नाही.

मस्सीला रावळ पिंडी, सियालकोट, लाहोर, नरोवाल अशा वेगवेगळ्या तुरुंगात चार वर्षे ठेवण्यात आलं.

निरनिराळ्या प्रकारे त्याच्या कडची माहिती काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला. अखेर १९९९ साली त्याची सुटका झाली.

डॅनिअल मस्सी सांगतो,

“त्यावेळी पाकिस्तानच्या तुरुंगात जवळपास १५० भारतीय कैदी असतील. प्रत्येकाचे हाल माझ्या प्रमाणेच झाले होते. अनेकांना वेड लागलं होता, काहीजणांना पाक पोलिसांचा मार खाऊन पॅरालिसिसचा अटॅक आला होता. कित्येक जण कायमचे जायबंदी झाले होते.”

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात भारत सरकारने अचानक रॉचे कोव्हर्ट ऑपरेशन बंद करण्याचे आदेश दिले. अनेक एजंटचे आयुष्य उध्वस्त झाले. कित्येकांनि जेल मध्ये अत्याचार सहन केले मात्र त्यांची आयडेंटिटी सिक्रेट असल्या मुळे त्यांच्या कुटुंबा पर्यंत मदत पोहचली नाही.

आज डॅनियल ददवानच्या एका खोलीच्या घरात आपली पत्नी व तीन मुलांसह राहतो.

IMG 20170129 160555 1 1 wvjna3
फोटो क्रेडिट – ARRE.CO.IN

शिक्षण नसल्यामुळे त्याला मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. काही वर्षांपूर्वी त्याने सायकल रिक्षा घेतली व त्यावरच त्याचा व त्याच्या कुटुंबाचा गुजारा चालू आहे.

डॅनियल म्हणतो,

“मी जे केलं ते देशासाठी केलं. मला परत संधी दिली तर परत तसेच करेन. मला माझ्या इतिहासाबद्दल कोणताही पश्चाताप होत नाही मात्र माझेच देश बांधव आज मला एखाद्या सम्गलरप्रमाणे वागणूक देतात तेव्हा मला त्याचं वाईट वाटतं .”

मध्यंतरी कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तान कोर्टात सुनावणी झाली तेव्हा डॅनियल व टायच्यासारख्या विपन्नावस्थेत असलेल्या स्पायची नावे पुढे आली. मध्यंतरी पंजाब सरकारने त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये व कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आवाहन केले होते मात्र त्याचे पुढे काय झाले याची माहिती मिळू शकली नाही.

संदर्भ- इंडिया टुडे

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.