२०० किलोच्या किंगकाँगला उचलून फेकणारा पहिलवान सिनेमाचा बजरंगबली बनला

काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर ‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवल्या गेल्या. ज्यांनी या मालिका आधी पाहिल्या होत्या त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. जी लोकं त्यावेळेस लहान होती आणि त्यांनी काहीसं धूसर बघितलं असावं त्यांना या मालिकांचा नव्याने आस्वाद घेण्यात आला. इतकं प्रगत तंत्रज्ञान नसतानाही भारताने जगाला आदर्श वाटाव्या अशा या मालिका निर्माण केल्या, याची जाणीव नव्या पिढीला झाली.

एकूणच घरात असणाऱ्या सर्व पिढीच्या माणसांनी या मालिकांचा आस्वाद घेतला आणि लॉकडाऊन काही प्रमाणात सार्थकी लावला. ‘रामायण’ पाहताना एक कळालं की सर्व कलाकार साकारलेली प्रत्येक भूमिका जगले आहेत.

अरुण गोविल राम म्हणून शोभले आहेत तर बजरंगबलीच्या भूमिकेत आहेत दारा सिंग.

कायम चेहऱ्यावर एका वेगळ्या प्रकारचा मिश्कीलपणा, डोळ्यांमध्ये असलेली रामाविषयी भक्ती असे अनेक भाव ‘रामायण’ मालिकेतील हनुमानामध्ये पाहायला मिळाले. मुळात राम, लक्ष्मण यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर होती. पण बजरंगबली यांची नेमकी प्रतिमा कशी असावी हे दारा सिंग यांच्यामुळे कळालं.

ज्यांनी दारा सिंग यांनी साकारलेला हनुमान पाहिलाय त्यांच्या मनात कायमस्वरूपी ती प्रतिमा तशीच राहील.

दारा सिंग यांच्या आयुष्यावर एक नजर टाकल्यास असं दिसून येतं की, हा एक विलक्षण माणूस होता. पंजाबी मुंडा असलेला दारा सिंग यांनी लहानपणापासूनच शेतीची कामं करायला सुरुवात केली. घरचं वातावरण बऱ्यापैकी सधन होतं. त्यामुळे कुटुंबीयांनी अगदी तरुण वयात दारा सिंग यांचं लग्न लावून दिलं.

संसारात मुलगा कमी पडू नये म्हणून दारा सिंग यांच्या खाण्यापिण्यावर घरच्यांनी विशेष लक्ष दिले.

दररोज उठल्यावर दूध – दही , नाश्त्याला १०० बदाम असा दारा सिंग यांचा खुराक होता. पंजाबी कुटुंब असल्यामुळे शाकाहारी – मांसाहारी अशा अनेक पदार्थांची रेलचेल त्यांच्या रोजच्या खाण्यात असायची. या सर्व गोष्टींचा फार कमी वयात दारा सिंग यांच्या शरीरावर चांगला परिणाम झाला.

कालांतराने दारा सिंग कुस्ती खेळू लागले. दारा सिंग यांनी कुस्तीची अनेक मैदानं मारली. सिंगापूर, मलेशिया सारख्या जागतिक स्तरावरच्या कुस्तीच्या स्पर्धा त्यांनी जिंकल्या. अनेक देश गाजवून १९५२ ला दारा सिंग भारतात परत आले. पुढील दोन वर्षांत १९५४ साली दारा सिंग यांना भारतीय कुस्तीचे चॅम्पियन म्हणून ओळख मिळाली.

१९५९ साली कोलकाता येथे कॉमनवेल्थ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये कॅनडा आणि न्यूझीलंड देशातल्या कुस्तीपटुंनी दारा सिंग यांना त्यांच्यासोबत कुस्ती खेळण्याचं ओपन चॅलेंज दिलं.

परंतु या दोघांना मात देऊन दारा सिंग यांनी पुन्हा एकदा कुस्ती क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला.

दारा सिंग यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय मुकाबला मानला जातो तो म्हणजे किंगकाँग या कुस्तीपटू सोबत त्यांचा झालेला सामना.

याला कारण असं की, दारा सिंग यांचं वजन १३० किलो तर किंगकाँगचं वजन २०० किलो होतं. सर्वांना वाटलं हा मुकाबला दारा सिंग हरतील. पण कोणत्याही खेळात शक्ती कमी आणि युक्ती जास्त वापरली तर आपण कोणावर सुद्धा मात करू शकतो. झालंही असंच…

दारा सिंग यांनी कुस्ती मध्ये असणाऱ्या डावपेचांचा असा वापर केला की त्यांनी २०० किलो वजनाच्या किंगकाँगला रिंगमधून बाहेर फेकलं.

दारा सिंग यांची कुस्तीमधली कारकीर्द जोरात सुरू होती. त्याच काळात त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

१९५२ साली मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या ‘संगदिल’ सिनेमात दारा सिंग यांनी पहिल्यांदा अभिनय केला.

यानंतर बॉलिवुड मधील अनेक सिनेमांमध्ये दारा सिंग यांनी काम केले. परंतु दारा सिंग यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती ‘रामायण’ या मालिकेमुळे.

१९७६ साली आलेल्या ‘बजरंगबली’ सिनेमात दारा सिंग यांनी प्रथम हनुमान साकारले. त्यानंतर बरोबर १० वर्षांनी १९८७ साली प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी पुन्हा एकदा हनुमानाची भूमिका रंगवली.

जेव्हा रामानंद सागर यांनी दारा सिंग यांना या भूमिकेविषयी विचारले तेव्हा दारा सिंग यांनी सुरुवातीला नकार दिला होता. कारण ते ६० वर्षांचे होते.

परंतु रामानंद सागर यांना माहीत होतं की, हनुमानाच्या भूमिकेला दारा सिंग योग्य न्याय देऊ शकतील. अखेर दारा सिंग भूमिका करण्यासाठी तयार झाले.

पुढे दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका अजरामर केली.

तेव्हा ‘रामायण’ मालिकेचं सुरतला शूटिंग सुरू होतं. शूटिंग झाल्यावर लोकं दारा सिंग यांच्या पाया पडायचे. इतकंच नव्हे, तर गुजरात येथील उमरगाव गावात दारा सिंग यांच्या हनुमानाच्या तसबीरीची पूजा केली जायची. दारा सिंग व्यायामपटू असल्याने त्यांच्या खाण्यात नेहमी मांसाहारी पदार्थांचा समावेश असायचा.

पण हनुमानाच्या भूमिकेचं पावित्र्य जपण्यासाठी दारा सिंग यांनी मालिकेदम्यान मांसाहाराचा त्याग केला.

दारा सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात जवळपास ५०० कुस्तीचे सामने लढले. यापैकी एकही सामना ते हरले नाहीत. आणखी एक विशेष गोष्ट अशी, खूपदा अंगापिंडाने मजबूत असलेल्या माणसाला सिनेमात काहीशा खलनायकी भूमिका मिळतात.

परंतु दारा सिंग यांना हिंदी सिनेसृष्टीत चांगल्या भूमिका मिळाल्या. काही कलाकारांना त्यांच्या भूमिकांमुळे वेगळी ओळख मिळते. दारा सिंग जरी आज आपल्यात नसले तरी पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेमुळे त्यांना मिळालेली ओळख कोणीही पुसू शकणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.