दर्गा कोणाचा, हिंदूचा की मुसलमानांचा…?

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये असणारी फेमस धार्मिक ठिकाणं म्हणजे दर्गे…

महाराष्ट्रातील मुसलमान तसेच हिंदूही त्यांच्या दर्शनाला जातात. त्यांच्या दर्शनाला गाव गोळा होतो. अनेक लोकं त्यांना नवस बोलतात.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये या दर्ग्यांमध्ये उरूस भरवले जातात. अनेक दर्ग्यांमध्ये कशिद्याचे ध्वज आणि काठी नाचवली जाते. त्यांना नैवद्य वाहिला जातो. महाराष्ट्रातील अनेक दर्ग्यांमध्ये कुठल्यातरी बाबाची समाधी असते. त्यांची नावे वेगवेगळी असतात.

एकीकडे काही लोक याला मुस्लिम पीर आणि संतांच्या समाध्या म्हणून ओळखतात. पण दुसरीकडे अनेक जागी त्यांची नावे हिंदू म्हणूनही आढळतात.

उत्तर काश्मीरमध्ये जवळपास प्रत्येक गावाचा स्वतःचा एक मोठा असा दर्गा असतो. या दर्ग्याला हिंदू ऋषींचीही नावे दिलेली असतात.

मग दर्गा नेमका आहे कुणाचा? हिंदूंचा की मुस्लिमांचा?

हे दर्गे नेमके सुरु झाले कसे याविषयी अनेक प्रवाह आढळतात. कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये या दर्ग्यांचा उल्लेख नाही. पण गावाकडच्या माणसांनी पांढरे कोंबडे, साखर वेलदोडे, मातीचे घोडे, छोटे पाळणे, रूदार कपडे, मिठाई अशा वस्तू काही संतांच्या चरणी वाहणे सुरु केले.

तेव्हाच्या काळात खेडोपाडी संत आणि अवलिया यांचे येणे जाणे असे. मध्ययुगीन समाजात हिंदू आणि मुस्लिम धर्माची तत्त्वे एकमेकांमध्ये मिसळली होती.

ही परंपरा सुरु होते ती सुफी संप्रदायातून.

इस्लाम आणि हिंदू या धर्मांतील तत्त्वांचा एकमेकांवर मोठा प्रभाव पडला.

तुर्की भाषेतल्या देरगाः शब्दावरून दर्गा शब्द सुरु झाला असे मानले जाते.

उत्तर भारतातील दर्ग्याचे स्वरूप महाराष्ट्रातील दर्ग्यांपेक्षा काही प्रमाणात वेगळे आहे. इस्लाममध्ये व्यक्तिपूजा किंवा इतर कोणत्याही वस्तूची पूजा करणे निषिद्ध मानले गेले आहे. त्यामुळे उत्तर भारतात या दर्ग्यांना झियारत करण्यासाठीचे स्थान म्हणून पाहिले जाते.

झियारत म्हणजे महान लोकांच्या स्मरणस्थळी भेट देणे या स्वरूपात मुस्लिम समाज ही प्रथा पाळताना दिसतो. कित्येक जागी दर्ग्यांना जाणे ही सुन्नत म्हणून (चांगली सवय, महान व्यक्तींच्या आचरणातील काही गोष्टींचे अनुकरण) पाळली जाते.

काश्मिरात काही दर्गे हे मशिदींचा भाग म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. अशा ठिकाणी साधुसंतांनी प्रार्थना केल्या होत्या. म्हणून तेथे दर्गे बांधण्यात आले असं काही लोकांचं मत आहे.

यात काही लोक नाथ संप्रदायाचे होते. तांत्रिक विद्येच्या जोरावर त्यांनी काही चमत्कार करून लोकांना दाखवले. सुफी संत आणि दरवेश यांच्यासाठी दानधर्म म्हणून स्थानिक लोकांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.

अशा जागी त्या संतांचा मुक्काम असायचा. भटकंतीला तत्कालीन धार्मिक जीवनात मोठे समजले गेले. त्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या यात्रा करून आलेल्या अनेक लोकांना संतपद मिळाले.

स्थानिक जनतेला मोठमोठी तीर्थक्षेत्रे दूरवर पडत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना श्रद्धास्थान म्हणून अशा बाबांचे निवासस्थान सोयीचे झाले.

अशा ठिकाणी जेव्हा त्या साधूचे निधन होत असे तेव्हा त्यांच्या समाध्यांवर देऊळ किंवा दर्गा बांधला जाई.

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्थानिक लोक एकत्र जमत.

यालाच म्हणतात उरूस..!

या दर्ग्यांजवळ भरणारी यात्रा म्हणजे उरूस होय. उरूस म्हणजे ईश्वर व भक्त यांचा संयोग मानला जातो. उरुसाला सुफी आणि हिंदू समाजात एक वेगळे अधिष्ठान आहे. हा गावातल्या लोकांचा एकत्र येण्याचा उत्सव असतो. यानिमित्ताने एकत्रितपणे गावात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रद्धेच्या नावाखाली भरवलेले एक स्नेहसंमेलन असे याचे स्वरूप असते.

पुणे जिल्ह्याच्या परिसरात नवनाथ संप्रदायाचे दर्गे हे देवळे म्हणूनच ओळखले जातात. त्यांना गोलाकार घुमट असते आणि एखाद्या मशिदीच्या गुम्बदाचा आकार त्याला दिला जातो.

मात्र त्यावर कळस चढवलेला असतो. अशा ठिकाणी साधूंची समाधी असते पण त्यावर चादर चढवली जाते. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पद्धतींनी त्यांची पूजाअर्चा होत असते.

मुस्लिम तिथं येऊन आयती म्हणत दुआ मागतात तर हिंदू नारळ फोडतात! कव्वाली हा प्रकार इथूनच सुरु झाला.

हा वारसा शिवकालापासून चालत आलेला आहे.

स्वतः शिवाजी महाराजांनी बाबा याकूब यांच्या आशीर्वादासाठी प्रयत्न केले असल्याचे सर्वश्रुत आहे.

अशा अनेक संतांना ग्रामीण समाजात ऋषितुल्य समजण्यात आले. म्हणून तर अनेक किल्ल्यांच्या पायथ्याशी आपल्याला विविध दर्गे आढळतात.

रणबीर कपूर जिथं ‘कून फय कून’ गायला तो दिल्लीचा प्रसिद्ध निझाम अल्-दीन अवलिया दर्गा अतिशय प्रसिद्ध आहे.

येथे परदेशातूनही अनेक लोक येत असतात. मुंबईचा हाजी अली दर्गा काही वर्षांपूर्वी महिलांनी प्रवेश करावा की नाही यावरून चर्चेचे केंद्र ठरला होता.

जयपूरचा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा जगभर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानचे पंतप्रधान भारतात आल्यावर या दर्ग्याच्या वाऱ्या करत.

खुद्द पाकिस्तानमध्ये अनेक दर्ग्यांना घरघर लागली आहे. धर्मांधतेमुळे तेथील काही दर्गे अतिवाद्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. आफ्रिकेमध्येही काही देशांत अशीच परिस्थिती तयार होत आहे. 

महाराष्ट्रात मात्र आपल्या पूर्वजांचा वारसा दर्गा आणि उरूस याद्वारे नवी पिढी पुढे चालू ठेवत आहे. अर्थात दोन्ही धर्मातील अतिवादी लोकांकडून या प्रथेच्या विरोधात अनेक अपप्रचार केले जातात हा भाग वेगळा…!

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.