१० वर्षांपूर्वी लावलेल्या खजूरांमूळे तो आज वर्षाला ३५ लाख रुपये कमावतोय

गुजराती माणूस म्हंटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो तो व्यापारी चेहरा. कारण व्यापार आणि गुजराती माणसाचं कनेक्शनचं वेगळये भिडू. एका चित्रपटात सुद्धा फेमस डायलॉग आहे, धंदा कुठलाही असो तो करायचा गुजराती माणसानेचं.

पण गुजराती माणूस आणि शेती हे समीकरण काय फारसं पचनी पडतं नाही. मात्र गुजरातमधल्या एका भिडूनं या समीकरणाला पण पचनी पडायला लावलं आहे. ते हि स्वतःच्या डोक्याने. त्याने चक्क ऑरगॅनिक शेती केलीये आणि त्यातून तो लाखो रूपये सुद्धा कमावतोय.

निर्मल सिंह वाघेला असं या गुजराती शेतकऱ्याचं नाव.

तो पाटण जिल्ह्यातला सामी तालूक्याचा रहिवासी. सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांने आपल्या जमिनीच्या मोठ्या भागात ऑर्गेनिक खजूरची झाडं लावली होती.  आता ती झाडे तयार झाली असून त्याला फळ सुद्धा लागलीत. ज्यातून तो वर्षाला ३५ लाख रुपये कमावतोय.

निर्मल सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, १० वर्षांपूर्वी त्यांनी कच्छमधून खजुराची रोपे आणली होती, जी त्यांनी आपल्या नापीक जमिनीवर लावली होती. 

आता नापीक जमीन म्हंटल की, कुठलीही शेती सहजासहजी होत नाही, त्यात माती, पाणी, अशा पाच पन्नास अडचणी तर आहेच. पण आता गुजराती माणूस म्हंटल्यावर शांत थोडी बसेल?

खजूरांचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी आणि ते ऑरगॅनिक बनवण्यासाठी निर्मल यांनी अनेक प्रयोग केले. त्यासाठी अनेकांची मदत घेतली, त्याचा चांगला अभ्यास केला. यामुळे आज प्रत्येक झाडावर मोठ्या प्रमाणात खजूर तयार होत आहेत. त्यांनी फक्त गोमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणातून तयार केलेले सेंद्रिय खत झाडांना दिले. यामुळे, झाडे केवळ वेगाने वाढली नाहीत, तर खजूरांना चांगला गोडवा देखील मिळालाय.

  ४०० रुपये किलोपर्यंत मिळतो भाव

निर्मल सांगतात की,

दरवर्षी आम्ही पाटण, राधानपूर, चाणस्मा आणि जवळच्या शहरांमध्ये खजूर विकतो. इतर खजूर ८० ते १०० रुपये प्रति किलोने विकले जात असले तरी ऑरगॅनिक खजूर २५० ते ४०० रुपयांना विकले जातात. कारण ऑरगॅनिक खजूरांना चांगल मार्केट आहे.

खासकरून अहमदाबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये ऑरगॅनिक खजूरांना जास्त मागणी आहे.

ते सांगतात की,

पूर्वी आम्ही रासायनिक खतांचा वापर करायचो, पण आता आम्ही गोमूत्र आणि शेण यांच्या मिश्रणापासून तयार केलेले पूर्णपणे सेंद्रिय खत वापरण्यास सुरुवात केलीये. यामुळे पिकाचे उत्पादन थोडे कमी होईल, पण खजूर टेस्ट चांगली लागते.

एका झाडापासून तब्बल ८० किलो खजूर

खजूर पिकवणारे आणखी एक शेतकरी युवराज वाघेला सांगतात की, आमच्या शेतात सुमारे सात हजार नर आणि आठ हजार मादी खजूर रोपे आहेत. या दोन्ही प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या टेस्टच्या खजूर देतात. प्रत्येक झाड ७० ते ८० किलो खजूर तयार करते.

तर निर्मल सांगतात की,

आम्ही डेट्स प्लास्टिकच्या पिशव्यांनी झाकतो, जेणेकरून बाहेरच्या वातावरणाचा पिकावर वाईट परिणाम होणार नाही. यामुळे, फांदीवर असलेलं एकही खजूर खराब होत नाही. या व्यतिरिक्त, हे कीटक आणि कोळीच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहतं.

खजूरांना १२ ही महिने मागणी…

तसं पहायचं झालं तर खजूर हे पृथ्वीवर वाढणारे सर्वात जुने झाड आहे.  हे कॅल्शियम, साखर, लोह आणि पोटॅशियम समृध्द आहे. हे अनेक सामाजिक कार्यक्रम आणि सणांमध्ये वापरले जाते.  या व्यतिरिक्त, त्याच्या आरोग्यांना होणाऱ्या फायद्यांविषयी प्रत्येकाला माहित आहेच. जसे की बद्धकोष्ठता कमी करणे, हृदयरोग, अतिसार नियंत्रित करणे आणि गर्भधारणेमध्ये मदत करणे.  यासह, याचा वापर चटणी, लोणचे, जॅम, ज्यूस आणि इतर बेकरीच्या वस्तू बनवण्यासाठी देखील केला जातो.

निर्मलसिंह सांगतात की, 

खजूर लागवडीसाठी विशेष जमिनीची गरज नाही. नापीक जमिनीवरही त्याची लागवड करता येते. वर्षातून दोनदा याची लागवड केली जाते.  एकदा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आणि दुसरी वेळ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान. रोपांमध्ये ६ ते ८ मीटर अंतर ठेवले जाते. झाडं परिपक्व होण्यासाठी ८ वर्षे लागू शकतात. त्यानंतर ते फळ देण्यास सुरुवात करते. त्यामुळे संयम महत्वाचा आहे. 

तसेच, सिंचनासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आजकाल वापरले जाते.  रासायनिक खतांऐवजी तुम्ही शेणखत आणि गांडूळ खत वापरू शकता. यामुळे पीक देखील चांगले होईल आणि जमिनीची सुपीकता देखील वाढेल.  बरही, खुंजी, हिल्लवी, जामली, खडरावी हे खजूरांचे मुख्य प्रकार आहेत.

कमी खर्चात जास्त फायदा

हे खरयं की खजुराच्या लागवडीला इतर पिकांपेक्षा जास्त वेळ लागतो, पण एकदा फळं पिकू लागली की उत्पन्नाचा वेग वाढतो. विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या लागवडीसाठी कमी संसाधनांची आवश्यकता असते. यामुळे, फक्त बियाणे आणि थोडा देखभाल खर्चचं यात लागतो.

एका झाडापासून सरासरी ७० ते १०० किलो खजूर बाहेर येतो. एक एकरात ७० रोपे लावता येतात. म्हणजेच, एक एकर जमिनीतून ५० क्विंटलपेक्षा जास्त खजूर बाहेर येऊ शकतात. जर तुम्ही ते बाजारात १०० रुपये किलो दराने विकले तर तुम्ही वार्षिक किमान ५ लाख रुपये कमवू शकता. आजकाल खजूरांवर प्रक्रिया करून चांगले उत्पन्नही मिळतयं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.