निवडणुकीच्या धामधुमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं वचन देशमुखांनी पाळलं

निवडणुकांमध्ये अनेक आघाड्या होत असतात आणि बिघडत असतात. कित्येकी युत्या निकालानंतर मोडीस निघतात. विचारधारा वगैरे गोष्टी नंतरच्या आधी सत्ता महत्वाची. अशावेळी सख्खे भाऊ भाऊ देखील एकमेकांच्या जीवावर उठतात.

असेही नेते  महाराष्ट्राने बघितले ज्यांनी निवडणुकीत दिलेला आपला शब्द प्राणपणानं जपला आणि विरोधकांनी देखील त्याच कौतुक केलं.

असे नेते म्हणजे कॉ.दत्ता देशमुख

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे १९१८ मध्ये दत्ता देशमुख या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला़. जवळे कडलग येथेच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर संगमनेर येथील पेटीट विद्यालयात माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पुण्यातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळविली.

कॉलेज सुरु असतानाच नेहरूंच्या भाषणांनी प्रभावित झालेले दत्ता देशमुख स्वातंत्र्यलढ्यात उतरले आणि खादी वापरू लागले होते.  

१९४२ चे चले जावं आंदोलन तेव्हा ऐन भरात होती. कित्येक तरुण आपलं घरदार ओवाळून भारत मातेला स्वतंत्र करण्याच्या महायज्ञात उडी घेत होते. यात दत्ता देशमुखांचा देखील समावेश होता.पुण्यात कॅपिटॉल थिएटरमध्ये बॉम्बस्फोट केल्याच्या संशयावरून त्यांना पोलिसांनी कारावासात देखील टाकलं होतं.

या सगळ्या धामधुमीत आपला अभ्यास चालू ठेवला. दत्तांचे ते इंजिनिअरींगचे शेवटचे वर्ष होते.आणि परिक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होती. त्यांनी ” माफीनामा ” दिला तर त्यांना पोलीस बंदोबस्तात परिक्षा देता येणार होती. दत्ता देशमुखांनी माफीनाम्यास धुडकावले व सर्वांसोबत येरवडा जेलमधे रवाना झाले ५ महिन्यांच्या खडतर कारावासा नंतर त्यांची सुटका झाली व नंतर त्यांनी इंजिनिअरींगची शेवटची परिक्षा दिली.

स्वातंत्र्यक्रांतीला साक्षी ठेवून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी पूर्ण केली. चले जावचे आंदोलन शांत झाल्यावर घरचे कर्ज फेडण्यासाठी नोकरी साठी बिहार येथे गेले. तिथे ते तीन वर्षे होते.

मात्र जेव्हा १९४६ सालच्या निवडणूका आल्या तेव्हा पुन्हा संगमनेर गाठले आणि लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. तत्कालीन कॉँग्रेस अध्यक्ष केशवराव जेधेंच्या आग्रहास्तव अकोले, संगमनेर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव व राहुरी अशा आठ तालुक्याचा समावेश असलेल्या ‘नगर उत्तर’मधून निवडणूक लढविली.

या २५-२६ वर्षाच्या तरूण इंजिनिअरचा आमदार म्हणून मुंबई विधानसभेत प्रवेश झाला.

आपल्या अभ्यासू आणि घणाघाती भाषणांनी त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. त्यावेळच्या बाळासाहेब खेर आणि मोरारजीभाई देसाई यांच्या पक्षपाताचे वाभाडे काढले. काँग्रेसचे आमदार असूनही काँग्रेसच्याच मोरारजीभाईंनी त्यांना शेतक-यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढले म्हणून तुरूंगात डांबले.

सतत ९० दिवस विधानसभेत गैरहजर राहिले म्हणून खेर-मोरारजींनी त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द केले. त्यावेळी आचार्य अत्र्यांसह सर्व पत्रकारांनी सरकारवर टिकेची झोड उठविली आणि दत्ता देशमुख एक संघर्षशील व्यक्ती म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले.

पुढे काँग्रेस हा बहुजनवादी मार्क्सवादी विचारांशी एकनिष्ठ नसल्याच जाणवताच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. शेतकरी कामगार पक्ष  कामगार किसान पक्ष, लाल निशाण गट मार्गे लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून ते शेतकरी, मजूर, प्रकल्पग्रस्तांसाठी सतत संघर्ष करीत राहिले़.

त्यांच्या लाल निशाण पक्षात एस. के. लिमये, कॉ. यशवंत चव्हाण, संतराम पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, लक्ष्मण मेस्त्री, विठ्ठल भगत, ए. डी. भोसले असे अनेक उच्च विद्याविभूषित नेते होते. दुष्काळी कामगारांचा मोर्चा पासून ते स्टेट फार्मिंग कामगारांच्या मोर्चापर्यंत अनेक आंदोलने केली. मैला कामगार, विडी कामगार. शेतमजूर, अंगणवाडी सेविका अशा असंघटित क्षेत्रातील वर्गांच्या संघटना त्यांनी बांधल्या आणि एसटीतुन राज्यभर प्रवास करत त्या मजबूत देखील केल्या.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात एस.एम.जोशी आणि कॉ.डांगे यांच्या सोबत दत्ता देशमुख यांचे देखील मोठे योगदान राहिले.

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने पंतप्रधान नेहरूंना भेटायला गेलेल्या शिष्ट मंडळात त्यांचाही समावेश होता. त्यावेळी दिल्लीमध्ये त्यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी भेट झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा त्या आधीच्या निवडणुकीत राखीव जागेवर काँग्रेसने दोन वेळा पराभव केला होता. निवडणुकीच्या राजकारणाला बाबासाहेब वैतागले होते.

या भेटीत तरुण आमदार असलेल्या दत्ता देशमुख यांनी बाबासाहेबांना शब्द दिला की जनरल जागेवरून राखीव सीट निवडून आणणार.

त्या काळीच काय आजही हे अशक्य समजले जाते. आधीच दलित व मागासलेल्या समजला दिलेल्या आरक्षणावरून ओरड सुरु असते आणि त्यात खुल्या जागेवरून राखीव उमेदवाराला निवडून आणायचे म्हणजे हे कदापि शक्य होणार नाही असं दत्ता देशमुखांना अनेकांनी सांगितलं होतं.

पण कॉम्रेड मागे हटणार नव्हते. त्यांनी स्वतःच्या नगर उत्तर मतदार संघातून लोकसभेसाठी बी.सी.कांबळे यांना उभं केलं. फक्त इतकंच नाही तर खेडोपाडी जाऊन त्यांचा जोरदार प्रचार केला.

बी.सी.कांबळे निवडून आले आणि बाबासाहेबांना कॉम्रेड देशमुखांनी दिलेल वचन पूर्ण झालं. 

कॉ. यशवंत चव्हाण एकेठिकाणी लिहितात,

“१९५२ सालच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची दाणादाण उडाली. स्वतः बाबासाहेबसुद्धा लोकसभा निवडणुकीत हरले होते. हा मोठा धक्काच होता. या पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकरांचे दिल्लीच्या संसदेत अस्तित्व आवश्यक वाटल्याने त्या निवडणुकीनंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देशमुखांच्या कामगार किसान पक्षाने त्यांना पाठिंबा दिला.

त्यावेळी दत्ता देशमुख आणि व्ही.एन.पाटील या दोन आमदारांची मते जर मिळाली नसती तर बाबासाहेबांचा विजय शक्य नसता. पण काँग्रेसचा विरोध मोडून काढून या महामानवाला राज्यसभेत पाठवण्यासाठी दत्ता देशमुखांनी कंबर कसली आणि त्यांना निवडून आणले.”

या बद्दल कृतज्ञता म्हणून बाबासाहेबांनी त्यांना दोन पत्रे देखील लिहिली आहेत.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.