शिवरायांचा उल्लेख आदरार्थी करावा असा आग्रह धरून थेट जदुनाथ सरकारांना खडसावलं होतं..

महाराष्ट्राच्या इतिहासविषयी ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत ज्ञान असलेला चालू शतकातील चालता – बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार! फक्त थोर इतिहाससंशोधक म्हणूनच नाही तर एक विद्वान लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्यकर्ते म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. मराठी शुद्धलेखन महामंडळापासून ते तमाशा सुधारणा समिती पर्यंत सर्व क्षेत्रात त्यांचा सहज संचार होता.

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा ५ ऑगस्ट १८९० रोजी महाडजवळील बीरवाडी येथे त्यांचा जन्म झाला. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९१० साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली.

त्यांना महाराष्ट्राचा साहित्यिक भीष्म म्हणत. मराठी भाषेच्या संवर्धनाचे व इतिहासाच्या संशोधनाच्या कार्यासाठी त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. १९३९मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच १९४३मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. १९४६ते १९५०ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. १९४८मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर १९६०ते १९६३ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.

हिंदी शिक्षण समितीपासून ते संस्कृत महामंडळापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी अध्यक्षपद भूषवले होते. १९१८ते १९४७ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते. 

प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. त्याकाळचे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. एकमेकांच्या कार्याबद्दल परस्पर आदराची भावना होती. पण वेळ पडली तर ते एकमेकांवर टीका करायला देखील पुढे मागे पाहायचे नाहीत.

जदुनाथ सरकारांनी मराठ्यांचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणला. मात्र ते बऱ्याचदा शिवरायांचा उल्लेख एकेरी करायचे.त्याकाळातल्या बऱ्याच इतिहासकारांनी ‘शिवाजी’ असा एकेरी केला होता. असा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रीयांचा स्वाभिमान दुखावेल असं दत्तो वामन पोतदार यांच म्हणणं होतं.

एकदा त्यांची आणि जदुनाथ सरकार यांची भेट झाली. दत्तो वामन पोतदार यांनी जदुनाथांना त्यांच्या पुस्तकात ‘शिवाजी’ किंवा ‘शिवाजी महाराज’ असा नामनिर्देश न करता फार्सी साधनातील ‘शिवा’ हेच नामाभिधान वापरल्याचे दाखवले. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून पोतदार म्हणाले की, 

तुम्हाला ‘जदुनाथ’ असे न संबोधता केवळ ‘जदू’ असे म्हटले तर कसे वाटेल? 

आपल्या युगपुरुषाला ‘शिवा’ असे म्हणण्याने संपूर्ण मराठी जगत आपलाच अपमान समजेल असे दत्तो वामन पोतदार यांनी तेव्हाच्या इतिहासकारांना ठणकावले होते. जदुनाथ सरकार यांच्यासारख्या थोर इतिहासतज्ञाला त्यांचं म्हणणं ऐकून देखील घ्यावं लागलं होतं.

आजही अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा कोणी चुकून किंवा मुद्दामहून एकेरी उल्लेख करतो तेव्हा दत्तो वामन पोतदार आणि जदुनाथ सरकार यांचं उदाहरण दिल जातं. छत्रपतींच्या सन्मानासाठी दत्तो वामन पोतदारांनी दिलेली ही टक्कर विसरून चालणार नाही.  

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.