एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!

२०१५ च्या दरम्यान ट्विटरवर एक ट्रेंड सुरु होता. ‘४.२८ करोड’.

हा ट्रेंड सुरु होता दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेसंबंधी. कारण ही मालमत्ता विकत घेतली होती एका पत्रकाराने.

खरं तर दाऊद फरार झाल्यानंतर त्याच्या स्थावर मालमत्ता गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्या होत्या. दाऊदच्या अशाच एका मुंबईतल्या हॉटेलचा लिलाव सुरु होता. हॉटेलचं नाव होतं ‘दिल्ली जायका’. या हॉटेलचं पूर्वीच नाव होतं रोनक अफरोज. हे हॉटेल पकमोडिया स्ट्रीटवर आहे.

तर जेव्हा हे हॉटेल लिलावात काढलं त्यावेळी सर्वाधिक किंमतीची म्हणजेच ४.२८ कोटींची बोली लावली माजी पत्रकार एस. बालकृष्णन यांनी.

आता जेव्हा का बालकृष्णन यांनी ही बोली लावली तेव्हा त्यांच्यावर आरोप करण्यात आले. दाऊद किंवा त्याचेच प्रतिस्पर्धी गुंड  बालकृष्णन यांच्या मार्फत या लिलावात सामील असतील. कारण एवढी मोठी रक्कम तेव्हाचे पत्रकार अख्या हयातीत पण कमवणार नाहीत.

यावर आरोपांवर ६३ वर्षीय बालकृष्णन म्हणाले होते,

“मी कोणाच्याही दबावाखाली नाही. माझे दोन्ही टोळ्यांचे संबंध होते. पण मी माझ्या प्लास्टिकच्या पेनसाठी रिफिल सुद्धा त्यांच्याकडून घेतली नाही. माझी लेखणी खरेदी करण्याएवढी बिकाऊ नाही आणि माझा विवेक स्पष्ट आहे.”

दाऊदची ही प्रॉपर्टी खरेदी करणारे बालकृष्णन २७ ऑक्टोबर १९५२ रोजी जन्मले. बालकृष्णन यांच बालपण माटुंगा नंतर घाटकोपर आणि नंतर चेंबूर येथे गेल. त्यांच्या शेजारी एक पत्रकार राहत होता ज्याच्यामुळे बालकृष्णन पत्रकारितेच्या क्षेत्रात आले. बालकृष्णन यांनी आपली सुरुवातच टाइम्स ऑफ इंडिया मधून केली. खरं तर याची जाहिरात बघून ते मुलाखतीसाठी गेले आणि त्यांना नोकरी मिळाली पण.

त्यावेळी, क्राइमचे बीट हे ज्युनियर पत्रकारांसाठी होते. पण बालकृष्णन यांनी अंडरवर्ल्डवर वॉच ठेवायचे ठरविले. ज्युनियर असून सुद्धा ते तेव्हाचा डॉन वरदराजन मुदालियारांना यांना सहज भेटायचे.

बाळकृष्णन यांना कॉंग्रेसने लोकसभेच्या तिकीटाची ऑफर सुद्धा दिली होती, परंतु निवडणुक लढवणे  फारच महाग असते म्हणून त्यांनी नकार दिला. १९८५ मध्ये कॉंग्रेसने पुन्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या निवडणुकीसाठी तिकिटाची ऑफर दिली. बाळकृष्णन यांनी ही ऑफर घेतली. आणि महिनाभर रजा घेऊन आणि तत्कालीन प्रभाग क्रमांक १४९ मध्ये जोरदार प्रचार केला.

ते निवडून आले. आणि १९९२ पर्यंत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले.

एक दशकांपूर्वी, बालकृष्णन यांनी झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था ‘देश सेवा समिती’ स्थापन केली. देश सेवा समितीच्या वतीनेच त्यांनी दाऊदच्या मालमत्तेसाठी बोली लावली. बाळकृष्णन यांना त्या हॉटेलच्या ठिकाणी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची इच्छा होती.

खरं शेवटी त्यांना या बोलीचे पैसे काय देता आले नाहीत. आणि डाव फिसकटला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.