म्हणून हॉस्टेलच्या रुममधून डेव्हिड धवनने ओम पुरीला बाहेर काढलं होतं…

एका कॉलेजमध्ये असणारी माणसं पुढे मोठ्ठी झाल्यावर अनेक किस्से सांगितले जातात. यात पुण्याचं FTII, पुण्याचं लॉ कॉलेज, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे विद्यापीठ, BMCC, SP कॉलेज अशा अनेक शिक्षणसंस्था आहेत.
FTII चा विचार केला तर डेव्हिड धवन, मिथून, ओम पुरी, नसरुद्दिन शाह, शक्ती कपूर, जया बच्चन, राजकुमार हिराणी अशी बरिच नावं निघतात. अशी ही मोठ्ठी मंडळी अनेकदा एकत्र शिक्षण घेत होती. काहीजण एकाच वर्गात होती तर काहीजण एकाच होस्टेल वर एकाच खोलीत रहायचे.
यातलं एक नाव म्हणजे ओम पुरी आणि डेव्हिड धवन…
ओम पुरी १९७३ साली NSD म्हणजेच दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये होते. त्यानंतर काही काळ त्यांनी नाट्य मंडळात काम केलं आणि लागलीच पुण्याच्या FTII मध्ये ॲडमीशन मिळवलं.
इथं त्यांचे रुमपार्टनर डेव्हिड धवन. डेव्हिड धवन हा मस्तमौजी माणूस, गोविंदाचे पिक्चर जसे होते तसाच हा पोरगा. कधीही टेन्शन नावाची गोष्ट, करियर नावाची गोष्ट त्याच्या आजूबाजूला देखील फिरकायची नाही. कायम मस्तीत जगणं आणि आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना देखील धंद्याला लावणं हा डेव्हिड धवनचा नियमच होता.
दूसरीकडे त्याला पार्टनर मिळाला ओम पुरी. ओम पूरी याच्या बरोबर विरुद्ध होता. नाटक कंपनीतून आलेला. NSD मधून पासआऊट होता पण त्यापेक्षा महत्वाचं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तो पुढे आलेला. ओम पुरीचे वडील रेल्वेत काम करायचे. त्याच्या वडिलांना सिमेंट चोरीमध्ये सहा वर्षांची जेल झाली होती.
तेव्हा ओम पुरी ढाब्यावर काम करुन पोट भरायचा. काहीतरी करुन चार पैसे हातात येतील अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे जितकं सिरीयस आणि मॅच्युअर वाटले तितके तो प्रयत्न करायचा. आपल्या हातून एखादी चुकी झाली तरी सगळं जाईल याचं भान त्याला होतं.
झालं असे दोन विरुद्ध स्वभावाची पोरं एका रुममध्ये पार्टनर म्हणून आले.
ओम पुरीच्या आयुष्यातच ॲडजेस्टमेंट होती. डेव्हिड धवन सारख्या पोरासोबत तो रहात होता. पण डेव्हिडसाठी ओम पुरी म्हणजे प्रचंड बोअर माणूस होता. याच्यासोबत एक क्षण देखील थांबन डेव्हिडच्या जिवावर आलेलं.
अखेर डेव्हिडने ओम पुरीला दमात घेतलं. माझी रुम सोडून जा. जो पार्टनर बघता येईल तो बघ नाहीतर रस्त्यावर झोप म्हणून ओम पुरीला फर्मान निघालं..
ओम पुरी बिच्चारा गरिब माणूस. त्याने ही गोष्ट नसरुद्दीन शहाला सांगितली आणि दूसऱ्या रुमची सोय झाली. इकडे डेव्हिड धवन पण खुष झाला…
काळ सरकला आणि दोघेही खूप पुढे आले. पण एकत्र काम करण्याचा चान्स ९० च्या दशकात आला. डेव्हिड धवनने ओम पुरीसोबत कुंवारा, दुल्हन हम लै जाऐंगे सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं. तेव्हा डेव्हिडला राहून राहून आपल्या कॉलेजमधल्या त्या चुकीचा पश्चाताप होवू लागला.
हे ही वाच भिडू
- आणि पुण्यात प्रभात स्टुडिओच्या जागी फिल्म इन्स्टिट्यूट उभी राहिली
- रॅगिंगमुळे वैतागला होता, जयाने त्याच दुसरं बारसं केलं डॅनी
- तासभर मारलेल्या गप्पांनी त्यांना ऑस्कर जिंकणारा सिनेमा मिळवून दिला.