गर्लफ्रेंडला सिनेमात काम न देणाऱ्या प्रोड्युसरला डॉनने थेट यमसदनी धाडलं होतं..

प्रेम हे आंधळं असतं,असं म्हणतात बुवा! आत्ता या वाक्याचा नेमका अर्थ काय माहित नव्हतं. बरं, जेव्हा आम्ही प्रेम केलं तेव्हा अपेक्षाभंग झाल्याशिवाय दुसरं काही वाट्याला आलं नाही. त्यामुळे आंधळेपणाने प्रेम कसं करतात हे समजण्याआधी ती निघून गेली होती. असो ! हा विषय एकमेकांच्या दुःखाची खपली काढण्याचा नाही. तर अत्यंत सिरियस विषय आहे.

हा विषय आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लव्ह स्टोरीचा.

डॉनची लव्हस्टोरी वाचायला मिळणार म्हणून काही जण आतुर झाले असतील. तर भिडू उगाच डॉन ची लव्हस्टोरी का सांगतोय, असं वाटून काही जण आम्हाला वाईट साईट बोलतील. लव्हस्टोरी हा या भिडूचा काहीसा विक पॉइंट.

संदर्भ खूप झाला आत्ता थेट मुद्द्याला सुरुवात करतो. तुम्हाला या लव्हस्टोरीचा हीरो कोण हे कळलं असेलच. डॉन दाऊद इब्राहिम. आणि या लव्हस्टोरीची हिरोईन आहे अनिता अयुब. त्यामुळे अनिता अयुब नेमकी कोण होती, इथून आपण सुरुवात करू.

अनिता अयुब ही सुप्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री. १९८० ते १९९० दरम्यान अनिताने काही पाकिस्तानी सिनेमे, जाहिराती केल्या. पाकिस्तान मध्ये लोकप्रिय असलेल्या अनिताला बॉलिवुड खुणावू लागलं. मग काय.. बॉलिवुडमध्ये सुद्धा अनिताने प्रवेश केला. पण काहीसा उशिरा. १९९३ साली “प्यार का तराना” या सिनेमातून तिने भारतीय सिनेसृष्टीत प्रवेश केला. विशेष गोष्ट म्हणजे हा सिनेमा सदाबहार अभिनेते देवानंद यांनी लिहिला होता आणि दिग्दर्शित केला होता. बसला ना आश्चर्याचा धक्का !

देवानंद यांनी जरी हा सिनेमा लिहिला आणि दिग्दर्शित केला असला तरीही हा सिनेमा तितकासा लोकप्रिय होऊ शकला नाही.

ही गोष्ट साधारण १९८९ ची. अनिता तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे चांगलीच चर्चेत आली होती. मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत अनिताने भाग घेतला होता.

“मुस्लिम पुरुषांना जशा ४ बायका ठेवण्याचा अधिकार आहे. तसंच मुस्लिम स्त्रियांना सुद्धा ४ पती करण्याचा अधिकार देण्यात यावा.”

अनिताने हे विधान करून मोठा स्टंट मारला होता. इतक्या मोठ्या स्पर्धेत असं बोलल्यामुळे अनिताला तिथल्या संयोजकांनी स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितलं. ज्या देशात ती वाढली, अशा पाकिस्तानात तिच्याविरुद्ध २२ वकिलांनी अनैतिक कृत्य केल्याचा आरोप केला. बेकायदेशीर विधान केल्यामुळे तिच्यावर खटला दाखल करण्यात आला.

या क्षणी होते आपल्या लव्हस्टोरीच्या हिरोची एन्ट्री. म्हणजेच डॉन दाऊद इब्राहिम. दाऊद बद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. जसं की, कुठेही असला तरी त्याची एकाचवेळी अनेक ठिकाणी नजर असते. आत्ता जरी हे महाशय वयाने थकले असले तरीही हा माणूस कधी काय करेल, याचा अजूनही भरवसा नाही.

१९९० साली अनिताने इतकं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याने डॉन ची तिच्यावर नजर नाही गेली तर नवल ! डॉन आणि अनिता या प्रकरणानंतर एकमेकांच्या जवळ आले. दोघांचं छुपं अफेयर लोकांच्या चर्चेचा विषय झालं.

आता या दोघांची ओळख कशी झाली, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, अशा गोष्टीत भिडू शिरत नाही. अनिता वरच्या प्रेमासाठी दाऊद कोणत्या थराला गेला, हे पाहणं रंजक आहे. तर.. दाऊद आणि अनिता या दोघांच्या रिलेशनशिपची सर्वत्र हवा होती. यामुळे अनिताच्या करिअरवर मात्र परिणाम झाला.

तिला सिनेमात कामं मिळणं कमी होऊ लागली. कारण दाऊदच्या संबंधित व्यक्तीला सिनेमात घेणं म्हणजे मोठी रिस्क होती.

१९९५ दरम्यान जावेद सिद्दीकी नावाचे निर्माते बॉलिवुडमध्ये लोकप्रिय होते. जावेद साहेबांनी अनिताला त्यांच्या आगामी हिंदी सिनेमात काम दिले नाही. अनिताला घेऊन त्यांनी सिनेमा बनवण्यास नकार दिला, त्यामुळे अनिताला हिंदी सिनेमातून डच्चू मिळाला.

हे प्रकरण पोहोचलं दाऊद कडे. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला सिनेमातून असं हाकलून दिलं जातं याचा दाऊदला प्रचंड राग आला. आणि मग याचा परिणाम असा झाला की दाऊदने त्याच्या टोळीच्या मदतीने जावेद सिद्दीकी यांना गोळ्या घालून ठार केले.

अनिताचं अभिनयातलं करियर मात्र यामुळे संपलं. पुढे अनिता आणि दाऊद यांच्या लव्हस्टोरीचं काय झालं ठाऊक नाही. अनिता नंतर एका पाकिस्तानी बिझनेसमन सोबत लग्न केलं. कधीकधी आपण आयुष्यात कोणत्या व्यक्तींची निवड करतो यालाही महत्व असतं. अनिताने दाऊदशी संग केल्याने ॲक्टिंग करियर तिने स्वतःच्या हाताने बरबाद केलं. असो!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.