भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला

गुटखा. आज कालच्या पब्लिकला हे सुगंधी आयटम माहित आहे का नाही माहित नाही. पण एक काळ असा होता की तंबाखू विडी सिगरेट व्यसनांमध्ये गुटखा अख्ख्या देशावर राज्य करायचा. गुटखा खरंतर व्यसनी लोकांचं एनर्जी देणारं खाद्य आहे. त्याचे फायदे तोटे गुटखा खाणाऱ्या लोकांना माहिती जरी असले तरी खतरो के खिलाडी बनून गुटख्याची तुफ्फान विक्री चालते.

पाकिस्तान हा आपला शेजारी जरी असला तरी तो भारताची बरोबरी करू पाहत होता. भारतात जे पिच्चर चालतात ते पाकिस्तानात सुद्धा आसावर असा हट्ट तिथल्या लोकांचा असायचा. तोच पुढे त्यांनी गुटखा हा पाकिस्तानात सुद्धा असावा असा सूर आळवला होता आणि तो पूर्णही झाला.

१९९० च्या मध्यापासून ते २००० पर्यंत गुटखा भारतातून पाकिस्तानात अवैधरित्या पोहचवला जात होता. भारतातून तो पॅक होऊन पुढे दुबईमार्गे पाकिस्तानात तस्करी करून पोहचला जात असे. गुटखा ब्रँड त्यावेळी प्रचंड लोकप्रिय होते. त्यात गोवा [ संजय दत्तची जाहिरात आठवत असेल ] १०००, आरएमडी भयंकर विक्री होत होते.

तस्करी आणि आयातीच्या खर्चामुळे पाकिस्तानमध्ये सामान्य लोकांना हा गुटखा परवडेनासा झाला. पाकिस्तानात गुटख्याचा ३०० कोटींचा व्यापार होता. आता यात दुबईच्या भाई लोकांचं लक्ष जाणार हे उघड होतं. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम हा भारतीय ब्रॅण्डची नक्कल करून पाकिस्तानात त्याचे ब्रँड खपवत होता. गुटखा प्रकरणावर त्याने लक्ष ठेवले आणि आपणही हा व्यापार करावा असं त्यानं ठरवलं.

त्यावेळी भारतात गुटख्याचे सगळ्यात मोठे दोन उत्पादक होते. जे एकमेकांमध्ये व्यावसायिक संघर्ष करत होते.

गोवा ब्रँडचे उत्पादक जगदीश जोशी

आणि

आरएमडी ब्रँडचे उत्पादक रसिकलाल माणिकचंद धारिवाल

होते. पण एक विशेष बाब अशी होती कि हे एकेकाळचे कट्टर विरोधक आता एकत्र येऊन गुटखा बनवत होते.

१९९० मध्ये गोवा गुटखा ब्रॅण्डचा उत्पादक जगदीश जोशी हा आरएमडीच्या धारिवाल कडे जाऊन काम करू लागला. धारिवालला मोठं करण्यात जोशीचा मोठा वाटा आहे.

पण कमी पगार आणि जास्त कष्ट करावे लागत असल्याने जोशीने १९९७ मध्ये तो आरएमडी कंपनीपासून वेगळा झाला. जोशीने दावा केला कि धारिवाल त्याचे ७० कोटी रुपये देणे लागतो पण धारीवालने हि मागणी फेटाळून लावली.

आता या भांडणाची बातमी कळली ती अनिस इब्राहिमला. या वादातून मोठा फायदा होणार हे त्याला कळून चुकलं होतं. जोशीने अनिस इब्राहिमला गळ घातली कि त्याने मध्यस्थी करून धारीवालकडून पैसे मिळवून द्यावे. धारीवालने मात्र सांगितले कि हि बैठक दाऊद इब्राहिमच्या उपस्थितीत व्हावी. अनिस इब्राहीमने मान्य केले.

काही दिवसांनी जोशी आणि धारिवाल याची हि बैठक कराचीत झाली. सगळी चर्चा ऐकून झाल्यावर दाऊदने जाहीर केले कि,

धारीवालने एकूण ११ कोटी रुपये द्यावेत. त्यातले ७ कोटी रुपये हे जोशीला द्यावेत आणि उरलेले ४ कोटी रुपये हे मध्यस्थीबद्दल आपल्याला द्यावेत.

आता हा प्रस्ताव मान्य होण्याआधीच अनिस इब्राहीमने सांगितले कि जोशीने गुटखा बनवण्याचं यंत्र आणि त्याची सामग्री आम्हाला द्यावी. जेणेकरून पाकिस्तानात हा व्यवसाय सुरु करता येईल. जोशीने फायदा होईल या दृष्टीने हि मागणी मान्य केली.

अनिस इब्राहीमने दाऊदच्या मदतीने फायर नावाचा गुटखा ब्रँड पाकिस्तानात सुरु केला. हा ब्रँड प्रचंड हिट झाला. हे सगळं इतकं गुप्तरित्या झालं होतं कि मोठ्या व्यापाऱ्यांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. 

२००४ मध्ये दाऊदवर पळत ठेवून असलेले मुंबई पोलीस यांनी दाऊद आणि अनिस यांचे गुटखा उत्पादन करणाऱ्या यंत्राचे भाग मुंबईच्या चोर बाजारातून विकत घेण्याबाबतचे संभाषण ऐकले. पोलिसांनी पाळत ठेवून यातून सगळी माहिती काढली.

जागतिक गुन्हेगारासोबत व्यापार आणि सलगी केल्याने आणि पुन्हा यात धारिवाल आणि जोशी समोर आले. जगभर हे दोघे पळत होते त्यामुळे पोलिसांनी जोर लावून त्यांना भारतात परतण्यासाठी प्रयत्न केले.

शेवटी जोशीने शरणागती पत्करली आणि तो पोलिसांच्या स्वाधीन झाला. काही दिवसांच्या अंतराने धारिवालसुद्धा हजर झाला. न्यायालयात खटला चालला पण दोघेही यात दोषी म्हणून सापडले. दाऊदला भेट आणि व्यापार यामुळे हे दोघेही एकेकाळचे मातब्बर गुटखा उत्पादक अडकले गेले.

या दोघांच्या भांडणात दाऊदने हात धुवून घेतले आणि बक्कळ पैसे कमावले. गुटख्याचा तोटा असा होईल हे धारिवाल आणि जोशीच्या कधी स्वप्नातही आलं नसेल. जोशी- धारिवाल प्रकरणात दाऊदने न्यायाधीशाची भूमिका घेत स्वतःचा फायदाही साधून घेतला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.