मंत्रालयातील त्या राजकारण्याच्या फोनमुळे दाऊद दुबईला पळून जावू शकला.

दाऊदच्या टोळीचा बिमोड करायचा संकल्प तत्कालीन पोलीस कमिश्नर डी.एस.सोमण यांनी घेतला होता. त्यासाठी सोमण यांनी आपली टिम स्वत: बांधली होती.

टिम बांधताना त्यांनी एकमेव दक्षता घेतली होती ती म्हणजे हे अधिकारी विश्वासू असावेत. कोणत्याही प्रकारची बातमी फुटणार नाही याची दक्षता त्यांनी सुरवातीपासून घेतली होती.

सोमण यांनी मुंबई शहर पोलीस खात्याची सुत्रे हातात घेतल्यानंतर मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या दुनियेला हादरे देण्यास सुरवात केली होती.

पोलीस इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशनमुळे एकतर टोळी माफिया स्वत: हून पोलीसांना शरण येत होते किंवा त्यांना बळजबरी का होईना गजाआड व्हावे लागत होते.

हळुहळु बऱ्यापैकी सर्व टोळीयुद्धांना विराम लागण्याची चिन्ह दिसू लागली होती. करीम लाला आणि हाजी मस्तान सारखे गॅंगस्टर आत्ता रिटायर होण्याची भाषा करु लागले होते.

पण या सर्वात एक माफिया मात्र आपणाला काहीच फरक पडत नाही या अंदाजात कारवाया करत होता.

तो म्हणजे दाऊद इब्राहिम.

दाऊदने सुरवातीपासून पोलीसांना मलई पुरवली होती. पोलीसांनी देखील अनेक डॉन असण्यापेक्षा एक डॉन परवडला म्हणून दाऊदला अप्रत्यक्षरित्या मोठे होण्याची संधी निर्माण करुन दिली होती. एक-एक करत इतर डॉन मागे पडू लागले आणि दाऊद हा खऱ्या अर्थाने डॉन म्हणून वावरू लागला.

या डॉनला थांबवणं पोलीसांना देखील अशक्य झालं होतं.

सर्वात पहिल्यांदा १९७७ साली दाऊदला छोट्यामोठ्या चोरीसाठी अटक करण्यात आली होती. १९८२ साली त्याला कस्टमच्या कॉफेपोसा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.

यानंतर टोळीयुद्धात झालेली वाढ. दाऊदचा भाऊ साबीरची झालेली हत्या व दाऊदचे वाढलेले स्थान या सर्व गोष्टी पोलीसांसाठी जड जाणाऱ्या ठरू लागल्या.

समद खानचा खून झाल्यानंतर दाऊद प्रमुख आरोपी ठरला होता. पोलींसाच्या यादीत तो बऱ्याच वरच्या स्थानावर पोहचला होता. मुसाफीरखान्यातल्या त्याच्या बिल्डिंगमध्ये बसून तो सर्व कृत्य करत होता. इथेच त्याचे ऑफिस होते. दाऊद इथे बसून असतो ही उघड गोष्ट होती.

इथे रेड टाकायची आणि दाऊदला ताब्यात घ्यायचा अशी योजना आखण्यात आली.

१९८६ सालच्या त्या दिवशी पोलीस कमिश्नर सोमण यांनी आपल्या अधिकाऱ्यांना घेवून स्वत: जातीने दाऊदला ताब्यात घेण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे मुसाफीरखान्याच्या इमारतीत पोलीस शिरले.

जेव्हा सोमण दाऊदच्या ऑफिसमध्ये पोहचले तेव्हा ॲशट्रे मध्ये अर्धवट जळत असणारी सिगार त्यांना दिसली. खिडकी उघडी होती. नुकताच तिथून दाऊद बाहेर पडल्याची सर्व चिन्हे त्यांना दिसत होती.

दाऊद काही क्षणात निसटून गेल्याचं सोमण यांना आश्चर्य वाटलं. दाऊदला पोलीस येत असल्याची टिप कशी मिळाली हे त्यांच्यासाठी एक कोडं होतं.

दूसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सोमन यांनी वरिष्ठ पातळीवरची एक मिटींग आयोजीत केली.

या मिटींगमध्ये सोमण यांनी पहिला प्रश्न विचारला तो दाऊदला आपण अटक करणार आहोत याचा सुगावा कसा लागला.

त्यावर अधिकाऱ्यांनी दाऊदचे फोन रेकॉर्ड समोर ठेवले. ते म्हणाले,

सर आपण त्याच्यापर्यन्त पोहचण्यापुर्वी फक्त १० मिनीटे अगोदर एक फोन आला होता. या फोनमुळेच दाऊद पळाला असावा.

सोमण यांना ही टिप कोड्यात टाकणारी होती. कारण आपण निवडलेल्या टिमवर त्यांचा पुर्ण विश्वास होता. ते निष्कलंक व चारित्रवान आहेत हा त्यांचा दावा होता. मग माहिती फुटली कशी हा प्रश्न होता.

अधिक चौकशी केल्यानंतर समजलं की,

मुंबई पोलीस दाऊदला अटक करण्यासाठी जात असतानाच काही क्षणांपुर्वी त्यांनी दाऊदला अटक करण्याची मान्यता मिळवण्यासाठी व तशा सुचना मिळवण्यासाठी मंत्रालयातील एका जेष्ठ राजकारण्यांना फोन केला होता.

फोन करुन त्यांच्याकडून मान्यता मिळवण्यात आली होती.

हे कळल्यानंतर वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांना वर्तुळात समजून आले की,

ही माहितीची देवणाघेवण फोनवरुन होताना कुठेतरी गळती झाली पाहिजे व ती बातमी दाऊदला शेवटच्या क्षणी पोहचवली गेली असली पाहिजे. त्यामुळे पोलीस येण्याच्या आत आपण निसटले पाहिजे हे त्याने हेरले.

हि माहिती पोलीसांकडून गळली नसेल तर दूसरा गळतीचा उगम हा राजकारणी नेत्याकडे बोट दाखवतो.

इथून दाऊद निसटला तो थेट दुबईत पोहचला. त्यानंतर दुबईत राहून त्याने मुंबईत आपला वरचष्मा कायम ठेवला. अवघ्या सात वर्षात त्याने मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली. या सर्व गोष्टी घडू शकल्या कारण दाऊद त्यावेळी निसटू शकला.

संदर्भ : डोंगरी टू दुबई पान क्रमांक २०६-२१०

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.