भारतातून पळून गेलेला दाऊद मुंबईच्या अंडरवर्ल्डवर इकबालच्या रूपात राज्य करायचा

आजच झळकलेल्या बातमीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो [ NCB ] मुंबईने अटक केली. ड्रग्सची छुप्या मार्गाने स्मगलिंग करण्याचा त्याच्यावर आरोप आहे त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली आहे. पण हा इकबाल कासकर नक्की कोण होता ? दाऊदचा भाऊ म्हणून ओळख असली तरी त्याच्यावर गंभीर आरोप आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार ड्रग्सची स्मगलिंग पंजाब ते जम्मू काश्मीर भागात केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पण २००३ मधेच त्याला दुबईतून उचलण्यात आलं होतं आणि ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये त्याला अटक केली खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्यातून. 

१९९३ मध्ये मुंबईवर बॉम्बस्फोट हल्ला करून दाऊद इब्राहिम भारत सोडून गेला तो कायमचाच. पण मुंबई सोडली तरी त्याचे अवैध मार्गाने चाललेले धंदे काही कमी झाले नाही. एकवेळ मुंबईत राहून छोटा राजनने दाऊदचा हा व्यवसाय वाढवलाच नव्हे तर दुप्पट केला. पण काही काळानंतर दाऊद आणि छोटा राजन मध्ये काहीतरी बिनसलं आणि हि जोडी फुटली.

दाऊदचा ५ नंबरचा भाऊ इकबाल कासकर. डोंगरातल्या टेमकर मोहल्ल्यात तो वाढला. इब्राहिम कासकर हे पोलिसात असले तरी मुलांवरचा त्यांचा ताबा सुटला होता. पुढे दाऊदने इतके कांड केले कि त्यांना मान वर काढता आली नाही. साबीर आणि दाऊद या दोघांनी गल्लीपासून सुरवात केली आणि मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाचे ते सगळ्यात खतरनाक डॉन बनले. कालांतराने साबीर मारला गेला पण दाऊदने आपली संपत्ती वाढवली. 

दाऊद मुंबईतून पसार झाल्यानंतर इकबाल कासकर हा आपल्या आईसोबत आणि भावासोबत मुंबईत राहत असायचा. तोवर भारतात दाऊद मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनला होता. मुंबईत राहून इकबाल कासकर दाऊदचा व्यवसाय सांभाळू लागला. इस्टेट बिझनेस आणि त्यासंबंधी अंडरवर्ल्डचे व्यवहार इकबाल कासकर अगदी गुप्तपणे सांभाळू लागला.

२०१७ सालची हि गोष्ट. एके दिवशी त्याच्या विरुद्ध एका बिल्डरने कम्प्लेंट केली कि खंडणी म्हणून ३ करोड रुपये इकबाल कास्करने त्याच्याकडून मागितले.

११३ एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा यांनी त्याला अटक केली. याआधीही तो बरेच वेळा खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्यात अडकला होता आणि त्याला अटकही झाली होती पण नंतर तो सुटत गेला. हसीना पार्कर या त्याच्या बहिणीच्या नागपाड्याच्या घरी तो लपून बसला असल्याची बातमी पोलिसांना कळली आणि त्यांनी तात्काळ  इकबाल कासकरला अटक केली.

२००३ मध्ये इकबाल कासकरला दुबईहून हद्दपार आणि सारा सहारा बेकायदेशीर बांधकाम प्रकरण अशा दोन खटल्यासाठी भारतात त्याला पाठवण्यात आलं. २००७ मध्ये तो दोन्ही प्रकरणात निर्दोष ठरला. हद्दपार म्हणून घोषित केल्यानंतर त्याने दाऊदचं मूळ घर दमरवाला हे निवासस्थान गाठलं आणि तो मुंबईतून दाऊदचे व्यवहार हाताळू लागला. 

मुंबई सोडून गेलेला दाऊद आजही इकबाल कासकरच्या रूपाने मुंबईत राज्य करतो. अनेक प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय दाऊदने मुंबईत केले आणि त्याचे सगळे प्लॅन्स हे इकबालला माहिती होते. दाऊदसाठी काम करणे आणि अंडरवर्ल्डशी संबंध यामुळे इकबाल कासकर कायम चर्चेत असतो.

आज मात्र एनसीबीने इकबाल कासकरला अटक करून मोठं पाऊल उचललं आहे. निदान यामार्गाने तरी दाऊदने मुंबईत चालवलेले अवैध धंदे उघडकीस येतील. याआधीही दाऊदच्या निनावी संपत्तीचा लिलाव झाला होता आणि काही वेळा तर महाराष्ट्र शासनाने त्याच्या बंगल्यावरही हातोडा चालवला होता. 

दाऊदला पकडण्यासाठी याआधीही बरेच प्रयत्न झाले होते, काही वेळा तो स्वतःच्या हिमतीने वाचला तर काही वेळा राजकीय लोकांच्या मदतीने तो सुटला. विविध मार्गाने जाळे फेकून पाहिले पण दाऊद काय हाती लागला नाही. आता इकबाल कासकरमुळे तरी दाऊद हाती लागेल का हा प्रश्न कायम आहे ?

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.