दाऊदला शारजामध्येच संपवण्याचा प्लॅन बनला होता…
ऐंशीच दशक. गँगस्टर्स आणि त्यांच्या गँगवॉरने मुंबई पेटली होती. दिवसाढवळ्या भररस्त्यात मुडदे होत होते. गोळीबाराच्या घटना सर्रास होत होत्या. पोलीसही वैतागले होते. सर्वसामान्य माणसाना खुनाच विशेष वाटायचं सुद्धा बंद झालं होतं.
अशातच एक दिवस सांताक्रुझ एअरपोर्टवर एक घटना घडली. पोलीस गाडीतून आलेल्या काही गुंडांनी एका माणसाला ठोकले. तो व्यक्ती नुकताच दुबईहून परत मुंबईला आला होता. त्याची बायको त्याला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर आली होती. तिच्या डोळ्यासमोरच हा खून झाला.
खून झालेल्या व्यक्तीच नाव मेहमूद खान उर्फ मेहमूद कालिया.
त्याची बायको अशरफ खान. ती प्रचंड सुंदर होती. त्यांच लग्न होऊन जास्ती काळसुद्धा उलटला नव्हता, भोळ्या अशरफला आपला नवरा काय काम करतो हे सुद्धा ठाऊक नव्हते. बऱ्याच दिवसांनी भारतात परत येणाऱ्या नवऱ्याला भेटायला मिळेल या खुशीने विमानतळावर आलेल्या अशरफवर नवऱ्याचा निर्घुण खून बघितल्यावर आभाळ कोसळलं.
मेहमूदची कोणाशी का दुष्मनी असावी, त्याला लोकांनी का मारल याचं गूढ तिला कळतच नव्हत. रात्रंदिवस रडून तिचे डोळे सुजले होते.
तेव्हा तिला एकाउस्मान नावाच्या म्हाताऱ्याने सगळी कहाणी सांगितली.
मेहमूद हा स्मगलिंगच्या काळ्या धंद्यामुळे कुविख्यात झालेल्या मुंबईचा डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस होता. दाऊदने दिलेल्या एका कामगिरीला नकार दिल्यामुळे त्याच्याबद्दल डी गँगमध्ये शंकेच वातावरण निर्माण झालं होतं. यातूनच त्याचा खून झाला होता.
अशरफला धक्काच बसला. आपल्या नवऱ्याला फक्त एका नकाराची एवढी मोठी किंमत चुकवावी लागली, आपल आयुष्य उध्वस्त झालं. तिच्या डोळ्यातले अश्रू आटले. तिच्यामध्ये प्रतिशोधाचा अग्नी पेटला होता. तिला मुंबईच अंडरवर्ल्ड त्यांचं राजकारण त्यातला पैसा हे काहीही ठाऊक नव्हत. एकच गोष्ट तिला माहित होती,
आपल्या नवऱ्याचा खून करणाऱ्या दाऊद इब्राहीम कासकर ला संपवायचं.
कायम बुरख्यात राहणाऱ्या अशरफने ठरवलं खरं पण दुबईमध्ये प्रचंड सिक्युरिटीमध्ये राहणारा दाऊदच काय त्याच्या पायाच नख देखील कोणाच्या दृष्टीस पडू शकत नव्हत. पोलीस कम्प्लेंटचा काहीच उपयोग नव्हता. उस्मानने तिला एका खास माणसाकडे पाठवलं. त्याच नाव हुसेन उस्तारा.
हुसेन उस्तारा हा कुख्यात गँगस्टर तर होताच पण शिवाय तो पोलिसांचा खबऱ्या देखील होता. एकेकाळी शार्पशुटर म्हणून अंडरवर्ल्डमध्ये त्याची ख्याती होती. पण दाऊदची टीप पोलिसांना दिल्यामुळे त्याच्यावर तोंड लपवून अंडरग्राउंड होण्याची पाळी आली होती. पण दाऊदशी पंगा घेऊ शकतो असा डोंगरीतला एकमेव माणूस म्हणजे हुसेन उस्तरा हे सगळ्यांना ठाऊक होतं.
अशरफ खान उस्मानचाचा च्या सांगण्यावरून हुसेन उस्तराकडे आली. त्याला आपली सगळी कर्मकहाणी सांगितली. उस्तराने तिला विचारले की तुला मी काय मदत करू शकतो. अशरफ म्हणाली,
“मला बंदूक चालवायला शिकवा बस्स.”
हुसेन उस्तरा त्या निरागस उत्तराने मनाशीच हसला. बंदूक उचलणारही नाही एवढी नाजूक असलेली ही पोरगी भारतातल्या सर्वात मोठ्या डॉनला पिस्तुलने मारण्याच स्वप्न बघते याच त्याला आश्चर्य वाटलं. हे एवढ सोप नाही हे तो सांगणार होता पण तो काही बोलला नाही. त्याने तिला दुसऱ्या दिवशी बोलावलं.
तिचं प्रशिक्षण सुरु झालं. पुढच्या दोन महिन्यात अशरफला फक्त पिस्तुल चालवायचं नाही तर स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट,चाकू चालवणे, मोटारसायकल चालवणे अशा बऱ्याच गोष्टी उस्तराने शिकवल्या. सुडाने पेटलेल्या अशरफ खानचं आंतर्बाह्य रुपांतर झालेलं.
बुरख्याशिवाय बाहेर न पडणारी अशरफ आता जीन्स घालू लागली होती. तोंडातून एक शब्द काढायला घाबरणारी अशरफ आता रस्त्यात कोणाशीही नडायला पुढे मागे बघत नव्हती.
हुसेन उस्तराच्या सांगण्यावरून दाऊदच्या विरुद्ध मदतीसाठी ती अरुण गवळीपर्यंत जाऊन पोहचली होती. पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तला वाटलं की आपल्या मुस्लीम नावामुळे गवळीने आपल्याला मदत केली नाही. त्याच दिवशी तिने स्वतःच नाव बदलुन सपना केलं.
सपना रोज रात्री फिरत असायची. मुंबईतल्या प्रत्येक काळ्या धंद्याचे अड्डे, डान्सबार याची माहिती काढून त्यात दाऊदचा कोणत्याही प्रकारे संबंध आहे हे आढळल्यास ती खबर निनावी फोन करून क्राईम ब्रांचला द्यायची. पोलिसांनी जाहीर केलेला इनाम घ्यायला देखील ती जायची नाही.
काही आठवड्यातच अशरफ खान उर्फ सपनाने दाऊदच्या साम्राज्याला मोठं खिंडार पाडलं.
त्याच्या ४० साथीदारांना अटक झाली. २० जण तडीपार झाले. दोन जुगार अड्ड्यांना पोलिसांनी सील ठोकल. दाऊदचे अनेक धंदे अडचणीत आले. इतक्यावर्षात खुद्द हुसेन उस्तराला जे करायला जमल नव्हतं ते सपनाने फक्त पंधरा दिवसात करून दाखवलेलं. दाऊदची माणस आपली टीप कोण देतय याच्या मागावर होती पण त्यांना काहीच हाती लागत नव्हत. एकदा तर सपना सापडता सापडता वाचली. हुसेन उस्तराने दिलेल्या मार्शल आर्टच्या ट्रेनिंग तिच्या कामी आलं.
पण उस्तराने सांगितलं की एवढ्यावर दाऊद आपल्याला सापडायचा नाही. सापाला बिळातून बाहेर काढायचं झालं तर आग पेटवायला लागणार होती. सपना तर यासाठीच उतावळी झाली होती. मोठा हात मारायचं ठरलं.
दाऊद इब्राहीम फक्त घड्याळांच, दारूचं स्मगलिंग करत नव्हता तर तो पाकिस्तानातून नेपाळमार्गे खोट्या नोटा देखील स्मगल करायचा.
यासाठीप्रचंड मोठी तयारी आणि संरक्षण असायचं. काही जण म्हणतात की पाकिस्तानी सरकार आणि लष्करसुद्धा यात सामील होतं. हुसेन उस्तराने आपली सूत्रे हलवली. काठमांडूमध्ये देखील त्याचे काही मित्र होते त्यांना मदतीला घेतल. या मोहिमेवर तो स्वतः देखील सपनाबरोबर होता.
हिमालयाच्या अनेक डोंगर रांगा पार करून गेल्यावर त्यांचा सामना एका बर्फाळ दरीत गाढवावर लादून काही पोती घेऊन चाललेल्या नेपाल्यांशी झाला. त्याच्याशी बोलत असतानाच गोळीबाराचा आवाज झाला. मागून काही तगडे युवक धावत येत होते. सपनाने प्रसंगावधान राखून त्यांच्यावर आपल्या पिस्तुलातून प्रत्युत्तर दिले.
उस्ताराच्या लक्षात आले की हे पाकिस्तानवरून आलेलं कन्साईमेंट आहे. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. कसबस जीव वाचवून उस्तरा आणि सपना परत आले. त्यांच्या हाती काही एके ४७ आणि काही पिस्तुल लागले होते. उस्तराला त्या बंदुका विकून लाखो रुपये कमवायची इच्छा होती पण सपनांने त्या सगळ्या बंदुका कड्यावरून फेकून दिल्या.
या बंदुकातून नवीन दाऊद होऊ नये हीच इच्छा होती.
अशा अनेक मोहिमा त्यांनी नेपाळमध्ये केल्या. दाऊदला शंका आलेलीच. त्याने मोठी शोध मोहीम सुरु केली. अंडरवर्ल्ड मध्ये सपना दीदी हे नाव हळूहळू गाजू लागलं. नेपाळमध्येच एकदा सीमा सुरक्षा दलाबरोबर त्यांचा आमनासामना झाला होता पण थोडक्यात दोघेही सहीसलामत बचावले. यानंतर मात्र त्यांनी नेपाळमधील मोहीम थांबवली.
काही वर्षे उलटून गेली. सपना आणि हुसेन उस्तरा यांच्यातही वाद झाले. उस्तराने एकदा दारूच्या नशेत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि यावर चिडून सपनाने त्याच्याशी सगळेच संबंध तोडले. ती स्वतःच एकाकी दाऊदला मारण्याच्या मागे लागली. पण हुसेनच आपल्या खबऱ्यामार्फत तिच्यावर पूर्ण लक्ष होतं.
साल होतं १९९०. शारजा मध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार होते.
भारतात याची हवा होती. उस्तराला टीप मिळाली की सपनाने देखील शारजाला जाण्याचा प्लॅन केला आहे. त्याला ठाऊक होते की सपनाला क्रिकेटमध्ये काडीचाही रस नाही पण
ती शारजाला जाते याच एकमेव कारण म्हणजे दाऊद.
आपल्या महालातून कधीही बाहेर न पडणारा दाऊद इब्राहीम फक्त शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये दिसतो हे आता पर्यंत सगळ्यांना माहिती झाले होते. टीव्हीवर मॅचच्या प्रक्षेपणावेळी पॅव्हेलीयनमध्ये व्हीव्हीआयपीच्या राखीव रांगेत काळ्या गॉगलमध्ये बसलेला मिशीवाला माणसाच्या प्रत्येक हालचालीचा अभ्यास सपनाने केला
तिचे साथीदार दुबईला जाऊन सगळी टेहळणी करून आले. शारजा स्टेडियमचा नकाशा पैदा करण्यात आला. शस्त्रास्त्रे जमवण्यात आली. ती कुठे लपवायची याचही नियोजन झालं. एखाद्या खेळाडूने सिक्सर मारला की स्टेडियममध्ये जनसमुदाय करत असलेल्या जल्लोषावेळी सपनाची माणसे दाऊदच्या अंगरक्षकावर हल्ला करणार आणि सपना दाऊदवर गोळ्या झाडणार असा प्लॅन तयार झाला.
मॅचची तिकिटे बुक झाली. दाऊदचा काटा निघाणार असे हुसेन उस्तराला सुद्धा वाटू लागले होते. पण तेवढ्यात माशी शिंकली.
सपनाच्याच एका साथीदाराने ही खबर दाउदचा उजवा हात समजला जाणाऱ्या छोटा शकीलला सांगितली. सपनाने आपला प्लॅन कॅन्सल केला. उस्तरच सगळ्या घडामोडीवर लक्ष होतं. शकीलचा तापट स्वभाव देखील त्याला माहित होता पण
अंडरवर्ल्डच्या अलिखित नियमाप्रमाणे शकील एका बाईला इजा करणार नाही असच त्याला वाटत होतं.
सपनाने देखील एका पोलीस कॉन्स्टेबलबरोबर लग्न करून नागपाड्यातील हुजरा गल्लीत राहायला गेली. तिथेच दाऊद इब्राहिमच वडिलोपार्जीत घर देखील आहे. आपण गुन्हेगारी विश्वापासून दूर आलोय अस दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता. तिच्या सोबत कायम काही अंगरक्षक असत होते.
मात्र एक दिवस तापाने फणफणलेल्या सपनाने आराम करण्यासाठी आपल्या अंगरक्षकांना रजा दिली. याची खबर कोणीतरी शकील पर्यंत पोचवली. रात्री १० वाजता एक लाल मारुती व्हॅन नागपाड्याच्या शांत वस्तीत शिरली.
त्यात बसलेल्या चार गुंडांनी सपनाच्या घरात प्रवेश केला आणि तिला चाकूने भोसकून ठार केले.
विशेष म्हणजे त्यांच्याकडे बंदुक देखील होती मात्र दाउदच्या विरोधात जाणार्याचे हाल कसे होतात हे दाखवण्यासाठी शकीलच्या माणसांनी तिच्या गुप्तांगावर २२ पेक्षाजास्तवेळा चाकूचे वार करून मारले. एका सूडनाट्याचा अंत झाला. काही वर्षांनी हुसेन उस्तराचा सुद्धा असाच एका संध्याकाळी एकट गाठून खून करण्यात आला.
हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.
हे ही वाच भिडू.
- अंडरवर्ल्डच्या पैश्यातून बनलेल्या चोरीचोरीने बॉलिवूडला शहाणं केलं.
- हाजी मस्तान ते दाऊदच्या गर्दीत बेबी पाटणकर मात्र टिच्चून उभा होती.
- शारजा मध्ये अस काय झालं होतं, की तिथे क्रिकेट खेळणं अचानक बंद झालं.
- ते दाऊदचा फोटो काढू लागले तोच, कोणाच तरी लक्ष त्यांच्याकडे गेलं