दाउदच्या लोकांचा आणि नवाब मलिक यांचा सबंध फडणवीस यांनी ‘असा’ लावला होता.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी ही अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता. 

मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढं आल्याचं समजतय.

पण आत्ताच नाही तर २०२१ च्या दिवाळीत सुद्धा नवाब मालिकांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं होत.  

 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. आणि याचे पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं ते म्हणाले होते, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बॉम्ब फोडला.

देवेंद्र फडणवीस त्यांनी थेट नवाब मलिक यांचे दहशतवाद्यांशी असलेले सबंध उकरून काढले. हे प्रकरण काय वळण घेतेय ते बघूया…  

देवेंद्र यांनी उल्लेख केलेले दोन लोकं कोण ? 

१. सरदार शाहबअली खान –

मागे नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसच ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यालाच उत्तर देत फडणवीस यांनी हि पत्रकार परिषद घेतलीये. या परिषदेत त्यांनी २ व्यक्तींची माहिती दिली, एक म्हणजे सरदार शाहबअली खान जो १९९३ च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये दोषी आढळला होता आता तो तुरुंगात असून जन्मठेप भोगतोय. सुप्रीम कोर्टाने त्यांची हि जन्मठेप कायम केली आहे. 

सरदार शाहबअली खान याच्यावर आरोप असे होते कि, टायगर मेमन याच्या नेतृत्वात चालू असणाऱ्या फायर ट्रेनिंग मध्ये सहभागी होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महानगरपालिका या दोन्ही बिल्डिंग मध्ये बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी या शाहबअली खान ने केली होती. अल हुसेनी बिल्डिंग मध्ये टायगर मेमनच्या घरी जे बॉम्ब ब्लास्टचं जे प्लॅनिंग झालेलं त्यात हा शाहबअली खान  उपस्थित होता. त्याच्या घराखाली लावलेल्या गाड्यांमध्ये आरडीएक्स हे या शाहबअली खानने भरलं होतं. थोडक्यात या बॉम्ब ब्लास्टचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून शाहबअली खान सरकारी साक्षीदार बनला आणि कोर्टाने याला जन्मठेपेची शिक्षा दिली.

२. सलीम पटेल 

आता दुसऱ्या कॅरेक्टर बद्दल बघूया, तो म्हणजे मोहम्मद सलीम इशाक पटेल. 

हा तोच सलीम पटेल ज्याच्यासोबत स्वर्गीय आर.आर. आबा पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता. सलीम हा दाऊदची धाकटी बहीण हसिना पारकर हिचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.   २०१० मध्ये मुंबईत एका ईदच्या इफ्तार पार्टीत तत्कालीन गृहमंत्री आर.आर आबा गेले होते. अंडरवर्ल्ड दाऊदची मानसं गृहमन्त्र्याना भेटतात म्हणून मोठा वाद निर्माण झाला होता. पण खरं तर आर. आर. पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. 

बरं या दोन दाउदच्या लोकांची माहिती सांगण्याचा आणि आत्ता च्या प्रकरणाचा काय सबंध ? तर आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर आरोप केलेत कि, दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांच्या कुटुंबियांच्या कंपनीला जमीन विकली. 

“कुल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर होते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ 30 लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचं पेमेंट केलंय 20 लाखांचं. आजही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं आहे.”

फडणवीस यांनी असंही पुढे म्हणाले कि, “मला मिळालेल्या माहितीनुसार, आजही एक कोटी महिना या जागेचं भाडं सॉलिडसला मिळतंय”.

२००३ मध्ये हा व्यवहार झाला तेंव्हा नवाब मलिक मंत्री होते. 

अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. 

म्हणजेच नवाब मलिक यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसतोय. मला या गोष्टीचं दु:ख आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्टच्या दुर्दैवी घटनेची तुम्ही आठवण काढा. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरलं अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? अशा एकूण ५ मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. २००५पासून २ वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केला? 

आता याच मलिकांना अटक झाल्याने हे प्रकरण पुढे काय वळण घेणार हे पाहणं संयुक्तिक ठरेल. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.