दाऊद इब्राहीमवर खूनी हल्ला करणारा एक गुजराती डॉन देखील होता.

भारतातील गँगस्टरचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर कुख्यात गँगस्टर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचाच चेहरा उभा राहतो. पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात देशात एक असा देखील गँगस्टर होता ज्याने डॉन दाऊद इब्राहीमला देखील धडकी भरवली होती. तो गुजरातचा होता. विशेष म्हणजे गुजरातचा दाऊद इब्राहीम म्हणून तो ओळखला जायचा.

अब्दुल लतीफ असं त्याचं नाव. जो गुजरातचा ‘दाऊद इब्राहीम’ म्हणून देखील ओळखला जायचा.

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या ‘पेंग्विन इंडिया’ने प्रकाशित केलेल्या ‘डायल : डी फॉर डॉनया पुस्तकात अब्दुल लतीफच्या गुन्हेगारी कृत्यांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. असंही मानलं जातं शाहरुख खानने ‘रईस’ या चित्रपटात निभावलेली भूमिका अब्दुल लतीफच्याच आयुष्यावर बेतलेली आहे.

कोण होता अब्दुल लतीफ..?

२४ ऑक्टोबर १९५१ रोजी गुजरातमधील कालूपूर येथे अब्दुल लतीफचा जन्म झाला होता. तंबाखू विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल वहाब शेख यांना अब्दुल लतीफ व्यतिरिक्त अजून ७ मुलं होती. घरची परिस्थिती अर्थातच हलाखीची.

हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि लतीफच्या वाढत्या गरजा यांमुळे तो लहान वयातच गुन्हेगारी जगताकडे आकर्षित झाला होता. ‘अल्लाह रक्खा’ या गुजरातेत अवैध पद्धतीने दारूचा अड्डा चालवणाऱ्या गुन्हेगाराच्या साथीत तो गुजरातमधील गुन्हेगारी जगतात सक्रीय झाला.

त्यानंतरच्या काही दिवसांच्या काळात अल्लाह रक्खाच्या विरोधी टोळीतील मंजूर अलीची नजर लतीफवर पडली. त्याने लतीफला आपल्यासाठी काम करण्याची ऑफर दिली. मंजूर अलीने चांगले पैसे दिल्याने लतीफ त्याच्या टोळीत सामील झाला. पण २-३ वर्षानंतर त्याच्यावर मंजूर अलीचे पैसे चोरण्याचा आरोप झाला आणि दोघांमध्ये फुट पडली.

काही दिवसातच त्याने स्वतःची गँग. गुन्हेगारी जगतावर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुठलाही मार्ग अवलंबवण्याची त्याची तयारी असायची. त्यामुळे अपहरण, खंडणी, खून अशा अनेक गुन्ह्यामधली त्याची सक्रियता वाढली आणि त्याची दहशत देखील वाढली.

अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश आणि दाऊदवर खुनी हल्ला.

अहमदाबादमध्ये त्याची भेट अंडरवर्ल्डमधील पठाण  गँगमधील अमीन खान नवाब खान आणि आलम खान जंगरेज खान यांच्याशी झाली. या दोघांनी १९८१ साली दाऊदचा मोठा भाऊ  साबीर इब्राहीमची हत्या घडवून आणली होती. त्यामुळे दाऊद त्यांच्या मागावर होता. लतीफने या दोघांना आपल्या पंखाखाली घेतलं. त्यामुळे तो अंडरवर्ल्डशी जोडला गेला आणि त्याने थेट दाऊद इब्राहीमशी शत्रुत्व पत्करलं.

१९८३ साली दाऊदला तस्करविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात येऊन अहमदाबादमधील साबरमती सेन्ट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी पोलीस दाऊदला बडोद्यातील न्यायालयात घेऊन जात होते. ही बातमी जेव्हा लतीफला समजली त्यावेळी त्याने आपल्या साथीदारासह पोलिसांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला.

लतीफ इतका निडर होता की त्याने वाटेतच पोलिसांची गाडी आडवून आतमध्ये बसलेल्या दाऊदवर फायरिंग केली आणि तो फरार झाला. या हल्ल्यात दाऊदचा जीव कसाबसा वाचला पण त्याचे अन्य २ साथीदार गंभीररीत्या जखमी झाले.

‘गुजरातचा दाऊद इब्राहीम’ म्हणून उदय. 

या घटनेनंतर या दोघांमधील गँगवॉर पेटलं. दाऊदवर झालेल्या या हल्ल्याचा बदला दाऊदचा पंटर डेव्हिड परदेसीने सप्टेबर १९८३ मध्ये पठाण गँगचा म्होरक्या अमीरजादा याची मुंबईच्या न्यायालयाबाहेर हत्या करून घेतला. पुढे लतीफचा शुटर शरीफ खान याने डेव्हिड परदेसीला यमसदनी पाठवलं.

daud

आतापर्यंत लतीफच्या नावावर अनेक केसेस दाखल झाल्या होत्या, पण गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रीय असतानाच अनेक गरिबांची मदत करून त्याने आपली प्रतिमा ‘रॉबिनहूड’ अशी केली होती. याचबळावर १९८७ साली अटकेत असूनदेखील त्याने अहमदाबाद नगरपालिकेची निवडणूक ५ वार्डामधून लढवली आणि जिंकली देखील. परिस्थिती अशी होती की आता तो ‘गुजरातचा दाऊद इब्राहीम’ म्हणून ओळखला जाऊ लागला होता.

दाऊदकडून मैत्रीचा प्रस्ताव. 

दोन्ही गँगमधील शत्रुत्वात होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेवटी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमनेच दोघांमधील वैर विसरून लतीफसमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. दुबईमध्ये दोघांची भेट झाली आणि दोघांनीही कुराणच्या प्रतीवर हात ठेऊन मित्रत्वाची शपथ घेतली. त्यानंतर दाउदच्या सांगण्यावरून लतीफने दारूची अवैध तस्करी बंद करून सोन्याच्या तस्करीत सक्रीय झाला.

त्यानंतर मुंबईतील अनेक  गुन्हेगारी घडामोडींमध्ये त्याचा हात होता. शहजादा नावाच्या मुंबईतील एका गुंडाला अभय देणाऱ्या हंसराज त्रिवेदीच्या हत्येसाठी त्याने घडवलेल्या राधिका जिमखाना हत्याकांडा मुळे तर फक्त गुजरातमध्येच नाही तर संपूर्ण देशाभरात भीतीची लाट पसरली होती.

पोलीस एन्काऊंटरमध्ये खातमा.

या प्रकरणामुळे पोलीस त्याच्यामागे हात धुवून लागले. कारण हत्याकांडात पकडलेल्या गुन्हेगारांनी लतीफविरोधात साक्ष दिली होती. अनेक प्रयत्न करून देखील त्याला कुठलीही राजकीय मदत मिळत नव्हती. राज्यसभेचे माजी खासदार रऊफ वलीउल्लः यांनी त्याच्याविरोधात मोहीम सुरु केली होती.

यावेळी पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तो फरार होऊन दाऊदकडे दुबईला गेला. त्यानंतर लतीफने रऊफ वलीउल्लः यांची देखील भरदिवसा हत्या घडवून आणली. या हत्येमुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. पुढे १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता.

१९९५ साली गुजरात एटीएसला लतीफ दिल्लीमध्येच असल्याची बातमी समजली आणि पोलिसांनी फिल्डिंग लाऊन भर चौकात लतीफला ताब्यात घेतलं. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. २ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर लतीफ पोलिसांना धोका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस एन्काऊंटरमध्ये हा ‘गुजरातचा दाऊद इब्राहीम’ मारला गेला. एका दहशतीच्या पर्वाची समाप्ती झाली.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.