सुषमा स्वराज यांच्या एका निर्णयामुळे दाऊदचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं होतं.
Cinema is the Most Beautiful Fraud in the World..
खरंच आहे ते. भारतात तर या सिनेमाचे इतके दिवाने आहेत लोक की, एकवेळ देव सोडतील पण नटनट्यांना अक्षरशः पुजतील. पण एकवेळ अशी होती की सिनेमाच्या या पंढरीवर म्हणजेच बॉलिवूडवर कुख्यात डॉन दाऊदचं इब्राहिमच वर्चस्व होत. ते प्रस्थच इतकं होत की, त्याच्या मर्जीशिवाय बॉलिवूमधलं इकडचं पान तिकडं हलवलं जायचं नाही. अनभिषिक्त सम्राट होता दाऊद या बॉलिवूडचा.
पण त्याच्या या बॉलिवूडच्या साम्राज्याला सुरुंग एका महिलेनं लावला होता. नाव होत सुषमा स्वराज. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात घेतलेल्या त्यांच्या एका निर्णयामुळे बॉलिवुडवरचा दाऊदराज संपला होता.
हा निर्णय काय होता? त्याच महत्त्व समजून घेण्याआधी भारतीय चित्रपटांचे अर्थशास्त्र समजून घेणे आवश्यक आहे.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी सुमारे ३००च्या वर चित्रपट बनतात. त्यापैकी हिट सुमारे १० ते १५ होतात. काही चित्रपट अगदी कमी चालतात, म्हणजे फक्त खर्चाचे पैसेच निघतात. सुमारे २० ते २५ असे सिनेमे चांगल्या प्रकारे पैसे कमवतात. इतर चित्रपट तोट्यात जातात.
तेच तेलुगु, मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक सिनेमा जगात थोड्या फरकाने दिसेल. सिनेमाचे ग्लॅमर पाहून अनेक उत्साही निर्माते तयार होतात. परंतु या क्षेत्रातील अडचणी न समजल्यामुळे, दलालांद्वारे फसवले गेल्याने हे उत्साही निर्माते अडचणीत यायचे.
ऐंशी-नव्वदच्या दशकात बॉलिवूडने असे हजारो निर्माते दिवाळखोर होताना पाहिले आहेत. हे निर्माते तीन पद्धतींद्वारे सिनेमा निर्मितीसाठी पैसे गोळा करायचे. बाजारातून, सावकार लोकांकडून मोठ्या व्याजदराने पैसे गोळा करणे ही पहिली पद्धत होती. हे व्याज ३६ ते ४० टक्के असायचे. यामुळे निर्मात्यांची स्थिती आणखी बिकट झाली.
दुसरा मार्ग म्हणजे काळा पैसा जो राजकीय नेते आणि व्यावसायिकांच्या मुख्य व्यवहारात नसायचा.
तिसरा आणि सर्वात धोकादायक स्त्रोत होता अंडरवर्ल्ड. दाऊदची टीम सिनेमा निर्मिती मध्ये पैसे गुंतवण्यात पुढे होती.
डॉनच्या पब्लिकला आधीच बॉलिवूड आणि अभिनेता-अभिनेत्रींची भुरळ पडली होती. दुसरे म्हणजे, यातून मिळणारा पैसा ही चांगला होता. जर डॉनकडून घेतलेले पैसे वेळेवर परत केले गेले नाहीत, तर त्याचे परिणाम वाईट होतील हे समजून कित्येक निर्माते कोणताही मार्ग स्वीकारून वेळेवर पैसे परत करायचे.
नव्वदच्या दशकात अनेक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दाऊदकडून दिलेल्या पार्ट्यांमध्ये वर्तमान पत्राच्या पेज थ्रीवर झळकायचे. शारजामधील क्रिकेट सामन्यादरम्यान बॉलिवूडचे अनेक अभिनेते दाऊदच्या शेजारी बसण्यासाठी अक्षरशः मरायचे.
बॉलिवूडची ही मंडळी एकाच वेळी दाऊदच्या दहशतीखाली आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबली होतीत. बॉलिवूडची आर्थिक स्थिती त्याच्या हातात आहे हे कळल्यानंतर अनेक भाई लोकांच्या आशा वाढल्या. अशातूनच मग टी-सीरिजच्या गुलशन कुमारची निर्घृण हत्या करण्यात आली. राकेश रोशन आणि राजीव राय यांसारख्या आघाडीच्या निर्मात्यांवर प्राणघातक हल्ले झाले. अंडरवर्ल्डवर बॉलिवूडचे अवलंबित्व होते.
बॉलिवूडला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी एका मसिहाची गरज होती. तो मसीहा म्हणजे वाजपेयी सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज.
त्यांनी वाजपेयींना पुढे करून एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळवून दिला. ज्यामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग चित्रपटांसाठी खुला झाला. पूर्वी, त्या स्थितीच्या अभावामुळे, बॉलिवूडला चित्रपटांसाठी लागणार पैसा उभा करण्यासाठी काळा पैसा, अंडरवर्ल्ड सारख्या स्त्रोतांकडे पाहावं लागायचं.
पण सुषमा स्वराजांच्या एका निर्णयाने ही परिस्थिति रातोरात पालटली.
‘वाजपेयी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांपैकी एक’ म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल. आर्थिक मदत सुरू होताच ‘स्टुडिओ’ संकल्पना सिनेमा निर्मितीत आली. परदेशी गुंतवणूक सुरू झाली आणि भारतीय सिनेमाला चांगले दिवस आले.
सिनेमा जगताचा अभ्यास करणाऱ्यांचं असं मत आहे की २००० सालानंतर, अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचे एकमेकांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण खूप कमी झाले. बॉलिवूड निर्मात्यांवर होणारे हल्ले पूर्णपणे थांबले. दोन दशकांच्या भीतीनंतर सिनेजगताच्या पंढरीने म्हणजेच बॉलिवूडने मोकळा श्वास घेतला होता.
हे ही वाच भिडू
- एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!
- भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला
- मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..