जाता जाता ठाकरेंनी आगरी-कोळी मतांच्या जोरावर एकनाथ शिंदेंना पाडण्याचा प्लॅन केलाय..

गेल्या वर्षभरात नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा प्रश्न प्रलंबित पडलेला. का तर या विमानतळाला दिवंगत बाळासाहेबांचं नाव द्यायचं की दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव द्यायचं..?

याचवरून वाद निर्माण झाला आणि आंदोलन पेटलं होतं.

अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दि. बा. पाटील यांचं नाव देण्यास होकार दिला, मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता मिळाली आणि हा प्रश्न मार्गी लागलाय. 

पण यामागे उद्धव यांची एक राजकीय खेळी आहे..ते म्हणजे ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारले..

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत होती तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्याचा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला होता. त्यांच्याच पुढाकारात डिसेंबर २०२० मध्ये सिडकोने तशा प्रकारचा ठरावही पारीत केला होता. 

खरं तर एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर हा आगरी समाज पेटला आणि आंदोलने झाले. 

त्या दरम्यान हे आंदोलन पेटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पूरक भूमिका घेतली असं म्हणलं जातंय तो भाग वेगळा मात्र या आंदोलनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालेला.

या आंदोलनात हा आगरी समाज शिवसेनेच्या आणि मुख्यत्वे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला होता. आजच्या घडीला बंडखोर एकनाथ शिंदेंच्या खात्याचा कारभार ठाकरे सरकारने काढून घेतलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अचूक वेळ साधत एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला विरोधही दर्शवला आणि नाराज आगरी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही केला.

थोडक्यात हा शिंदेंसाठी मोठा धक्का असणार आहे.

एकनाथ शिंदेच्या ठरावाला विरोध इथं पर्यंतच ही खेळी मर्यादित नाहीये तर या ‘आगरी समाजाचं’ व्होटबँक महत्वाचं आहे. 

तर आगरी समाज हा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आगरी कोळी समाज आहे. मुंबईत एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ३० टक्क्यांहून अधिक आगरी समाजाची लोकसंख्या आहे.

तसेच या भागातला भूमिपुत्र अशी या समाजाची ओळख आहे. अनेक वर्षांपासून या भूमिपुत्रांचा लढा सुरूच आहे. कुळकायद्या विरोधातल्या चरीच्या शेतकरी आंदोलनापासून ते आजच्या दि.बा.पाटील यांच्या विमानतळाच्या मागणीपर्यंत गेली कित्येक वर्षे आगरी समाज प्रस्थापिथाना, सरकारला धडक देण्याचं काम करतच राहिलेला आहे. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात दि. बा. पाटील यांनी निर्णायक भूमिका वठवली होती. 

तेच २०२० मध्ये देखील झालेलं शिंदे यांच्या विरोधात आगरी समाजाने तीव्र आंदोलन केलेलं. आता शिंदेच्या बंडानंतर उद्धव यांनी ही भूमिका घेत मोठी खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

याशिवाय आगरी ज्ञाती परिषद (१९१७), आगरी शिक्षण संस्था (१९३४), आगरी सेवा संघ, वरळी (१९३७), अखिल आगरी समाज परिषद यांच्यासह अनेक लहान-मोठ्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत. 

आगरी समाजातील नेते पाहायचे झाल्यास..

यात नाव म्हणजे दी.बा. पाटील. 

माजी आमदार दत्ता पाटील, ज्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अनेक वेळा गाजवली. तसेच आगरी समाजाचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मार्गी लावले. तर तत्कालीन शिवसेना, भाजपा युतीच्या मंत्रिमंडळात गणेश नाईक, ऍड. लीलाधर डाके, जगन्नाथ पाटील यांना मंत्रिपद लाभले होते.

तसेच पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून वाजेकर, प्रभाकर पाटील यांचं नाव महत्वाचं आहे. तर याच समाजाचे नारायण नागू पाटील हे आगरी समाजाचे पहिले आमदार तर सोनुभाई दगडू बसवंत हे पहिले खासदार तर कुल पाटील हे पहिले मंत्री असे सांगण्यात येत आहे.

यातील सेनेचे नेते म्हणजे ऍड. लीलाधर डाके, दी.बा पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, अनंत तरे अशी काही नावं समोर येतात.   

तसेच दिवंगत नेते अनंत तरे हे शिवसेनेचे ठाणे शहराचे तीनवेळेस महापौर होते. ते कोळी समाजाचे नेते होते. तर २००० ते २००६ अशी ६ वर्षे शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार होते. ठाण्यात आणि विशेषतः आगरी समाजात शिवसेनेची मोट बांधण्यामध्ये तरेंचे मोठे योगदान होते. ते कायम कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढत असत. 

अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे देखील ते अध्यक्ष होते. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यात खास योगदान आहे. 

मुंबईच्या नकाशावर, समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात, सत्तेत आगरी समाजाचं स्थान अगदी नगण्य झालं आहे. त्यामुळे राजकीय दबावगट निर्माण केल्याशिवाय आगरी समाजाचा विकास होणं अवघड असल्याचं या समाजाने जाणलंय. या समाजाचे ग्रामीण भागात काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस तर मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच आगरी समाज राजकीयदृष्टय़ा विभागला गेल्याचे दिसून येतं. 

सेनेवर नाराज असलेल्या या समाजाला आपल्याकडे खेचणं सेनेसाठी महत्वाचं आहे कारण, 

याआधी समाज शिवसेनेसोबत असल्याचे यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेले आहे. अगदी अलीकडच्या म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीत आगरी समाज शिवसेना-भाजप महायुतीसोबत होता. मात्र शिंदेच्या त्या ठरावानंतर हा समाज सेनेवर नाराज असल्याचे मोर्चांमधून दिसून आले आहे.

त्याच दरम्यान शिवसेनेचे त्याकडे दुर्लक्ष  झाले आणि आगरी-कोळी समाज शिवसेनेपासून दूरावत गेला. 

शिंदेंमुळे दुरावलेल्या आगरी-कोळी समाजाला आपलेसे करून घेण्यासाठी शिवसेनेचे आता सक्रिय झाल्याचं कळतंय.  त्याचाच भाग म्हणजे माजी आमदार सुभाष भोईर, बबन पाटील, अनंत तरे यांचे बंधू संजय तरे यांच्यासह ५० जणांनी शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. 

आता सेनेवर नाराज असलेल्या या समाजाला आपल्याकडे खेचणं सेनेसाठी महत्वाचं आहे आणि त्याचाच भाग म्हणजे हे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणं हा आहे.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि राज्यात सुरू असलेल्या घडामोडींनंतर शिंदे या नामांतराच्या मुद्द्यावर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आगरी समाजाचे लक्ष लागलं असणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी कोकणवासियांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे आणि त्यांची शिवसेनेविषयी असलेली बांधिलकी लपून राहिलेली नाहीये.  त्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई या शहरांमध्ये मूळ कोकणातील असलेले अनेकजण शिवसेनेत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. 

येत्या महानगपालिका निवडणूका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विश्वास संपादन करण्यात सेना कितपत यशस्वी ठरतेय का ? भूतकाळात शिवसेनेशी बांधिलकी दाखवणारा हा मतदार आता पुन्हा एकदा सेनेकडे येईल का हे  वेळच सांगेल.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.