डीन जोन्सला ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात जिगरबाज प्लेअर बनवलं, ते चेन्नईनं…

चेन्नईचं चेपॉक स्टेडियमचं नाव घेतल्यावर आपल्याला आठवण होते ती महेंद्रसिंग धोनीची. चेन्नई सुपर किंग्सचं हे होम ग्राऊंड असल्यानं धोनीच्या इथल्या स्टारडमला अजिबातच तोड नाहीये. चेन्नईची मॅच सोडा साधं प्रॅक्टिस सेशन असलं तरी चेपॉक फॅन्सनं फुल होतंय. पण हे ग्राउंड जसं धोनीच्या फॅन्ससाठी खास आहे, अगदी तसंच सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठीही कारण सचिननं आपल्या करिअरमधल्या कित्येक अविस्मरणीय इनिंग्स याच चेपॉकवर खेळल्यात.

एवढंच काय तर १९९९ मधली भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्टही याच मैदानावर झालेली.

असं सगळं असलं तरी चेपॉक सगळ्यात जास्त कुणाच्या लक्षात राहिलं असेल, तर ऑस्ट्रेलियन खेळाडू डीन जोन्सच्या. कारण आपल्या करिअरमधली फक्त तिसरीच मॅच खेळणाऱ्या डीन जोन्सचं करिअर चेपॉकवरच्या टेस्टमुळंच सेट झालेलं.

१९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर आली. भर उन्हाळ्यातला दौरा आणि त्यात पहिलीच टेस्ट मॅच होती चेपॉकवर. या दोन्ही भारी टीम एकमेकांना भिडणार म्हणल्यावर प्रेक्षकांनीही खतरनाक गर्दी केली होती. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिली बॅटिंग घेतली. डेव्हिड बून आणि जोफ मार्शनं खतरनाक स्टार्ट करुन दिला, पण मार्श ४८ रन्स करुन आऊट झाला. पण डेव्हिड बूननं मात्र खतरनाक बॅटिंग करत शंभर लावला.

सगळ्यांच्या नजरा होत्या त्या नवख्या डीन जोन्सवर. डीन जोन्सच्या टेस्ट करिअरमधली ही फक्त तिसरीच मॅच होती, त्यात त्याला ही संधी मिळालेली दोन वर्षांच्या अंतरानं. त्यामुळं जर संघात टिकून रहायचं असेल तर या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. पण डीन जोन्ससमोर त्यादिवशी दोन आव्हानं होती, पहिलं म्हणजे भारतीय बॉलर्स आणि दुसरं म्हणजे चेन्नईचं वातावरण.

यातल्या पहिल्या आव्हानाचा जोन्सनं किरकोळीत सामना केला. त्यानं रन्स तर केले, पण मोठं आव्हान ठरत होतं चेन्नईतली उष्णता.

बून आऊट झाल्यावरही जोन्सनं एक एन्ड लाऊन धरला होता. त्याच्या नावापुढं सेंच्युरी लागली आणि बघता बघता डबल सेंच्युरीही. भारतात येऊन गाठीशी फारसा अनुभव नसतानाही एवढी खतरनाक बॅटिंग करणं ही दुर्मिळ गोष्ट होती. पण जोन्सनं करुन दाखवलं. या सगळ्या दरम्यान त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. मैदानातच उलट्या झाल्या, चक्कर आली. पण लढणं सुरू ठेवलं आणि २०० रन्सचा माईलस्टोन त्यानं गाठलाच.

मात्र असा एखादा क्षण येतोच जेव्हा शरीर हार मानतं, डीन जोन्स जेव्हा टीब्रेकसाठी पॅव्हेलियनमध्ये गेला, तेव्हा त्याच्या अंगातली सगळी एनर्जी संपली होती. त्यानं २०२ रन्स केले होते, टीमचा स्कोअर सुद्धा सुरक्षित होता. त्यानं ऑस्ट्रेलियाचा तेव्हाचा कॅप्टन ॲलन बॉर्डरला सांगितलं की, ‘माझ्याकडून आता खेळणं होईना, मला रिटायर हर्ट घोषित कर.’

यावर चिवट बॉर्डरनं त्याला सांगितलं की, ‘तुला हवं असेल तर विकेट फेक आणि आऊट हो, पण तुला रिटायर हर्ट घोषित करणार नाही.’

एकतर जोन्सची तिसरीच टेस्ट मॅच होती, त्यात ऑस्ट्रेलियन संघात प्रचंड कॉम्पिटिशन असल्यानं जर जागा टिकवून ठेवायची असेल तर कॅप्टनचं म्हणणं ऐकणं गरजेचं होतंच. त्यामुळं जोन्स पुन्हा एकदा क्रीझवर गेला. पण फक्त आठ रन्सची भर घालून आऊट झाला.

उलट्या, उष्णतेमुळं होणार त्रास या सगळ्याचा सामना करत जोन्सनं दोनशे रन्स मारले होते, साहजिकच सगळं पॅव्हेलियन त्याचं कौतुक करत उभं राहिलं. पण डीन जोन्स पॅव्हेलियनमध्ये आलाच नाही. त्याला उन्हाचा इतका त्रास झाला होता की डीन जोन्सला थेट हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करावं लागलं.

या इनिंगमुळं दोन गोष्टी झाल्या, त्या २०२ रन्समुळं डीन जोन्सचं बॅटिंगमधलं टॅलेंट सगळ्या जगानं पाहिलं आणि उलट्या होत असतानाही दाखवलेलं जिगर त्याच्यावर ‘पक्का ऑस्ट्रेलियन खेळाडू’ असल्याचा शिक्का बसवून गेलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.