नागराज, हजारो जब्या तुझ्यामुळे स्वप्न पाहायला शिकलेत…

प्रिय नागराज,

प्रत्येकालाच नाही जमत स्वप्न बघायला. जगात प्रत्येकालाच स्वप्न पडतात. पण स्वप्न पडणं आणि स्वप्न बघणं यात फरक आहे. झोपलेल्या माणसालाही स्वप्न पडतात. पण स्वप्न बघायला रात्र रात्र जागावं लागतं. काळोखाचं एकटेपण भोगावं लागतं. म्हणून स्वप्न पडणं महत्वाचं नाही. स्वप्न बघणं महत्वाचं असत.

हजारो वर्षापासून सफरचंद झाडावरून पडत होतं. पण त्यात गुरुत्वाकर्षण बघणारा एखादाच न्यूटन असतो. तू आमचा न्यूटन आहेस. बोधकथा खूप असतात. पण कोसळण्यातून मिळणारी उसळण्याची प्रेरणा जास्त अस्सल असते. तुझ्या गोष्टी अशा उर्जा देणाऱ्या आहेत. तू जगलेल्या पण. तू लिहिलेल्या पण.

तुझ्या सिनेमाने माणूस पेटून उठतो. पण स्वतःला बदलायला. fandry सारखा भिरकावला पाहिजे दगड समाजाच्या दिशेने. जो कुणाचं डोकं फोडणार नसतो. पण डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार असतो. काळजाला हात घालणारा असतो. काळी चिमणी शोधता शोधता आपल्या विचारांना फुटलेले पंख सापडले पाहिजेत. पक्षांना उडता येतं कारण ते वजनाने हलके असतात असं म्हणतात लोक. खरंतर माणसाचं स्वतःचं ओझं कुठे जास्त असतं? त्याच्या मनातल्या जाती धर्माचंच ओझं त्याला जखडून ठेवतं. नाहीतर कितीतरी भराऱ्या मारता आल्या असत्या अजून माणसाला.

तू हे ओझं भिरकवून देतोस आणि सैराट होतो. तुझा सिनेमा उसाच्या शेतासारखा वाटतो. लांबून खूप सुंदर, मोहक. जसजसे आत शिरायला लागतो तसे उसाच्या पात्यांचे न कळणारे पण धारदार ओरखडे. मग जाणवणारी आग. आणि आता आपली काही सुटका नाही अशी एक भीती. आणि शेवटी बाहेर पडलो तरी प्रत्येक पात्याची खुण आपल्याला जाणीव करून देत असते. वेदनेची, अन्यायाची आणि आपण माणूस असल्याची.

तू गावी लहानपणी चोरून, थियटरच्या पत्र्याला छिद्र पाडून डोळ्यात साठवून घेतलेले सिनेमे हे एक वेगळं जग होतं. आता तू स्वतः पडद्यावर तुझ्या मनातला सिनेमा दाखवतोयस जगाला. हे वेगळं जग आहे. पण दोन्ही जगातला तुझा थेट भिडणारा स्वभाव सारखाच आहे.

गावातल्या थियटरच्या पत्र्याला छिद्र पाडून एक डोळा लावून बघणारा नागराज, आज कॅमेराला एक डोळा लावून बघणारा नागराज. तू खिशात काहीच नसताना तुला पाहिजे तो सिनेमा पाहिलासही आणि लिहिलासही. कारण तुझ्याकडे इच्छाशक्ती हेच भांडवल होतं. सिनेमा खिशात नाही डोक्यात असतो याची तुझ्यामुळे खात्री झाली आमची.

लहानपणी पडद्यापेक्षा मोठा वाटणारा अमिताभ, जगातली सगळ्यात भारी गोष्ट वाटणारा अमिताभ आता तुझ्या गोष्टीचा भाग आहे. ज्याचे संवाद आरशासमोर बोलण्यात अभिमान वाटायचा तो अमिताभ आता तुझे संवाद म्हणतोय. ज्याचा भारदस्त आवाज म्हणजे शेवटचा शब्द वाटायचा तो अमिताभ आता तू उच्चारलेले action आणि कट हे शब्द अंतिम मानून काम करतो हे खूप भारी आहे.

12068659 922784477757416 3742007027635469191 o

तुझा झुंड नावाचा सिनेमा आलाय. हिंदी. भाषा नवी आहे. पण तुला जे मांडायचंय ते पक्कं आहे. सैराटच्या शेवटी ती चिमुकली पावलं जे बोलून गेलीत ते कसं पुसलं जाणार? आणि कुठल्या भाषेत नाही कळणार?

नागराज,

हजारो जब्या तुझ्यामुळे स्वप्न पाहायला शिकलेत.मंडपाला पडलेल्या भोकातून सिनेमा पाहिल्यासारखा, लग्नातल्या बुंदीच्या पंक्ती चोरून बघणारा पोरगा आता नागराज मंजुळे होणार आहे.आता चंदेरी दुनियाच काय गाव सुद्धा ज्यांना स्वीकारायला तयार नव्हता असे कितीतरी तरुण सांगतील दुनियेला वेड लावणाऱ्या गोष्टी. ज्यात दुखाच्या ओसाड डोंगरावर सुद्धा दिसेल रांगड्या प्रियकरासारखा पेटून उठलेला गुलमोहर. अन्याय दूर होईलच हे नसतं सांगता येत. जखमा बऱ्या होतात काळाच्या ओघात. पण घाव विसरणं अवघड असतं.

फक्त आनंद हा आहे की जे स्वतःच्या जिवालाच ठाऊक होतं ते गावाला सांगायची संधी मिळतेय. बऱ्याचदा हाता पाया पडून पोलिसांनी जे म्हणणं साधं कागदावर लिहिण्याची तसदी घेतली नाही ते डायरेक्ट पडद्यावर मांडण्याची संधी. जे आजवर माळावर फिरत पाखरांना सांगितलं, बारवात बसून हमसून हमसून भिंतींना ऐकवलं ते जगाला सांगण्याची संधी. आजवर बापजाद्यांचं आयुष्य कायदा सांगेल तसं वागण्यात गेलं. त्यात निदान स्वप्न बघण्यासाठी या देशात कायद्याने बंदी नाही हे लक्षातच आलं नव्हतं बहुतेकांना.

आपण स्वप्न बघू शकतो हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. तो विश्वास यायला fandry, सैराट ,नाळ सारखं अस्सल स्वप्न पडद्यावर यावं लागतं. नागराज हे स्वप्न वास्तवात दाखवल्याबद्दल आभार.

व्यवस्थेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध शेकडो वर्षांपासून डोक्यात राग असतो लोकांच्या. आजही आहे. फक्त त्याचं काय करायचं हे पिस्तुल्या सांगून जातो. फुले, आंबेडकर जे सांगून गेले ते एवढ्या उत्कटपणे सांगता आलं पाहिजे. आगरकर, लोकहितवादींचं धाडस अंगी बाणवता आलं पाहिजे. तुकारामांचा वारसा जपता आला पाहिजे. काठावर ऊभं राहून आपलंच प्रतिबिंब दिसू शकतं पाण्यात. जगाला काही दाखवायचं असेल तर तळ गाठता आला पाहिजे.

लहानपणी विहिरीत पोहताना कुणीतरी एक नाणं टाकायचा. आणि मग सूर मारून ते तळाशी जाऊन घेऊन यायचं. तळ गाठल्याची साक्ष. तुझा प्रत्येक सिनेमा हा त्या नाण्यासारखा आहे. तू तळ गाठल्याची साक्ष आहे.

तू झूंड सिनेमा घेऊन आलास तेंव्हा आपला पट्टीचा पोहणारा सवंगडी सूर मारून पुन्हा पहिल्या झटक्यात ते नाणं घेऊन आलाय असं वाटतं. एकदम खणखणीत नाणं.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. खूप अपर कष्ट करून माणसाला यश मिळते आणि नागराज मंजुळे त्यापैकी एक आहे .कोणताही चित्रपट असो मग सैरात्मधील परश्या किवा फयान्द्री मधील जब्या लगेच पात्र डोळ्यासमोर उभे राहते .

Leave A Reply

Your email address will not be published.