केंद्र सरकार म्हणतंय, दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, पण सत्यता काय ?

देशात कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट किती भयानक होती हे वास्तवात आपण गेलोच आहोत. या दुसऱ्या लाटेत देशात एक मोठं संकट म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासली होती. आणि याच कमतरतेमुळे अनेक रुग्णांचे मृत्यूही झाले होते. एवढं सगळं डोळ्यादेखत घडत होतं आणि त्यात मोदी सरकार म्हणतंय कि, दुसर्‍या लाटेदरम्यान देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही…

सोशल मीडियावर नागरिक म्हणत आहेत, आत्तापर्यंत ऑक्सिजन च्या कमरतेमुळे बळी गेलेले रुग्ण काय आपल्या आयुष्याला कंटाळून मेलेत का ?

दुसऱ्या लाटेत बळी गेलेल्या रुग्णांचे आयुष्य वाचविणे हे केंद्र सरकारची जबाबदारी होती आणि त्यात केंद्र सरकार सपशेल फेल झालं आहे. आणि आता हे फेलीअर लपवता लपवता त्यांचं डोळे मिटून दुध पिणारं मांजर कधी झालं हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे.

सरकार काय म्हणतंय ?

खरं तर, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत कॉंग्रेसचे खासदार के.सी वेणुगोपाल यांनी राज्यसभेत सरकारला प्रश्न विचारला होता.

त्याला उत्तर म्हणून, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी असं म्हटले होते की, “दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची विशेष अशी माहिती आमच्यापर्यंत आली नाही”.

मनसुख मंडावीया यांनी सभागृहात सांगितले की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल केंद्राला माहिती देतात. त्यांच्या मते, कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाने अशी कोणतीही माहिती केंद्राला दिलीच नाही ज्यामध्ये असे म्हटले आहे की ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

पुढे त्यांनी अशी माहिती दिली कि,  कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी लक्षणीय वाढली आहे. पहिल्या लाटेत ३०९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती, तर दुसऱ्या लाटेत हीच मागणी ९००० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली होती.

वास्तविक मृत्यू किती ?

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत त्यात केंद्र सरकारचं  म्हणणं ऐकून आप्तस्वकीयांना गमावलेल्यांना किती दुःख झालं असेल याची कल्पना नको करायला.

नेमकी आकडेवारी अद्याप आपल्याला मिळाली नाही मात्र जी काही मिळाली ती अशी आहे कि,

आंध्रप्रदेश मध्ये तिरूपतीच्या SVRR GG रुग्णालयात ११ तर इतर हॉस्पिटल्समध्ये ३४ एकूण ४५  कोरोना रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमरतेमुळे झाला होता. मात्र आंध्र प्रदेशाच्या सरकारने फक्त २३ च मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर हरियाणातही ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोप करण्यात आले होते, हरियाणातील १९ मृत्यू हे तेथील विराट हॉस्पिटल मध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटक मधील कामराजनगरच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णालयात एकूण ६२ मृत्यू तर लाइफलाईन हॉस्पिटल मध्ये ५ , कलबुर्गी मध्ये ४, बालागावी मध्ये ३ रुग्णांचे मृत्यू  झाले आहेत. 

तर महाराष्ट्रात नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये 9 रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची नोंद मिळते.

उत्तर प्रदेशच्या मिरुत मध्ये ५ रुग्ण तर गुजरात मध्ये कुंदन हॉस्पिटलमध्ये २ मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली.

गोव्यातल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मे महिन्यात ८३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

दुसर्‍या लाटेत केंद्र सरकारने २८ मे पर्यंत १०, २५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाने दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकला जास्तीत जास्त १२००-१२०० मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यात आले. तर ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्लीला देण्यात आले होते. 

तर वेगवेगळ्या राज्यातून आलेली एकूण आकडेवारी पाहता १७८ पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती स्थानिक हॉस्पिटल्स मधून मिळते,

मात्र केंद्र सरकार ठामेठोक पणे सांगत आहे देशात  ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही कोव्हीड रूग्णांचा मृत्यू झाला नाही. अधिकृत आकड्यांपेक्षा खरी आकडेवारी कितीतरी जास्त पटीने असू शकते हे कुणीही मान्य करेल मात्र आपलं केंद्र सरकार कधी मान्य करेल याचीच वाट आता पाहूया…

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.