एकदा आलेला ग्राहक परत दुसरीकडे जातंच नाय यामागे डिकॅथलॉनची भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे
नीरज चोप्राने ऑलम्पिक गेम्समध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवूं दिलं आणि एकच कल्ला भारतात झाला. प्रत्येक भारतीयाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रत्येक क्षेत्रांतून नीरज चोप्राचं हे मोठं मोठं कौतुक करण्यात येऊ लागलं. नीरज चोप्राच्या यशाने सामान्य कुटुंबातील पालकांमध्येही आपल्या पोरांना खेळाच्या क्षेत्रात प्रवेश करू द्यावा, अशी मानसिकता तयार होऊ लागली. आणि बघता बघता स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळाडूंची संख्या वाढू लागली.
भारताला पुन्हा एकदा खेळाचं वेड लावलं ते नीरज चोप्राने. मात्र जगभरात ज्या लोकांनी स्पोर्ट्सला आपल्या आयुष्यात उतरवण्याचं स्वप्न बघितलंय, त्या सर्वांच्या जगण्याला स्पोर्ट्सची शैली देण्याचं काम केलं ते एकाच ब्रॅंडनं. ते म्हणजे ‘डिकॅथलॉन’.
मिशेल लेक्लर्क. पठ्ठ्याला खेळाचं भन्नाट वेड. वयाच्या ३५ व्या वयापर्यंत ते घरचा व्यवसाय चालवत होते जो आयटी क्षेत्राशी निगडित होता. मात्र त्यांचं काही त्यात मन रमत नव्हतं. त्यांचं मन रमायचं ते फक्त खेळामध्ये. खेळासाठी एक पूर्णपणे समर्पित व्यवसाय असावा असं त्यांचं नेहमीचं स्वप्न होतं. एक अशी जागा जिथे फक्त खेळ आणि खेळाडू हेच दिसतील. मग ते फुटबॉल खेळणारे असो किंवा धावणारे असो, पैसा त्यांच्या खेळाचे सामान घेण्याच्या रस्त्यात कधीच यायला नको.
त्या काळात अशाप्रकारची परवडणारी दुकानं अस्तित्वात नव्हती. मग काय, मिशेल यांनी घरचा बिजनेस गुंडाळला आणि निघाले आपल्यासारखेच खेळवेडे शोधायला. असा व्यवसाय सुरु करायचा म्हणजे मोठ्या भांडवलासोबतच मनुष्यबळाचीही गरज पडणार होती. अशावेळी त्यांना सापडले त्यांचे मित्र. त्यांच्या मित्रांनाही खेळाचं असंच वेड. मिशेल यांची खेळाडूंसाठीच्या आत्मीयतेने भरलेली कल्पना चटकन त्यांच्या मित्रांच्या हृदयापर्यंत पोहोचली आणि सुरुवात झाली ‘खेळाडूंच्या हक्काच्या ठिकाणाची’ पायाभरणी.
मिशेल आणि त्यांचे ६ मित्र. यातील काही जणांना बिजनेसच्या क्षेत्राचा अननुभवी नव्हता. मात्र त्या सगळ्यांमध्ये दोन गोष्टी सामायिक होत्या दृढनिश्चय आणि खेळाची आवड.
१९७६ चं ते साल, जेव्हा मिशेल यांनी फ्रान्समध्ये डिकॅथलॉनचं पहिलं दुकान उघडलं. त्यांच्या या दुकानाची आयडिया आणि त्यांची खासियत लोकांना इतकी आवडली की लवकरच दुकानाने यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. डिकॅथलॉनचं वैशिष्ट्य यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरलं. इतर व्यवसाय हे ग्राहक केंद्रित असतात मात्र डिकॅथलॉनने त्यांच्या ग्राहकांना स्वतःचं हृदय बनवलं. इतर कंपनीचं धोरण असतं की शक्य होईल तितक्या जास्त दराने सामान विकावं. मात्र डिकॅथलॉनचं धोरण यापेक्षा पूर्णपणे उलट आहे. शक्य होईल तितक्या कमी दराने खेळाच्या सगळ्या गोष्टी विकण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
त्यात अजून एक खासियत जी डिकॅथलॉनला पूर्णपणे वेगळं बनवते. स्पोर्ट्समध्ये काही स्कोप नाही, किंवा स्पोर्टमन लोकांना कुणी कामही देत नाही ही धरणही पुसून काढली. डिकॅथलॉनमध्ये कामाला असणारे सगळे लोक, सगळा स्टाफ म्हणजे खेळाडू आहेत. कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये पारंगत असणाऱ्या, एखाद्या खेळाचे कोच असणाऱ्या व्यक्तींना डिकॅथलॉनमध्ये काम मिळतं. यामागची संकल्पना म्हणजे येणारा प्रत्येक ग्राहक म्हणजे खेळाची आवड असणारा आहे. तेव्हा त्यांना कोणतीही वस्तू घेताना योग्य मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. ग्राहकांसाठी खऱ्या अर्थाने काय योग्य आहे, हेच त्यांनी घ्यावं म्हणून हा सर्व अट्टहास.
म्हणूनच प्रत्येक खेळाच्या सेक्शनमध्ये त्या त्या संबंधित खेळाचे जाणकार लोक कार्यरत आहेत.
डेकॅथलॉनच्या अशा भन्नाट मार्केटींग स्ट्रॅटेजीमुळेच त्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतात. कुणालाही कोणतीही वस्तू खरेदी करायला लावणं त्यानुसार त्यांचा माईंडसेंट तयार करणं हा उद्देश नसून, मार्गदर्शक स्टाफ मेम्बरने वस्तूची खरी माहिती देऊन पुढचा निर्णय ग्राहकांवर सोडायचा असतो. इतक्या मोकळेपणाने ते ग्राहकांच्या निर्णयाचं स्वागत करतात. मार्गदर्शक स्टाफच्या अशा विनयपूर्वक वागणुकीने आणि संबंधित क्षेत्रातील ज्ञान असल्याने ते ग्राहकांना अजूनच अपील होतात.
त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा अजून एक भाग म्हणजे, डेकॅथलॉन त्यांचे स्वतःचे ब्रँड डिझाइन करतात. त्याची चाचणी, उत्पादन आणि किरकोळ विक्री करण्यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी संशोधन आणि विकास क्षेत्रासाठी विशिष्ट टीम त्यांनी कार्यान्वित केलीये. जे नवीन उत्पादने आणि विद्यमान उत्पादनांच्या नवीन डिझाइनवर काळजीपूर्वक कार्य करतात.
त्यांच्या टेस्टिंगच्या स्पोर्ट्स लॅबमध्ये सगळे प्रोडक्टस टीम प्रोफेशनल्स, अथलेट्स, आणि स्पोर्ट्स एक्सपेर्ट्स तर्फे वारंवार चेक केले जातात. मानवी शरीराच्या वेगवेगळ्या स्थितीतील तापमानाचा यात विचार करण्यात येतो. खेळाच्या वातावरणाचा, ठिकाणांचा मोठा प्रभाव यावर दिसतो. तर त्यांच्या ग्राहकांसाठी एक सजेशन बॉक्स देखील असतो. ज्यात ते अजून नवीन आयडियांचं स्वागत करतात.
डेकॅथलॉनचे स्वतःचे खाजगी लेबल, आर अँड डी युनिट, पुरवठा साखळी आणि विक्री चॅनेल असलेल्या अनोख्या बिझनेस मॉडेलने कंपनीला मधला व्यक्ती आणि वितरक यांपासून दूर ठेवण्यास सक्षम केलं आहे. मार्केटिंग खर्च वाढवणं आणि स्पॉन्सरर्शीपसाठी पैसे ओतणे यावर कंपनी विश्वास ठेवत नाही. हा डेकॅथलॉनचा यशाचा मंत्र आहे आणि नफा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.
कंपनी नवशिक्यांवर म्हणजेच बिगीनर्स लोकांवर लक्ष केंद्रित करते. कारण त्यांना नेहमीचं हक्काचं ग्राहक बनवण्यात रूपांतरित करण्यावर कंपनीचा विश्वास आहे. सर्वांसाठी खेळ सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने डेकॅथलॉन एका देशातून दुसऱ्या देशात झपाट्याने एंट्री करत आलंय आणि अजूनही करतंय.
कॉम्पिटिशन पेक्षा स्वतःचं वेगळेपण संभाळण्यावर कंपनीचा विश्वास आहे. याच स्ट्रॅटेजीमुळे २०२१ पर्यंत जवळपास ६५ देशांच्या १००० शहरांमध्ये १६५५ डेकॅथलॉनचे स्टोर्स आहेत. ज्यामध्ये फ्रांस, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इटली, अमेरिका, चीन, भारत अशा देशांचा समावेश आहे. तर २०२० च्या आकड्यानुसार ११.४ बिलियन यूएस डॉलर असा कंपनीचा रेव्हेन्यू होता.
डिजिटल होत जाणाऱ्या जगात डेकॅथलॉनने देखील स्वतःला डिजिटल केलंय. डेकॅथलॉनची स्वतःची वेबसाईट असून इतर ऑनलाइन खरेदी- विक्रीच्या साईट्सवर देखील या ब्रॅण्डचं वेगळं सेक्शन आहे. २० पेक्षा जास्त स्वतःच्या मालकीचे ब्रँड्स असणाऱ्या डेकॅथलॉनचे ग्राहक दिवसागणिक वाढत आहेत. यामागे ग्राहकांचा विश्वास संपादित करणारी मार्केट स्ट्रॅटेजी आणि ग्राहकांसाठीची आत्मीयता कारणीभूत आहे.
ग्राहकांना अशी सल्ला द्या जणू ते तुमचे बेस्टमेट्स म्हणजेच सर्वोत्तम सहकारी आहेत. तुम्हाला DECATHLON मध्ये ग्राहकाची दिशाभूल करण्याची परवानगी नाही, असं मिशेल लेक्लर्क यांचं ब्रीदवाक्य आहे.
हे ही वाच भिडू :
- सारेगम कारवाची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांची भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी
- आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या स्पोर्ट्स बजेटचं श्रेय ऑलिम्पियन्सला दिलं पाहिजे भिडू