दुसऱ्या बाजीरावाने रायगडावर लपवलेल्या खजिन्याचं काय झालं ?
गोष्ट आहे अठराव्या शतकातली. दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात पेशवाईची सूत्रे आली होती. एकेकाळी दिल्लीवर पकड असणाऱ्या मराठ्यांचा दरारा महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर कमी झाला होता.
पण दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले, चैनीसाठी आणि दानधर्मात पैशांची उधळपट्टी सुरु केली.
१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. याच काळात इंग्रज हळूहळू भारतभरात जम बसवत होते.
राज्यकारभारात अननुभवी असलेल्या दुसऱ्या बाजीरावाने होळकर, शिंदे यांच्यावर वचक ठेवण्यासाठी व आपली पेशवाई मजबूत राहावी म्हणून इंग्रजांशी संधान बांधले.
दुसऱ्या बाजीरावाला जेव्हा आपली चूक लक्षात आली तोवर खूप उशीर झाला होता.
इंग्रजांची महाराष्ट्रातील मगरमिठी घट्ट होत चालली होती. व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटीश कंपनी सरकारची पैशांची हाव सगळ्या जगजाहीर होती.
इंग्रज जिथे विजय मिळवतात तिथे ते लुटालुट करतात याची कल्पना बाजीरावाला होती. त्याने आपला खजिना, दागिने जडजवाहीर सिंहगडावरून हलवण्याच ठरवलं.
हा खजिना एकाच जागी सुरक्षित राहणार होता, शिवछत्रपतींच्या राजधानीत, “रायगडावर”
सिंहगडावरील गोविंदराव सदाशिवराव याला आदेश दिले की दागिन्यांची ओझी बांधावीत. हेलकरी आणि संरक्षक यांच्याकडून रायगडावर नारो गोविंद आवटी यांच्या हवाली करावीत.
नारो आवटी पेशव्यांच्या विश्वासातला एक सावकार होता. त्याला रायगडाची सुभेदारी देऊन तेथे कडक बंदोबस्त करण्याची सूचना करण्यात आली होती.
मधल्या काळात पेशव्यांनी रायगडाकडे प्रचंड दुर्लक्ष केल होतं. मात्र आता खजिन्याच्या निमित्ताने का होईना रायगडाची काळजी घेण्याची गरज पडली होती.
२९ जून १८०३ रोजी हा खजिना रायगडावर आला. तिथून तो बरेच वर्ष तिथे सुरक्षित राहिला. अनेक हल्ले नारो आवटी आणि पांडोजी कुंजीर यांनी परतवून लावले. हजार अरब सैनिकांची शिबंदी मदतीला होती.
१८११ साली इस्ट इंडिया कंपनीने माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनची नेमणूक पुणे दरबारात केली.
हा खूपच धूर्त व चलाख अधिकारी होता. त्याने लंडनला पाठवलेल्या पत्रात या खजिन्याचा उल्लेख केला आहे. ज्यात तो म्हणतो की बाजीराव अप्रत्यक्षपणे लढाईची तयारी करत आहे. बाजीरावाने आपल्या थोरल्या पत्नीला देखील रायगडावरच पाठवले होते.
साधारण १८१७ साली इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर घाला घालण्यासाठी अंतिम युद्धाची तयारी सुरु झाली. एप्रिल मध्ये खडकी येथे तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. पुण्यावर विजय मिळवला. बाजीराव पुरंदर सारख्या किल्ल्यांचा आधार घेत पळून जाण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला होता.
बाजीराव रायगडावर जाण्याच्या आधी ब्रिटिशांनी तिथे हल्ला करायचं ठरवल.
कर्नल प्रॉथर नावाच्या अधिकाऱ्याने मोर्चेबांधणी केली. आसपासचे छोटे मोठे किल्ले ताब्यात घेतले. तिथून तोफांची आग ओकण्यास सुरवात केली. जवळपास महिनाभर वेढा घालण्यात आला होता. प्रचंड नुकसान झाले.
अखेर मराठ्यांचा पराभव झाला. मे १८१८ साली कर्नल प्रॉथरने रायगडावर प्रवेश केला.
त्याने दुसऱ्या बाजीरावाची पत्नी वाराणसीबाई हिला सुरक्षितपणे जाऊ दिले. कर्नलने आपल्या सैनिकांना रायगडाचा धुंडोळा घ्यायला लावला. तिथे नासधूस केली. महत्वाच्या इमारती पाडून टाकल्या. त्यांना फक्त पाच लाख रुपये मिळाले.
रायगडावरून जाणाऱ्या प्रत्येक मराठ्याला इंग्रजांनी आपली खाजगी संपत्ती घेऊन जाण्याची परवानगी दिली होती.
पुण्यात नारो आवटीच्या घरात कर्नल रोबर्टसन नावाच्या अधिकाऱ्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या २८ थैल्या सापडल्या. इंग्रजांनी त्या ताब्यात घेतल्या. नारो आवटीने दावा केला की ही त्याची वैयक्तिक संपत्ती आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
इंग्रजांचं म्हणन होतं की नारो आवटीच्या अंगरक्षकांनी आपल्या फेट्यात आणि अंगरख्यात लपवून हे पैसे पुण्याला आणले आहेत.
३ जून १८१८ ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. त्याची सगळी संपत्ती ताब्यात घेऊन त्याबदल्यात जिवंतपणे बिठूर येथे जाण्याची परवानगी दिली गेली. नाशिकच्या मंदिरातील हिऱ्यासकट प्रचंड संपत्ती लंडनला पाठवण्यात आली.
तिथे वेगळाच घोळ सुरु होता. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इंग्लंडच्या राजाच्या ‘क्राऊन इस्टेट’ चे शेअर्स होते.
त्यामुळे जेव्हा केव्हा इंग्रज सैन्य भारतात लूट करून खजिना मिळवायचे तेव्हा कंपनी आणि राजाकडून सरळ एका ‘प्राईझ एजंट’ची नेमणूक व्हायची. हा एजंट एकूण लुटीची मोजदाद करायचा. फुटकळ वस्तू स्थानिक बाजारात विकून त्यांचे पैसे जमा केले जायचे आणि ते सैनिकांमध्ये लगेच वाटून टाकले जायचे.
सर्वांना आपापल्या पदानुसार आणि कामगिरीनुसार हिस्सा मिळायचा. राजाच्या सैन्यातल्या आणि कंपनीतल्या मोठमोठ्या ऑफीसर्सना खास बक्षिसं दिली जायची.
पण मराठ्यांच्या लुटलेल्या खजिन्यावरून मात्र मोठे वाद सुरु झाले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. या युद्धात लढलेल्या जनरल हिस्लॉप नावाच्या अधिकाऱ्याने तेव्हाचा भारताचा गव्हर्नर असलेल्या ड्युक ऑफ वेलिंग्डन विरुद्ध मुंबईतल्या कोर्टात केस टाकली. ड्युकने सर्वात खजिन्यातला मोठा वाटा उचलला असल्याची ही केस होती.
हीच ती कुप्रसिद्ध डेक्कन प्राईज मनी केस !
या केसच्या अनेक सुनावण्या झाल्या. मुंबईच्या सुप्रीम कोर्टात त्याचा निकाल हिस्लॉपच्या बाजूने लागला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने कंपनीच्या तर्फे या निकालाविरुद्ध लंडनमधल्या प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले.
इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये केसबद्दल प्रश्न विचारले गेले. या केसचा निकाल जुलै १८३० मध्ये लागला. प्रिव्ही कौन्सिलने मुंबई सुप्रीम कोर्टाचा निकाल बाद ठरवून ड्यूक ऑफ वेलिंग्डनच्या बाजूने निकाल दिला.
हाच ड्युक आर्थर वेलस्ली पुढे जाऊन इंग्लंडचा पंतप्रधान बनला.
या डेक्कन प्राईज मनीच्या केस बरोबर नारोबा गोविंद आवटीची केस सुद्धा चालली. नारो आवटीने कर्नल रोबर्टसनने बळजबरीने आपल्या कडील पैसे काढून घेतल्याची तक्रार केली. इंग्लंडच्या संसदेत त्याच्याही नावाची चर्चा झाली होती.
या केसचा निकाल लागेपर्यंत कोणालाही हे दक्खन लुटीच्या बक्षिसाचे पैसे दिले गेले नव्हते.
झालेल्या या विलंबाबद्दल, अधिकाऱ्यानी केलेल्या मनमानीवरून लंडनमध्ये वर्तमानपत्रात आणि पार्लमेंटमध्ये खरडपट्टी काढण्यात आली. याचे आजही तिथल्या संसदेत रिपोर्ट्स आहेत.
शेवटी केसचा निकाल लागल्यावर सर्व सैनिकांना त्यांची बक्षिसे देण्यात आली. फक्त सैनिकांनाच वाटलेली रक्कम सत्तर लाख रुपये इतकी होती. म्हणजे खजिन्याच्या एकूण मूळ रकमेची कल्पना करता येईल.
नारो गोविंद आवटी यांचा निकाल लागे पर्यंत मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्या वारसदारांना व्याजासकट रायगडाच्या खजिन्याचे पैसे परत केले गेले अस म्हणतात.
संदर्भ-
-
Parliamentary Debates: Official Report
-
DECCAN PRIZE-MONEY—CASE OF NARROBA.
हे ही वाच भिडू.
- अब्दाली हात चोळत पहात राहिला, अटकेच्या किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकत होता !!
- ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री !
- मराठा आरमाराच्या दहशतीच्या कथा आजही ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये चर्चिल्या जातात.