मागच्या पूरात त्या तिघांनी माणूसच काय तर साधं जनावर पण मरून दिलं नव्हतं… 

सांगलीत ऐतिहासिक पूर आलाय. आज आयर्विन पुलावर कृष्णा नदीची पातळी ५७ फुटांवर होती. असाच पूर २००५ साली आला होता. शेतात पाणी घुसलं होतं, गावच्या गाव पूरात अडकली होती. आजही तसच आहे, त्याहूनही भयानक परिस्थिती आजची आहे.

माणसांना वेळेवर बोटी मिळत नसल्याच सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज सकाळी  ब्रम्हनाळमध्ये दुर्घटना घडली. शासनाची मदत येत नाही आणि दूसरीकडे पाण्याच्या पातळीत देखील वाढ होत असल्याच पाहून माणसांनी खाजगी बोटीतून जीव मुठीत धरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

वसगडे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ABP माझासोबत बोलताना सांगितल की,

“ती बोट पतंगराव कदमांनी दिली होती. खाजगी नव्हे तर ग्रामपंचायतीची ती बोट होती. त्याच बोटीतून गेल्या तीन दिवसात दिड हजार लोकांना बाहेर काढण्यात येत होतं. २००५ सालच्या पुरात माजी मंत्री पतंगराव कदमांनी ती बोट ग्रामपंचायतीला दिली होती.”

सुदैवाने त्याच बोटीने आज दिड हजार लोकांचे जीव वाचवले आणि दुर्देव म्हणजे त्या बोटीच्या पंख्याला झुडपाचा फास आवळला आणि बोट उभी पलटी झाली. 

आत्ता शासनाची मदत पोहचत नाही. गावागावातून फोन येत आहेत. भिलवडी, हरिपूर, डिग्रज अशा कित्येक गावात हजारों नागरिक अडकून बसलेत. पूराचा आजचा तिसरा दिवस. दोन तीन दिवसांपासून हि माणसं उपाशी आहेत. वरुन पाऊस कोसळतोय. पाण्याची पातळी वाढतेय. या अवस्थेत सामाजिक कार्यकर्ते तिथं पोहचताय त्यावेळी प्रत्येकजण म्हणतोय, 

आज ते तिघं पाहीजे होते. 

ते तिघं म्हणजे पतंगराव कदम, आर.आर. पाटील आणि मदन पाटील. 

पतंगराव कदमांचा मतदारसंघ भिलवडी-वांगी. घाटावरचा भाग सोडला तर उर्वर्रीत प्रत्येक मोठ्या गावाला पूराचा फटका बसतो. पतंगराव कदम तेव्हा मंत्री होते. तीन दिवस पूर आलेला तेव्हा ते काय करत होते तर गावागावात स्वत: बोटीतून जात होते. प्रशासकिय पातळीवर बोटी आणि हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती.

आजच्या रेस्क्यू टिमची आणि तेव्हाची नेमकी काय मर्यादा आहे विचारण्यासाठी “बोलभिडू” ने स्थानिका लोकांना फोन केला.

तेव्हा निमणी गावच्या गिरीधर मस्के यांनी सांगितल की, 

आत्ता कलेक्टरला रिपोर्ट जातायत. NDRF टिमसोबत कलेक्टर बोलतायत आणि मग कुठे बोटी सोडायच्या कुठे मदत पुरवायची हा निर्णय घेतला जातोय. पण तेव्हा तस नव्हतं. आबा, पतंगराव साहेब आणि मदन पाटील यांनी कुठल्या गावात किती पाण्याची पातळी आहे ते माहिती होतं. गावं आणि गल्ल्या तोंडपाठ होत्या. त्यामुळ कुठल्या गावात मदत गेली पाहीजे, कुठल्या गल्लीत किती लोकं असतील हे त्यांना माहित असायचं. रेस्क्यू टिमला ते ऑर्डर द्यायचे. या तिघांमुळं योग्य वेळेत सगळी गावं रिकामी झाली होती. 

पुढे गिरीधर मस्के म्हणाले की,

ब्रम्हनाळ आणि नांद्रे येथे पाणी शिरलय. नांद्रेत मोठ्या प्रमाणात फोर्स वापरली पण ब्रम्हनाळला कमी फोर्स वापरला. मागच्या वेळीपण असच झालेलं. तेव्हा पतंगराव कदमांनी पहिला ब्रम्हनाळच्या माणसांना बाहेर काढलेलं. पाणी वाढलं तर कुठल्या गावातनं, कुठल्या भागातनं बाहेर पडता येणार नाही हे पतंगराव कदमांना माहिती होतं. 

पतंगराव कदमांनी काय केलं तर प्रशासकिय पातळीवर सुत्र हालवली. गावागावात बोटी पाठवल्या. स्वत: बसून गावं रिकामी केली. कुठल्या गावात माणसं राहिलेत ते स्वत: बोटीत बसून जावून बघुन यायचे. 

तसच काम मदन पाटलांनी केलं. मदन पाटलांबद्दल आठवण सांगत असताना पद्माळे गावच्या रनवीर पाटील यांनी सांगितल की तेव्हा पद्माळ्यात पण पाणी शिरलेलं पण त्याहून अधिकचा धोका मौजे डिग्रजला होता. तेव्हा रेस्क्यू टिमला मदन पाटीलांनी पहिला मौजे डिग्रजच्या लोकांना बाहेर काढण्यास सांगितल. पद्माळे माझ गाव आहे, लोक चिडणार नाहीत. मला माहित आहे म्हणून पहिला जिथं पाणी भरतं तिथल्या लोकांना मदन पाटलांनी बाहेर काढलं.

मदन पाटील देखील पूर ओसरेपर्यन्त थांबून होते. दिवसभर बोटीतून लोकांना बाहेर काढणं आणि सांगलीत त्यांना जेवण, नाष्टा, अंथरुण, पांघरुणाची सोय करणं हे स्वत: मदन पाटलांनी केलं होतं. इतकच नाही तर ज्यांची जनावर होती त्या जनावरांना वाचवायचं, त्या दुष्काळात जनावरांना ओला चारा मिळवून द्यायचं काम देखील या नेत्यांनी केलं होतं. 

पतंगराव कदम आणि मदन पाटलांप्रमाणेच मोठ्ठ काम आर.आर. आबांनी केलं.

आबांनी केलेल्या कामांसदर्भात बोलभिडूने राजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितल की आबांसोबत आम्ही स्वत: ठाण मांडून होतो. ब्रम्हनाळ शेजारी सुखवाडी म्हणून आहे. तिथून आबांना एका पोराने फोन केला. आम्ही दहाजण अडकलोय. कुणाची बोलणं होत नाही म्हणून तुम्हाला फोन केलाय अस त्या पोराने सांगितलं. आर.आर. आबा स्वत: रेस्क्यू टिमसोबत पुराने वेढलेल्या सुखवाडीत गेले. तिथे त्या पोराला आणि त्यांच्यासोबत असलेल्या दहा जणांना वाचवलं.

आबा तेव्हा उपमुख्यमंत्री होते. अलमट्टीचं धरण नुकतच बांधून पुर्ण झालेलं. अलमट्टीतून पाणी सोडण्यात येत नव्हतं म्हणून पाण्याचा फुगवटा झालेला. आर.आर. आबांनी  कर्नाटकच्या सरकारकडे पाठपुरावा केला होता. अपेक्षित परिणाम होत नाही म्हणल्यानंतर आबांनी कर्नाटक सरकारला सज्जड दम देखील दिल्याच राजीव पाटील यांनी सांगितलं. आबांची आठवण सांगताना ते म्हणाले,

की इतकच नाही तर तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना आबांनी अलमट्टीला पाठवलं होतं आणि कर्नाटक सरकार जितका विसर्ग सांगतय तितकाच विसर्ग होतोय का नाही हे पहायला लावलं होतं. 

राजीव पाटील पुढे म्हणाले की, मला आठवतय तेव्हा अंकलखोपमध्ये एक माणूस झाडावर बसून राहिला होता. त्याच्याजवळ काहीच नव्हतं. अख्खी रात्र त्यांने झाडावर काढली आबांना बातमी मिळताच त्याला हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. 

त्या तिघांनी माणूसच नाही तर जनावरं देखील मरून दिली नव्हती. फक्त पुरातून माणसं वाचवून ते थांबले नव्हते तर पाणी ओसरल्यावर आपल्या घरात माणसं जाईपर्यन्त ते ठाम मांडून होते. म्हणूनच आज  गळ्यापर्यन्त पाणी आल्यानंतर माणसं त्या तिघांच्या आठवणीमुळे गहिवरुन जातायत. 

  • सौरभ पाटील.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.