शेतकऱ्यांचे आंदोलन दीप सिद्धूने एका रात्रीत हायजॅक कसं केलं?

काल दिल्लीत अभूतपूर्व गोंधळ झाला. केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली अनेक महिने सिंघू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेले शेतकरी यांनी सरकारचा विरोध मोडून ट्रॅक्टर मोर्चा द्वारे दिल्लीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधुरांचे बॉम्ब हे सर्व प्रकार हाताळले. यातून शेतकऱ्यांचा जमाव हिंसक बनला. दगडफेक सुरु झाली, काही ठिकाणी तर पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचे प्रयत्न झाले.

सर्वात कहर तर तेव्हा झाला जेव्हा तरुण आंदोलक लाल किल्ल्यावर चढले आणि त्यांनी तेथे आपला झेंडा फडकवला.

या कृतीमुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली. तिरंगा झेंड्याचा मान असणाऱ्या जागी आंदोलकांनी खलिस्तानी झेंडा फडकवल्याचं बोललं गेलं. पण हा झेंडा आंदोलनाचा होता हे काही वेळाने स्पष्ट झालं. पण इतके दिवस शांततेच्या मार्गाने सुरु असलेलं आंदोलन हिंसक झालं यावरून देशभरातून टीका देखील झाली.

अखेर संध्याकाळी या सगळ्या घटनाक्रमावर शेतकरी आंदोलनातर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं,

“आमच्या सर्व प्रयत्नानंतरही काही संघटना आणि व्यक्तींनी नियोजित मार्गाचे आणि नियमांचे उल्लंघन केलं आणि त्यांनी निंदनीय कृत्य केली. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचा ठरवलं आहे. शांतता आमची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करुन आंदोलनाला नुकसान पोहचू द्यायचे नाही असा आमचा हेतू आहे.”

ट्रॅक्टर मोर्चा  जहाल कार्यकर्त्यांनी हायजॅक केला असा आरोप आंदोलन समितीने केला. त्यात त्यांचा रोख पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याच्या कडे होता. सिद्धू याने लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्याचे मान्य केलं. पण त्याचं म्हणणं होतं की

‘भला मैं कैसे इतने लोगों को भड़का सकता हूं. आपको मेरा एक भी वीडियो नहीं मिलेगा, जहां मैं लोगों को लाल क़िले की तरफ़ ले जा रहा हूं.’

प्रश्न असा पडतो कि हा दीप सिद्दू कोण आहे आणि त्याने हे आंदोलन हायजॅक कस केलं ?

दीप सिद्धू हा पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्याचा. लॉचं शिक्षण झालं होत.काही काळ प्रॅक्टिस देखील केली. देखणा होता. म्युजिक व्हिडीओ मॉडेलिंगच्या वगैरे नादाला लागला आणि पंजाबी सिनेमात आला. दोन तीन सिनेमे आले, गाजले. पुढे सनी देओल जेव्हा गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणुकीला उतरला तेव्हा दीप सिद्धू त्याच्या प्रचारात आघाडीवर होता.

शेतकरी आंदोलन जेव्हा सुरु झाले तेव्हापासून दीप सिद्धू पुन्हा चर्चेत आला. आपली आक्रमक भाषणे त्यात जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा उल्लेख करत होता. तेव्हा पासूनच त्याच्यावर टीका झाली होती. तो भाजपने आंदोलन बदनाम करण्यासाठी पेरलेला माणूस आहे असे आरोप केले गेले.

इतके असूनही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आंदोलन एका रात्रीत दीप सिद्धूच्या हाती कसे गेले?

झालं असं होतं शेतकरीआंदोलनाचे नेतृत्व असलेल्या संयुक्त किसान मोर्च्याच्या नेत्यांनी आधीच २६ जानेवारीला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड द्वारे प्रवेश करायचं आणि संसद भवनाकडे जायचं ठरवलं होतं. पण दिल्ली पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. पोलिसांशी चर्चा करताना आंदोलनाच्या नेत्यांनी एक पाऊल मागे घेत फक्त दिल्ली प्रवेश करायचं मान्य केलं. पुन्हा यातही बदल झाले. त्यात फक्त रिंग रोडपर्यंतच जायचं ठरवलं.

अखेरीस दिल्ली पोलिसांनी त्यांना रिंग रोडला जाण्याची परवानगी देखील नाकारली. याला आपले नेते मान्यता देत आहेत हे केल्यावर तरुण कार्यकर्ते भडकले असं दीप सिद्धू याच म्हणणं आहे. नेत्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.

OUR ROAD RING ROAD अशा घोषणा देण्यात आल्या.

दीप सिद्धू आणि त्याच्या सोबत लखबीर सिंग सिद्धाना उर्फ लक्ख्खा सिद्धाना यांनी या प्रसंगी जमावापुढे भाषणे केली. लख्खा सिद्धाना हा एकेकाळचा गँगस्टर आणि माळवा युथ फेडरेशनचा नेता आहे. त्याने काही काळापूर्वी निवडणूक देखील लढवली होती. त्याच्याविरोधात पंजाबामध्ये दोन डझन पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये हत्या, लुटमार, अपहरण, खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. याचबरोबर त्याच्याविरोधात शस्त्र कायद्य अंतर्गत खटला देखील सुरू आहे.

जेव्हा संयुक्त किसान मोर्चाची सभा समाप्त झाली तेव्हा रात्री या दोघांनी स्टेजचा ताबा घेतला. त्यांनी आंदोलकांना आवाहन केलं की ,

“आपले नेते पोलिसांच्या प्रेशर खाली आहेत. त्यामुळे त्यांनी नमतं घेतलं आहे. ज्यांना त्यांच्या सोबत जायचं आहे त्यांनी जा मात्र आपण किसान मजदूर संघर्ष समिती आधी ठरलेल्या रिंग रोडनेच दिल्लीला जाऊ. “

संयुक्त किसान मोर्चा पासून वेगळे होत किसान मजदूर संघर्ष समितीने मंगळवारी सकाळी रिंग रोडनेच जाण्याचा निर्णय घेतला. मुख्य आंदोलन सुरु होईपर्यंत किसान मजदूर संघर्ष समितीचे ट्रॅक्टर निघाले देखील होते. अनेक आंदोलकांना लक्षात न आल्यामुळे ते या मोर्चात सहभागी झाले आणि रिंग रोडवर पोहचले. इथूनच गोंधळाला सुरवात झाली.

किसान मजदूर संघर्ष समितीचे म्हणणे आहे की आम्ही रिंग रोडला जायचे ठरवले होते मात्र लाल किल्ल्यावर जाण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. आमच्या आंदोलनातं सहभागी झालेल्या काही कार्यकत्यांच्या गटाने अचानक लाल किल्ल्याकडे चढाई केली.

यात दीप सिद्धू देखील होता. लाल किल्ल्यावर जेव्हा निशान साहिब आणि किसान यूनियनचा झेंडा फडकवण्यात आला तेव्हा तो तिथे हजर असल्याचं व्हिडीओ फुटेजमध्ये दिसते. मात्र लखखी सिध्दाना तिथे होता का हे अजून स्पष्ट झालेले नाही आहे. दीप सिद्धूने आपण लाल किल्ल्यावर होतो हे मान्य केले असून त्याने दिलेल्या निवेदनात नेते साथ देत नसल्यामुळे भावनेच्या भरात मी हे कृत्य केलं पण कोणालाही भडकवलं नाही असं सांगताना तो दिसत आहे.

कालपासून त्याच्या व त्याच्या भावाविरोधात एनआयए ने नोटीस पाठवली आहे. सिख फॉर पीस या संघटनेच्या विरोधात केस देखील दाखल करण्यात आली आहे. आता दिल्ली पोलीस लख्खा सिद्धानाचा आंदोलनातील तरूणांना हिंसाचारासाठी भडकवण्यामध्ये किती हात होता या दिशेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.