काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट असा राजकीय प्रवास अन् दीपक केसरकरांची पक्षनिष्ठा

“शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेंव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता” असा आरोप करणं असू देत की, शिंदे गटात सामील होऊनही मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही कोणत्याही प्रकारची टीका सहन करणार नाही असा इशारा देणारे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर हे तेंव्हापासून चर्चेत आहेत जेव्हापासून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात जात शिवसेनेशी बंड केलं. मात्र तरीही केसरकर कायमच म्हणतायेत कि त्यांची निष्ठा ही फक्त बाळासाहेबांशी राहिलीय. 

इतकंच नाही तर गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने, माझे गुरु बाळासाहेब आणि हल्लीच्या काळात शरद पवार हेच माझे राजकीय गुरू असल्याचं  विधान देखील त्यांनी केलं आहे.

रोजच काहीतरी खळबळजनक वक्तव्य करून केसरकर बातमीचा मथळा बनणारे दीपक केसरकरांवर किशोरी पेढणेकरांनी टीका केलीय कि, “दीपक केसरकर उडते पक्षी.  येथून उड आणि तिथे बस, तिथून उड आणि इथे बस असंच करत असतात. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका”

खरंच केसरकर उडते पक्षी आहेत का ? त्यासाठी दीपक केसरकारांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकूया.

तर केसरकरांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास लक्षात येतं की, त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना – शिंदे गट असा राजकीय प्रवास केलाय…! 

सर्वात पहिलं काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केली.

सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व वसंत केसरकर यांचे सुपुत्र म्हणजे दीपक केसरकर. वसंत केसरकर हे काय राजकारणात सक्रिय नव्हते पण समाजकारणात त्यांचं मोठं नाव होतं.  याच पार्श्वभूमीचा फायदा दीपक केसरकरांना राजकारणात झाला. त्यांनी अगदी तरुणपणातच राजकारणात एंट्री घेतली. काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत त्यांची राजकीय कारकीर्द सावंतवाडी पालिकेतून सुरू झाली. मात्र ते फार काळ काँग्रेसमध्ये नव्हतेच…

मात्र याचदरम्यान त्यांची राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याशी जवळीक वाढली. त्यांचे राईट हॅन्ड असणारे केसरकर भोसलेंच्या वरचढ ठरत गेले.  

२००९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला…

यासाठी २००९ ची विधानसभा निवडणूक त्यांचा पॉलिटिकल टर्निंग पॉईंट ठरला. निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. नगराध्यक्ष म्हणून केलेली कामं आणि विकासाचं मॉडेल त्यांनी मतदारांसमोर ठेवलं. राष्ट्रवादीच्याच प्रवीण भोसलेंना शह देत केसरकरांनी राष्ट्रवादीकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविली आणि ऑफिशियली राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. 

तर तेंव्हा काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांनी केसरकारांना आमदार म्हणून निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली असं म्हणलं जातं. 

पक्षाने केसरकारांना तिकीट दिले म्हणून भोसलेंनी बंडखोरी केली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची आणि पक्षातील बड्या नेत्यांची मर्जी राखत त्यांनी आपल्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण केला. 

कालच त्यांनी दोन मोठी वक्तव्य केलीत, एक म्हणजे “मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी पवारांनी मला विश्वासात घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे”, असा केसरकरांनी दावा केलाय. कदाचित त्यांच्या राष्ट्रवादीतील कार्यकाळात असताना आलेल्या काही अनुभवांवर त्यांनी असा दावा केला असावा असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.  

२०१४ मध्ये शिवसेनेचे ‘शिवबंधन’ बांधले…

२०१४ मध्ये मोदी लाट आलेली. भाजप-सेने युती होती. याच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. 

मात्र त्याआधी झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेलं स्थानिक राजकारण पाहावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार भाजपचे उमेदवार नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रवादीत असणाऱ्या केसरकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असूनही शरद पवारांसह राणेंसोबत पंगा घेत उघड उघड राऊतांना म्हणजेच शिवसेनेला पाठिंबा दिला. 

राणेंचा पराभव झाला आणि शिवसेनेचे राऊत निवडून आले आणि हीच निवडणूक राणे विरुद्ध केसरकर संघर्षाला कारणीभूत ठरली !

आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या केसरकारांना २०१४ मध्ये विधानसभेचं तिकीट मिळालं आणि ते आमदार म्हणून निवडून आले. 

२०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये केसरकरांवर गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी आणि अर्थ व वित्त विभाग देखील सोपवला होता. २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात केसरकरांचे पक्षश्रेष्ठींपेक्षा भाजपाच्या नेत्यांशी जास्त जुळायला लागले. फडणवीसांच्या ते खास मर्जीतले होते अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत असते.

त्यानंतर पून्हा एकदा २०१९ मध्ये शिवसेनेने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि केसरकर जिंकून आले. 

आणि आता शिंदे गटात सामील… 

२०१९ मध्ये भाजप सेना युतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठी ते आग्रही होते आणि आजही आहेत.  त्यांची आणखी एक नाराजी म्हणजे युती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं असतं जे महाविकास आघाडीत त्यांना मिळालं नाही. त्यांच्या याच नाराजीचा परिणाम म्हणजे त्यांचं बंड.

सुरुवात काँग्रेसमधून केलेले केसरकर नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास करत ते शिंदे गटात सामील झाले. आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटात ते दुसऱ्या क्रमांकांचे नेते ठरलेत. इतकंच नाही तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत होणाऱ्या बैठकीला देखील शिंदे गटाच्या वतीने केसरकर हजेरी लावणार आहेत.  थोडक्यात शिंदे गटातील त्यांचं महत्व मोठंच आहे.  

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.