या जोड्यांची भांडणं म्हणजे ‘शिंदे- फडणवीस’ सरकारच्या डोक्याला कटकट असणारे

राज्यात ठाकरे गट-शिंदे गटाचा राडा सुरुये त्यात आणखी एका जोडीने राज्याचं राजकारण पेटवलं.  ती जोडी म्हणजे केसरकर आणि राणे. 

शिंदे गट भाजपसोबत गेला. पण नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील राजकीय वैर काही संपलेले नाहीये. 

दीपक केसरकर यांनी राणेंची दोन्ही मुले लहान आहेत, त्यांना समज देण्याची गरज आहे असं विधान केलं त्याला उत्तर देत निलेश राणे यांनी “केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका, केसरकर लिमिटमध्ये राहा”, असं उत्तर दिलेलं. तसेच तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाहीत, असा इशारा द्यायलाही राणे विसरले नाहीत.

पण रोजच्याच स्टेटमेंट वॉर वरून केसरकर आणि राणे पार एकमेकांची लायकीच काढत आहेत. रोज येणाऱ्या आक्रमक उत्तरांमुळे राणे केसरकर यांच्यातील भांडणाचा परिणाम शिंदे गट आणि भाजपच्या युतीवर होऊ शकतोय..

दीपक केसरकर आणि राणे पिता-पुत्रांमधील नेमका वाद काय हे आपण पाहणारच आहोत शिवाय, राणे-केसरकर ही जोडी नाही तर अशा काही जोड्या आणि त्यांची भांडणं येत्या काळात ‘शिंदे- फडणवीस’ सरकारच्या डोक्याला ताप असणार आहे. त्याचाच आढावा घेऊयात,  

१. दीपक केसरकर – नारायण राणे वॉर 

हा वाद तसा दीपक केसरकर सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदावर असल्यापासूनचा आहे. पण २००९ मध्ये केसरकर काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले आणि शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणलं होतं. २००९ ची सावंतवाडी विधानसभा केसरकर राणेंमुळेच जिंकून आले होते. पण आमदार म्हणून निवडून आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा कुरबुरी सुरु झाल्या त्यात भर पडली २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची.

२०१४ मध्ये केसरकरांनी शिवसेनेचे ‘शिवबंधन’ बांधले. २०१४ मध्ये मोदी लाट आलेली. भाजप-सेना युती होती. याच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्याआधी झालेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेलं स्थानिक राजकारण थोडक्यात सांगायचं तर,

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार भाजपचे उमेदवार नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात लढत होती. या लढतीत राष्ट्रवादीत असणाऱ्या केसरकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची युती असूनही शरद पवारांसह राणेंसोबत पंगा घेत उघड उघड राऊतांना म्हणजेच शिवसेनेला पाठिंबा दिला.

राणेंचा पराभव झाला आणि शिवसेनेचे राऊत निवडून आले आणि हीच निवडणूक राणे विरुद्ध केसरकर संघर्षाला कारणीभूत ठरली !

शिवसेनेत गेल्यानंतर राणेच्या विरोधात बोलण्यास केसरकराना खुल मैदान मिळालं. तेंव्हापासून आतापर्यंत दीपक केसरकर यांनी नेहमी नारायण राणे आणि कुटुंबीयांनी जिल्ह्यात दहशतवाद निर्माण केल्याचा आरोप करत आलेत. त्याचा फटका नारायण राणेंना विधानसभा निवडणुकीत बसला आणि राणे पडले.

हाच पराभव राणे पिता-पुत्रांच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच पार दोन्ही बाजूंकडून एकमेकांची पार लायकी काढेपर्यंतची वक्तव्य आणि आरोप केले जातात. या दोघांची भांडणं शिंदे-फडणवीस सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे असं चित्र दिसतंय.

२. रावसाहेब दानवे – अर्जुन खोतकर

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यातला राजकीय संघर्ष कोणत्या टोकाला गेला होता तेही जनता जाणून आहे. 

त्यात अर्जुन खोतकर यांनी उशिराच का होईना पण शिंदे गटात जाण्याची घोषणा केली आणि गेलेही. या दरम्यान दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे आणि खोतकर यांची दिलजमाई सुद्धा केली होती. ही दिलजमाई होऊन चार दिवस उलटले नव्हते तोच पुन्हा दोघांमधे भांडण सुरु झालं. 

यांच्यात भांडण काय काय तर जालन्याचा लोकसभा मतदार संघ.

मोदींच्या मंत्रिमंडळात सतत दुसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांचं जालना लोकसभा मतदार संघावर मोठा प्रभाव आहे, ते सतत २ ते ३ लाखांच्या मताधिक्याने निवडून येतात.

मात्र अर्जुन खोतकर यांनी जालन्यावर दावा गेल्या लोकसभेत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढवणार असल्याचं घोषित केलं होतं. मात्र या निवडणुकीत या दोघांच्या भांडणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली होती. मात्र तरीही त्यांच्यातला वाद काही मिटू शकला नव्हता.

लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीत यांचा पराभव झाला आणि त्यामागे दानवेंचा हात असल्याचं खोतकरांनी विधान केलं त्यामुळे या वादात अजूनच भर पडली.

आता खोतकर शिंदे गटात गेले, मात्र जालना लोकसभा मला द्यावी याची मागणी मी अजूनही सोडली नाही असं खोतकर म्हणतायेत तर लोकसभा जागा कुणासाठीही सोडणार नसल्याचा दावा दानवे करत आहेत.

ज्या जमिनीत २५ वर्षे मेहनत करून त्या जमिनीला सुपीक केलं त्यानंतर ती जमीन मी इतरांना कसायला कशी देणार? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. 

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे त्यांचं भांडण मिटवण्यासाठी का असं आव्हान असणार आहे.

मात्र, खोतकरांनी शिंदेकडे लोकसभेची जागा देण्याची मागणी मान्य झाल्यास उद्या खोतकर विरुद्ध दानवे असा संघर्ष टोकाला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम शिंदे गट आणि भाजपच्या युतीवर होऊ शकतो.  कारण दानवे यांनी लोकसभेची जागा सोडली तर भाजप मागे हटली असा अर्थ निघेल, आणि खोतकर मागे हटले तर शिंदेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि खोतकरांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होईल. 

आता दानवे नरमतात की खोतकर हे लवकरच कळेल..

३. संजय गायकवाड – संजय कुटे वॉर 

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते संजय कुटे यांची जोडी म्हणजे राजकीय नेत्यांच्या वॉरचं नेमकं उदाहरण म्हणता येईल.  संजय कुटे हे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातून भाजपचं प्रतिनिधित्त्व करतायेत.

या दोन्ही आमदार महोदयांनी एकमेकांवर अक्षरशः अतिशय खालच्या पातळीवर टीका, शिवीगाळ करण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. 

कोरोनाकाळात संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठाच वाद पेटला होता. गायकवाड म्हणाले होते की, ” जरा मला कोरोनाचा जंतू सापडला असता तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबला असता”, त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळला. 

इतकंच नाही तर गायकवाड यांच्या राहत्या घराच्या बाहेर पार्क असलेल्या इनोव्हा गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. त्याचं उत्तर म्हणून गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार संजय कुटे यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. 

माझ्या गाडीवर संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जोपर्यंत गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिंमत असेल मला अडवून दाखवा, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला. आमदार संजय गायकवाड यांनी कुटे यांना बुलढाण्यात येऊन दाखव असं आव्हानही दिलेलं. त्याला उत्तर संजय कुटे यांनी बुलढाण्यात मोठे शक्तीप्रदर्शन केलं होतं. 

या दोन नेत्यांच्या सगळ्या राड्यात जिल्ह्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

आता शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटात सहभागी असल्यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपच्या संजय कुटे यांच्याशी ते जुळवून घेणं त्यांच्या वादाच्या इतिहासावरून तर अवघडच दिसतंय. 

या तिन्ही जोड्यांचे भांडणं, स्थानिक राजकारण हा सगळा वाद मिटवण्याचं आव्हान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.