इथं दीपक हुडानं टीम इंडियात एंट्री मारली आणि तिथं कृणालचा बाजार उठलाय…

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि एमएस धोनी, विराट कोहली आणि ईशांत शर्मा… या जोड्या क्रिकेटमध्ये गाजल्या, त्यांच्या दोस्तीमुळं. लाख मॅटर झाले तरीही या पोरांनी दोस्ती काय सोडली नाय. पण एक जोडी अशी आहे जी गाजली ती त्यांच्या भांडणामुळं. नाय नाय, आम्ही हरभजन आणि श्रीसंतबद्दल बोलत नाहीये, आम्ही बोलतोय दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्याबद्दल.

तुम्ही ही दोन्ही नावं ऐकली असतीलच. पण करंट सिनारीओ सांगायचा झाला, तर सध्या दीपक हुडाची तिन्ही बोटं तुपात आहेत आणि कृणाल भाऊंचा मात्र बाजार उठलाय.

आता कृणाल पंड्याबद्दल तसं सगळ्यांना माहितीये. हार्दिक पंड्याचे ज्येष्ठ बंधू, समोरच्या टीममधल्या प्लेअर्सवर कमी आणि आपल्याच प्लेअर्सवर चिडायची सवय आणि जरासा आगाऊपणा ही कृणाल पंड्याची खासियत. पण हे काहीही असलं तरी भाऊ खेळतो तसा चांगला. डेथ ओव्हर्समध्ये येऊन रन्स मारायचे असतील किंवा चटाचट विकेट्स काढायच्या असतील, कृणाल बऱ्याचदा इफेक्टिव्ह ठरतो.

दुसऱ्या बाजूला आहे दीपक हुडा. पंड्या ब्रदर्स आणि हुडा बडोद्याचेच. हुडानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं ते २०१४ मध्ये, भारताच्या अंडर-१९ टीमकडून खेळताना. भाऊ बॅटिंगला आला, की हाण की बडीव, धुरळा उडीव खेळायचा. सगळ्या देशात भाऊचं नाव झालं. पुढं आयपीएलमध्ये पंजाब, राजस्थान आणि हैदराबादकडून खेळतानाही त्याचं नाव चांगलंच गाजलं. 

आता कसं असतंय फक्त आयपीएलमध्ये चांगलं खेळून तुम्हाला टीम इंडियाचं तिकीट मिळू शकत नाही. त्यासाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्येही भारी खेळावं लागतं. ते कृणाललाही खेळावं लागणार आणि दीपकलाही. पण एक वर्ष झालं असं की, यांचं खेळणं राहिलं बाजूला आणि भांडणाचा किस्साच जरा फेमस झाला.

सईद मुश्ताक अली स्पर्धेच्या आदल्याच दिवशी, हुडा बडोदा टीमचं बायो बबल तोडून निघाला. त्यानं सांगितलं की, ‘टीमचा कॅप्टन कृणाल पंड्यानं मला सगळ्या टीममेट्सच्या समोर शिव्या घातल्या.’ पुढं बडोदा क्रिकेट असोसिएशननं त्याला निलंबित केलं. आपले टीममेट्स डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारी कामगिरी करता असताना, हुडाला मात्र बाहेर बसावं लागलं. त्याला वाटलं की आपला पत्ता आता कायमचाच कट. पण त्याला किंग्स इलेव्हन पंजाबनं संघात घेतलं आणि भावानं नाव राखलं.

पुढं नवा डोमेस्टिक सिझन आला तेव्हा त्यानं बडोद्याला फाट्यावर मारलं आणि राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मुश्ताक अली स्पर्धेत त्यानं सहा मॅचेसमध्ये २९४ रन्स चोपले. राजस्थानवाले त्याच्यावर खुश झाले आणि त्याला म्हणले, भावा विजय हजारे ट्रॉफीसाठी तूच आमचा कॅप्टन. त्यानं तिकडं पण चांगली कामगिरी केली.

आणि आता याचंच फळ म्हणून, हुडाला वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालंय…

दुसऱ्या बाजूला कृणाल पंड्याची मात्र वेगळीच व्यथा आहे. आयपीएलमध्ये अहमदाबादचा संघ आलाय, त्यांनी कॅप्टन निवडलाय हार्दिक पंड्या. पण त्याचाच भाऊ असलेल्या कृणाल पंड्याला काय त्यांनी उचललं नाय. लखनौच्या संघानी नवख्या रवी बिष्णोईवर विश्वास दाखवला, मात्र कृणालचा विचार केला नाय. फिट असूनही कृणालची ना साऊथ आफ्रिका दौऱ्यावर निवड झाली ना वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी. त्यात हुडाची निवड झालीये म्हणल्यावर कृणालचा दर्द जरा वाढला असेलच.

हे एवढं कमी का काय म्हणून, गुरुवारी सकाळ सकाळ कृणालचं ट्विटर अकाउंट हॅक झालं. हॅकरनी पार त्याचा बाजार उठवला, शिव्या बिव्या घातल्या, लय बॅड फील झालं. आता कृणाल या सगळ्यातून कमबॅक करेलच, फक्त भावा पोरांशी जरा कमी भांडतच जा, तेवढंच तुला शांत वाटेल…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.