छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातला सर्वात मोठा पुतळा महाराष्ट्राच्या या अवलियाने घडवलाय…
नुकतंच जम्मू काश्मीरच्या सीमेवर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. ज्याने अक्ख्या भारतात धुमाकूळ घातला. आता परत एकदा असाच कल्ला करणारी घटना घडतेय. तीही महाराष्ट्राच्या मराठवाड्यात. मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यात भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्या जाणार आहे. औरंगाबाद इथल्या क्रांती चौकात शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा येत्या १० फेब्रुवारीला उभारला जातोय. आणि हाच क्षण बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा औरंगाबादकडे खिळल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २५ फूट उंच आणि २१ फुट लांब असून चौथऱ्यापासून पुतळ्याची एकूण उंची ५२ फूट असणार आहे. तर पुतळ्याचं वजन एकूण १० टन असून त्यात ६ टन ८०० किलो गनमेटलचा वापर करण्यात आला आहे. महाराजांचे हावभाव, भरजरी पोशाख, दागिने आणि एका हातात लगाम तर दुसऱ्या हातात तलवार अशा सगळ्याचं सुरेख एकत्रीकरण या एकाच पुतळ्यात बघायला मिळणार असल्याने हा पुतळा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.
गेल्या दोन वर्षांपासून शिवप्रेमी या पुतळ्याची आतुरतेने वाट बघत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपली असून काही दिवसांपूर्वी या पुतळ्याचं औरंगाबाद शहरात आगमन झालं आहे. आणि येत्या १० फेब्रुवारी रोजी या पुतळ्याचं रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे.
मात्र ज्या व्यक्तीमुळे हे शक्य होतंय, ज्या व्यक्तीने या शिल्पाला जन्म दिलाय आणि अनेकांच्या स्वप्नाला, प्रतिक्षेला आकार दिलाय तो अवलिया व्यक्ती म्हणजे
‘दीपक दिनकर थोपटे’
दीपक थोपटे हे पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांचे वडील दिनकर थोपटे यांचाच वारसा त्यांनी पुढे चालवला आहे. दिनकर थोपटे यांनी पुण्यातील अनेक शिल्प साकारले आहेत. त्यांना शिल्पकलेची आवड असल्याने गेल्या ५० वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना अविनाश आणि दीपक अशी दोन मुलं. वडिलांना लहानपणापासून शिल्प साकारताना बघून मुलांनाही शिल्पकलेचं वेड लागलं. तेव्हा त्यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचं शिक्षण घेतलं.
शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनीही वडिलांच्याच स्टुडियोमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून दीपक थोपटे यांनी अनेकांच्या कल्पनेला आकार दिला आहे. यापैकी अकलूज इथली भुईकोट किल्ल्यातील शिवसृष्टी, जुन्नर इथले राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबांचे शिल्प, श्रीशैलम इथली शिवसृष्टी, चिंचवडचे चाफेकर चौकातील चाफेकर बंधूंचे शिल्प, जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू इथल्या शिल्पकला, अक्वामॅजिका थीम पार्क अशी त्यांची काही प्रसिद्ध शिल्प आहेत.
दीपक थोपटे यांच्या प्रतिभेला अनेकांनी ओळखलं आहे. आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. दीपक थोपटे यांना जहांगीर आर्ट गॅलरी २०१३, अंबाला कॅन्ट सर्टिफिकेट १९९०, महाकौशल कला प्रदर्शन रायपूर १९९२, आर्ट सोसायटी मुंबई, राष्ट्रीय कला मेळा, दिल्ली-१९९८, बॉम्बे आर्ट सोसायटी- १९९७-९८, राज्य कला स्पर्धा-२००० अशी अनेक पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आलेलं आहे.
दीपक थोपटेंच्या कामावर अनेकांचा असलेला विश्वास बघूनच औरंगाबादचा भव्य पुतळा घडवण्याचं काम त्यांना देण्यात आलं. त्यांच्या पुण्यातील कल्पक स्टुडियोमध्येच हा पुतळा साकारलेल्या गेलाय. दीपक थोपटे यांच्यासह त्यांच्या ३५ सहकाऱ्यांची १८ महिन्यांची मेहनत म्हणजे हा भव्य रूबाबदार पुतळा आहे. प्रथम मातीकाम करून नंतर धातुरूपात हा पुतळा तयार करण्यात आलाय.
हा भारतातील आत्तापर्यंतचा महाराजांचा सर्वात मोठा पुतळा आहे, असा दावा दीपक यांनी केला असून असा पुतळा त्यांनी याआधी कधीच घडवला नव्हता, हेही ते सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याने एक वेगळंच सौंदर्य क्रांती चौकाला लाभणार आहे. याठिकाणी शिवसृष्टी उभा करण्यात येणार आहे. आणि यामध्ये दीपक थोपटेंचा मोलाचा वाटा आहे.
मात्र या पुतळ्याच्या उदघाटनावरून शहरात राजकारण तापणार अशी चिन्हं दिसत आहेत.
पुतळ्याच्या उद्घाटनावरुन एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा तसंच भाजपने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. पुतळ्याचं उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केलं जावं, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. तर दुसरीकडे महापालिका या पुतळ्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताने करण्याचं नियोजन करत आहे. दरम्यान, भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. येत्या १० फेब्रुवारीऐवजी पुतळ्याचं उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी केलं जावं नाहीतर आम्ही त्याचा विरोध करू, असं मत भाजपने मांडलं आहे.
तेव्हा या सर्व धांदलीमुळे आता पुतळ्याच्या उदघाटनाबद्दल काय निर्णय होईल आणि त्या प्रसंगी वातावरण असं असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
हे ही वाच भिडू :
- पुण्याच्या छ. शिवाजी महाराज पुलाच्या बांधकामात एका निरक्षर ठेकेदाराचा सिंहाचा वाटा आहे..
- मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले
- छ. शिवाजी महाराज किल्ल्यांवर अवाढव्य पैसे खर्च करतात असं त्यांच्या प्रधानांना वाटायचं