दिपाली भोसलेची दिपाली सय्यद झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका अभिनेत्रीच नाव सध्या गाजतंय. उर्मिला मातोंडकर नाही. नाही नाही म्हणत त्या गेल्या बाहेर कधीच. पण एक अभिनेत्री आहे जी मोठमोठ्या नेत्यांशी पंगा घेत आहे.

नाव दिपाली सय्यद.

मध्यंतरी जेव्हा दक्षिण महाराष्ट्राला महापुराने छळलं होतं तेव्हा नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी साकळाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी म्हणून उपोषणाच हत्यार उपसल होतं. आता अशी चर्चा आहे की त्या विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाकडून श्रीगोंदा मतदारसंघाकडून लढणार आहेत.

राजकारणात फिल्म इंडस्ट्रीमधून कोणी आलं की त्यांची चेष्टाच केली जाते. नुकताच नगरचे खासदार सुजय विखे यांची त्यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आणि साकळाई योजने बद्दल बोलताना ‘देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे’, असे वक्तव्य केले. याला जोरदार प्रत्युत्तर दिपाली सय्यद यांनी केले. तेव्हा सुजय विखेंना मी त्यांच्याबद्दल बोललोच नाही अशी सारवासारव करावी लागली. 

गेल्या काही दिवसात विजयीरथावर आरूढ झालेल्या खासदार सुजय विखेंना एक पाऊल माग घ्यायला लावणारी दीपाली सय्यद आहे तरी कोण?

तिचा आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा काय संबंध?

दिपाली सय्यदचा जन्म मुंबईचाच. ती मुळची दिपाली भोसले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात त्या प्रमाणे अगदी चालायला लागल्यापासून दिपालीच्या पायात नृत्य आहे हे तिच्या घरच्यांनी ओळखल. ती तीन वर्षांची होती तेव्हापासून भरतनाट्यमच्या क्लासला घातलं.

कधीही स्टेजवर नाचायला न घाबरणारी दिपाली हळूहळू शाळेतल्या नाटुकली मध्ये अभिनय देखील करू लागली. स्पर्धा गाजवल्या. कॉलेजसाठी सुद्धा नालंदा विद्यापिठातून कथकलीमध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलं. तेव्हा पासूनच दिपालीच सगळी कडे नाव झालं. एकदा ती ज्या अॅक्टिंग स्कूल मध्ये अभिनय शिकायला गेली होती त्याच्या एका शो मध्ये शकील अहमदनी तिला पाहिलं आणि एका सिरीयलमध्ये अगदी छोटासा रोल दिला आणि अभिनयाचा दूर सुरु झाला.

दीपालीला एका मराठी सिरीयलमध्ये अगदी छोटासा रोल मिळाला होता.

एका दिवसाचा शुटींग होतं. पण दिपालीने तो अभिनय इतका जीव लावून केला की सिरीयल बनवणाऱ्यानी तिला सिरीयलची मुख्य हिरोईन बनवून टाकलं. मराठी मध्ये बंदिनी, दुर्वा अशा तिच्या कित्येक सिरीयल गाजला. तिचा चेहरा घराघरात पोहचला. 

पण याच काळात तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. तीच बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद नावाच्या नृत्यदिग्दर्शकावर प्रेम जडलं.

घरच्यांचा विरोध नव्हता. उलट वडिलांनी ख़ुशीखुशीत तीच लग्न लावून दिल. दिपाली भोसलेची सय्यद झाली. पण समाजाला हे कुठे मान्य होतं? पाहुण्यांनी ओळखीच्यांनी तिला खूप नावे ठेवली, आंतरधर्मीय लग्न करूनही तिला पाठीशी घातलं म्हणून वडिलांना खडे बोल सुनावले. मात्र कोणी काही म्हणो ते दिपालीच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे खंबीर उभे राहिले.

माहेर आणि सासर दोन्ही कडच्या सपोर्टमुळे दिपालीने अक्टिंगच करीयर सुरुच ठेवलं. याच काळात तिला सिनेमाची ऑफर देखील आली. मकरंद अनासपुरे यांच्यासोबतचा जाऊ तिथे खाऊ, संजय नार्वेकर यांच्यासोबत चष्मेबहादूर, भरत जाधव यांच्या सोबत लग्नाची वरात लंडनच्या दारात असे अनेक सिनेमे गाजले. पहिल्या सिनेमासाठी राज्यशासनाचा पुरस्कार सुद्धा मिळाला.

पण तिला खरी ओळख तिच्या नृत्याने मिळवून दिली. केदार शिंदेंच्या जत्रा या सिनेमामध्ये ये ग ये मैना या गाण्यात तिने केलेला आयटम डान्स अख्या महाराष्ट्रात गाजला. दिपालीने आतापर्यंत तीस सिनेमात काम केलंय. मराठी सोबतच तीनचार भोजपुरी सिनेमातही ती चमकली आहे.

२०१४ साली अचानक ती चर्चेत आली कारण आम आदमी पक्षाने तिला लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर येथून लढण्यासाठी तिकीट दिल.

अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून प्रसिद्ध झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची इमेज चांगली होती. सर्व ठिकाणी सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. अशा वेळी त्यांनी अण्णा हजारे ज्या अहमदनगरमध्ये राहतात तिथल्या मतदारसंघातून दिपालीसारख्या सिनेअभिनेत्रीला तिकीट दिले याबद्दल बरीच चर्चा झाली.

ऐन वेळी तिकीट मिळून प्रचार करायला जास्त वेळ न मिळाल्या मुळे व मोदी लाटेत दिपालीचा पराभव झाला. बाहेरून आलेली उमेदवार असा प्रचार झाल्यामुळे देखील तिची बाजू तोकडी पडली. यातच त्या मुस्लीम असल्यामुळे आघाडीच्या उमेदवाराची मते खाण्यासाठी उभ्या आहेत असा ही प्रचार झाला.

याच स्पष्टीकरण देताना दिपालीने,

” माझे आडनाव सय्यद असले, तरी मी पूर्वाश्रमीची भोसले आहे. निवडणूक काळात उगाचच जातीभेदाचे राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या सोबत सय्यद बंडा होता हे विसरू नये”

असे वक्तव्य केले. खरे तर सय्यद बंडा हा अफझल खानाचा अंगरक्षक होता, यामुळे दिपालीला बरेच ट्रोल करण्यात आले. राजकारणात नवखी असल्यामुळे दीपालीच्या चुका झाल्या.  मात्र त्यानंतर पाच वर्षे तिने जिल्ह्यात ठाण मांडून अनेक समाजोपयोगी कामे केली. गुंडेगाव या ठिकाणी वृद्ध व अनाथ मुलांसाठी आश्रम बनवलं. साकळाईचा पाणीप्रकल्प व्हावा यासाठी नेटाने लढा दिला.

२०१९ च्या लोकसभेला सुद्धा ती उभी राहील याची सगळ्यांना खात्री होती. पण अहमदनगरच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते असणार्या विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे काँग्रेससोडून भाजपमध्ये आले. त्यांना नगर दक्षिणचे तिकीट सुद्धा मिळाले. सुजय विखेनी दिपालीला बहिण मानून निवडणुकीला पाठिंबा मागितला.

पण निवडणुक झाल्यावर मात्र साकळाई उपसासिंचन योजनेवरून दोघांच्यात वाद झाले. ९ ऑगस्टला दिपालीने आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. या उपोषणाच्या वेळी आपली मैत्रीण जीवपणाला लावतेय हे पाहून सिनेअभिनेत्री मानसी नाईक हिच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. अखेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

सध्या दिपाली विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष आहे. युतीच्या वाटणीमध्ये श्रीगोंदाचं विधानसभेच तिकीट दिपालीला मिळाव यासाठी शिवसंग्राम प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली आणि सुजय यांच्यातील खडाजंगीने वेगळेच वळण लावले. 

सिनेमातील स्टार हे राजकारणात फक्त चमकोगिरीसाठी येतात हा गैरसमज दिपालीने गेल्या काही वर्षात खोटा ठरवला आहे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.