दादाचा टीशर्ट ते दीप्ती शर्माचा रनआऊट, इंग्लंडला प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तो यामुळे

बुमराहला दुखापत झाली, भारतीय संघानं आफ्रिकेला सहज हरवलं आणि पश्चिम विभागानं दुलिप ट्रॉफी जिंकली या झाल्या क्रिकेटमधल्या लेटेस्ट बातम्या. पण क्रिकेटविश्वात गेल्या काही आठवड्यांपासून एकच बातमी ट्रेंडिंगला आहे ती म्हणजे दीप्ती शर्माचा रनआऊट.

भारत विरुद्ध इंग्लंड मॅचमध्ये दीप्ती शर्मानं इंग्लंडच्या चार्ली डीनला नॉन स्ट्राइकिंग एन्डला रनआऊट केलं आणि भारतानं घासून सुरु असलेली मॅच जिंकत सिरीजही आपल्या नावावर केली.

दीप्तीनं केलेल्या रनआऊटवरुन मात्र चांगलाच वाद पेटला, एकतर ती मॅचची लास्ट विकेट होती, त्याच मॅचमुळं सिरीजचाही निकाल बदलला आणि इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचलेलं असताना हरलं.

हे सगळं घडलं २४ सप्टेंबरला, मात्र तेव्हापासून इंग्लंडच्या आजी-माजी प्लेअर्सनं जो गलका सुरू केला आहे, तो अजूनही थांबलेला नाही.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दीप्तीनं केलेला रनआऊट हा पूर्णपणे नियमात बसणारा होता. क्रिकेटचे नियम तयार करणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीनंही दीप्तीनं कुठलाच नियमबाह्य प्रकार केला नसल्याचं सांगितलं.

२०१९ मध्ये इंग्लंडनं वनडे वर्ल्डकप बाऊंड्री काऊंटच्या आधारे जिंकला होता. सुपर ओव्हरही टाय झाली, तेव्हा इंग्लंडनं जास्त बाउंड्रीज मारल्या आहेत या नियमाच्या आधारे त्यांना वर्ल्डकप विजेते म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

त्यावेळी नियमाचं गुणगान गाणारं इंग्लंड, दीप्तीनं केलेला रनआऊट नियमात बसत असून सुद्धा त्यावरुन टीका का करतंय, हेच पाहुयात.

प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विटमध्ये एक मुद्दा अधोरेखित केला, तो म्हणजे ‘अशा पद्धतीनं रनआऊट करणं हे चुकीचं असल्याचं इंग्लंडला वाटतं कारण त्यांनी बहुतांश क्रिकेट विश्वावर राज्य केलं आहे. ब्रिटिश राजवटही प्रचंड शक्तिशाली असल्यानं जर इंग्लंडनं एखाद्या गोष्टीला चुकीचं म्हणलं, तर इतर देशांनीही चुकीचंच म्हणायला हवं अशी त्यांची धारणा असते.’

आता याच मुद्याबाबत आणखी विस्तृतपणे बोलायचं झालं, तर आपल्याला यात तथ्य सापडतं. इंग्लंडला क्रिकेटचे जन्मदाते म्हणून ओळखलं जातं. सगळं जग जे क्रिकेटचे नियम फॉलो करतं ते सुद्धा इंग्लंडच्याच मेरिलिबोन क्रिकेटनं बनवले आहेत. त्यामुळं इंग्लंडला सुरुवातीपासूनच आपण म्हणू ती पूर्वदिशा हे म्हणायची सवय आहे, यात शंका नाही.

आता याचं एक मुख्य उदाहरण आपल्याला इतिहासात सापडतं..

२००२ मध्ये झालेली नॅटवेस्ट फायनल जिंकल्यावर भारताचा तेव्हाचा कॅप्टन सौरव गांगुलीनं लॉर्ड्सवरच टी शर्ट काढून फिरवला होता. तेव्हा इंग्लिश मीडिया असेल किंवा इंग्लिश प्लेअर्स यांनी गांगुलीवर प्रचंड टीका केली होती.

त्यांचं म्हणणं होतं की, ‘लॉर्ड्सच्या बाल्कनीत असं काही करायला नव्हतं पाहिजे. लॉर्ड्सला होम ऑफ क्रिकेट म्हणून ओळखतात.’

दादानं टी शर्ट काढून फिरवण्यामागचं खरं कारण वानखेडेवर इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफनं शर्ट भिरकावला होता. इंग्लिश मीडियाकडून प्रचंड टीका होऊनही दादानं काय माफी मागितली नाही. पण इंग्लिश मीडियाला किंवा प्लेअर्सला फ्लिंटॉफनं वानखेडेवर टीशर्ट काढला ही चूक वाटली नाही, त्यांना चूक वाटली ती फक्त गांगुलीची.

आता याच संदर्भात आत्ताचं उदाहरण पाहिलं,

तर दीप्ती शर्मानं मॅचनंतर सांगितलं की, बॉल टाकण्याआधीच क्रीझ सोडण्याबद्दल आम्ही चार्ली डीनला वॉर्निंग दिली होती, मात्र तरीही तिनं क्रीझ सोडणं चालूच ठेवलं आणि आम्हाला रनआऊट करण्याचा निर्णय घ्यावा लागला. इंग्लंडच्या टीमनं अशी कोणतीही वॉर्निंग न दिल्याचा दावा केला.

त्या मॅचमध्ये फ्रेया डेव्हिस आणि चार्ली डीन ही इंग्लंडची अखेरची जोडी मैदानात होती. चार्ली डीन चांगली बॅटिंग करत असल्यानं तिला जास्तीत जास्त वेळा स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती. यासाठी तिनं साहजिकच सिंगल कशा चोरता येतील यावर भर दिला.

याची आकडेवारी पाहिली तर, चार्ली डीननं आपल्या इनिंगमध्ये एकूण ७३ वेळा बॉलरनं बॉल टाकण्याआधी क्रीझ सोडली होती. यातल्या ७३ व्या वेळी दीप्तीनं रनअप थांबवून तिला रनआऊट केलं. बॉल टाकण्याआधी क्रीझ सोडण्यामुळं चार्लीला जो फायदा व्हायचा, त्याबद्दल इंग्लिश प्लेअर्सकडून काहीच बोललं गेलं नाही.

चार्लीनं नेमकी कितीवेळा आणि कधीकधी क्रीझ सोडली याची माहिती तुम्ही वर दिलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये पाहू शकता.

हर्षा भोगले यांनी या मुद्द्यावर बोलताना ‘इंग्लिश संस्कृतीचा’ उल्लेख केला होता. यावरुन इंग्लंडचा टेस्ट टीम कॅप्टन बेन स्टोक्सनं टीका केली.

त्यानं सुद्धा एक उदाहरण दिलं की, ‘आजही कित्येक भारतीय चाहते २०१९ च्या वर्ल्डकप विजयामुळं मला ट्रोल करतात, कित्त्येक मेसेजेस येतात याचा तुला त्रास होत नाही का ?’ आता हर्षा भोगले काय साधा माणूस नाही, त्यानंही स्टोक्सला पद्धतशीर उत्तर दिलं.

पण स्टोक्स इथं एक गोष्ट विसरला…

स्टोक्सला ट्रोल करणं हे १०० टक्के चुकीचंच आहे. पण ते ट्रोलर्स आहेत, ज्यांच्या मताचा फार फरक इतर लोकांवर पडत नाही. मात्र दीप्ती शर्माबद्दल ‘खेळाच्या स्पिरीटला धक्का पोहोचवला, ही जिंकण्याची पद्धत नाही,’ अशा गोष्टी इंग्लिश मीडिया आणि इंग्लिश प्लेअर्स बोलत आहेत, ज्यांच्यामध्ये ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्याची क्षमता आहे.

म्हणूनच दीप्तीनं केलेला रनआऊट पूर्णपणे नियमात बसत असला, तरी तिला टीकेला सामोरं जावं लागत आहे. जे वेस्ट इंडिजच्या किमो पॉल सोबतही झालं होतं आणि भारताच्या रविचंद्रन अश्विनसोबतही.

किंवा अगदी विनू मंकड यांच्यासोबतही.

त्यांनी केलेल्या रनआऊटमुळंच या अशा प्रकारच्या रनआऊटला मंकडींग हे नाव मिळालं, कित्येक वर्ष याबाबतचा नियम आयसीसीनं मान्य केला नव्हता. तेव्हा त्यासाठीचा लढा विनू मंकड यांच्या मुलानंच दिला होता. त्याबाबतची ‘बोल भिडू’ची स्टोरी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन वाचू शकता.

दीप्ती शर्मानं केलेला रनआऊट नियमात बसतो, तो एका मुलानं बापासाठी दिलेल्या लढ्यामुळं

दीप्तीवर एवढी टीका होतीये, याला भारतीय खेळाडूही काही प्रमाणात जबाबदार आहेच..

जागतिक क्रिकेटच्या आर्थिक नाड्या बीसीसीआय आणि भारताच्याच हातात आहेत, ते तर कुणी नाकारु शकत नाही. भारतीय खेळाडूंना मिळणारी लोकप्रियताही असामान्य आहे. मात्र अशावेळी सध्याचे भारतीय प्लेअर्स थोडी सबुरीचीच भूमिका घेतात. इंग्लंडच्या खेळाडूची बाजू घ्यायला इंग्लंडचे आजी-माजी प्लेअर्स उतरले. पण सध्या ऍक्टिव्ह असणाऱ्या भारतीय क्रिकेटर्सपैकी आश्विननंच प्रामुख्यानं दीप्तीची बाजू घेतली.

अशा रनआऊटनंतर अश्विनलाही टीका सोसावी लागली होती, तरीही तो दिप्तीला पाठिंबा देण्यात मागं हटला नाही. इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा रनआऊट पूर्णपणे नियमात बसत असला, तरी जोवर याच्याकडे ‘अखिलाडू वृत्ती’ म्हणून बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन बदलत नाही, तोवर तरी संस्कृती, ताकद आणि वर्चस्व या मुद्द्यांवरून वादही होणार आणि चर्चाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.