रशियाची लस भारतात येऊन १० दिवस झाले पण अजून जनतेपर्यंत पोहचली नाहीय…

भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. संक्रमितांचा आकडा वाढतच चाललाय, तर दुसरीकडे लसीकरण मोहीमही जोरदार सुरू आहे. 16 जानेवारी 2021 पासून सुरू झालेल्या या लसीकरण अभियानात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सीरम संस्थेनं बनविलेल्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला परवानगी देण्यात आली.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी दूसऱ्या टप्प्यात फ्रंट लहान वर्कर, तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना, त्यानंतर 45 वर्षावरील लोकांना या लसी देण्यात आल्या. ज्यानंतर आता 1 मे पासून लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे, तर अनेकांचा दूसरा डोस अद्याप बाकी आहे. या दरम्यान,लसींच्या तुटवडा जाणवू लागलाय, त्यातचं संसर्गाचे प्रमाण वाढल्याने सरकारने विदेशी लसींना देखील मान्यता देण्यात दिली आहे.

ज्यात सर्वात आधी नाव येतं रशियाच्या स्पुतनिक व्ही चं .

रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात म्हणजेच गालायम सेंटरने ही लस विकसित केली असून ती ९२ टक्के परिणामकारण असल्याचं म्हंटल जातं होतं. जगातल्या सगळ्यात सुरवातीला तयार झालेल्या लसींमध्ये स्पुटनिकचा समावेश होत होता.

देशातल्या अग्रगण्य फार्मा कंपन्यांत मोडल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅब  आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात या लसीबाबत करार झाला व भारतात या लसीचे ३० कोटी डोस तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

भारताला स्पुतनिक व्ही कोविड -19 लसची पहिली खेप मिळून आता 10 दिवस झालेत, तरीही रशियन-निर्मित लस सरकारच्या नियामक प्रक्रियेत अडकली आहे आणि ती मंजूर होण्यास किती काळ लागेल, याबाबतही काही स्पष्ट माहिती नाही.

एकीकडे भारत आपली राष्ट्रीय कोविड – 19 लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी धडपडत करतोय, तर दुसरीकडे लसींच्या डोसची कमतरता असल्याच्या तक्रारी राज्यांकडून मिळत आहेत. लसीकरणाचा पाचवा टप्पा सुरू होऊन दहा दिवस उलटून गेलेत. मात्र, केंद्राकडून लस मिळविण्यास उशीर झाल्यामुळे अनेक राज्यांनी 18 वर्षांवरील लसीकरण अद्याप पूर्णपणे सुरू केले नाही.

हिमाचल प्रदेशातील कसौली येथील देशातील सर्वोच्च टेस्टींग लॅब सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी (सीडीएल) येथे स्पुतनिक व्ही लसीची स्क्रीनिंग सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लसीची खेप याच आठवड्यात जाहीर केली जाईल. दरम्यान, लसीच्या क्षमतेवर होणारा परिणाम तपासण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. कारण 10 दिवसाच्या आत या चाचण्या पूर्ण करणे अशक्य आहे.

सीडीएलने 3 मे रोजी स्पुतनिक व्हीचे 100 नमुने घेतले होते आणि इतर घटकांव्यतिरिक्त ‘कार्यक्षमता, अॅलर्जी आणि प्रजननावर होणारा परिणाम’ या चाचण्या घेण्यात येत आहेत. देशाच्या औषध नियामक सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ज्याच्या अंतर्गत सीडीएल कार्यरत आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदारांना (लस उत्पादकांना) लसीची प्रत्येक बॅच सीओडीएल, कसौली येथे टेस्ट / रीलीज बंधनकारक असेल, त्यानंतरच कोविड 19 च्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत त्याचा वापर केला जाईल.

1 मे रोजी डॉ. रेड्डीज यांनी जाहीर केले की, स्पुतनिक व्ही लसीच्या दीड लाख डोसची पहिली खेप रशियाकडून हैदराबादला पोहोचली आहे. त्यानंतर कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, ‘आवश्यक मंजुरीनंतर ही खेप जारी केली जाईल. ज्याच्या तपासणीस काही दिवसांचा कालावधी लागेल, तसचं पुढच्या काही आठवड्यात दूसरी खेपही मिळणार असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, खेप कधी जाहीर होईल, याबाबत काहीचं स्पष्ट नाहीये.

सीडीएससीओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,

“पुढच्या बॅचपासून टेस्टींगचे नियमित चक्र विकसित होईल. जसे कोवॅक्सिन आणि कोविशिल्टच्या बाबतीत घडले. एक बॅच येताच दूसरी बॅच रीलीज केली जाते. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार जर सर्व काही ठीक झाले तर पुढील आठवड्यात ही लस बाजारात येईल.”

दरम्यान, रशियानंतर अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधून देखील लस आयात केली जाणार असल्याचं समजते. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 (NAGVAC ) या तज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सध्या लसींची मारामार सुरु आहे, अशात १८ ते ४४ या वयोगटांचं लसीकरण अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यात ज्यांच्या लसीचा दुसरा डॉस झालेला नाही अशाना देखील लस कमी पडत आहे. म्हणूनच सरकारने लाल फितीचा कारभार न करता तातडीने रशियन लस देखील उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.