खलिस्तानी म्हणून टीका होत होती पण मागे हटले नाहीत, आज विजय झाला
हे कसले शेतकरी, हे तर खलिस्तानवादी. यांना गोळ्या घाला.
मोकळी जागा दिसली की कमेंट मारायची ही आपली घाण सवय. एखादी गोष्ट संपूर्ण ऐकून घ्यावी, समजून घ्यावी याचा विचार आपण कधी करणार. शेतकऱ्यांनकडे टॅक्टर कसे असा प्रश्न विचारताना आपण ते पंजाबचे शेतकरी आहेत न की अल्पभूधारक याचा विचार करणार का..?
आज गुरुनानक जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली व आंदोलकांना घरी परतण्याचे आवाहन केले. जवळपास वर्षभर सुरू असलेल्या या आंदोलनाचा अखेर विजय झाला. आता या विजयाच क्रेडिट घ्यायला अनेकजण उतावीळ असतील मात्र आंदोलनाच्या सुरवातीपासून लढा देणारे नेते कोण होते ज्यांनी खलिस्तानी म्हणून टीका सहन केली पण आपला लढा ढिला होऊ नाही दिला.
प्रत्येक पगडी घालणारा व्यक्ती खलिस्तानसंबधीत असता तर कॉंग्रेसकडून तरी निदान मनमोहन सिंग पंतप्रधान झाले नसते, ना ही बॉर्डरमधल्या पिक्चरमध्ये सनी देओल दाखवला आहे ते खऱ्या आयुष्यातील मेजर चांदपुरी देशासाठी शहीद झाले असते.
असो लय लांबड लावण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सहभागी असणाऱ्या या पाच प्रमुख नेत्यांबद्दलची माहिती आपण घेवुया..
१) पहिल्या क्रमांकावर येणारे नेते आहेत बलबीर सिंह राजेवाल
ते किसान भारतीय युनियनचे संस्थापक आहेत. लुधियाना व परिसरात त्यांच्या शेतकरी संघटनेची ताकद आहे. त्यांच्या भागात असणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष राहिलेत आणि शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्यांच काम महत्वपुर्ण राहिलय.
विशेष म्हणजे ते स्वत: १२ वी पास आहेत, तरिही मुलांमध्ये शिक्षणाचे ज्योत पेटवण्याचं काम ते करतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टींच त्यांनी कधीही राजकारण केलेले नाही. ते स्वत: कधीही राजकारणात नव्हते आणि नाहीत. सध्या चालू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा डिमांड चार्टर मसुदा करण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका होती. म्हणूनच या माणसाला शेतकरी आंदोलनाचा थिंक टॅन्क समजलं जातय.
२) क्रमांक दोन वर आहेत जोगिंदर सिंह उगराहा..
जोगिंदर सिंह या आंदोलनाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आत्ता या माणसाला तुम्ही खलिस्तानवादी म्हणणार असला तर पहिलाच सांगतो भावांनो हे व्यक्ती भारतीय सैन्य दलातून रिटायर झाले आहेत. इथे बसून त्यांनी तारे तोडले नाहीत तर प्रत्यक्ष युद्धमैदानावर आपल कर्तृत्व सिद्ध केलय. संगलुर जिल्ह्यातील सुनाम शहरातून ते पुढे आले.
रिटायर झाल्यानंतर शेती करुन लागले व शेतकऱ्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देवू लागले.
२००२ मध्ये किसान युनियनची स्थापना केली. कोणीतरी काल परवा आलेला तो नेता नसून गेली २०-२५ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी लढणारे ते नेते आहेत. मालवा भागात त्यांच्या शेतकरी संघटनेची ताकद आहे.
३) तिसऱ्या क्रमांकावर आहेत, डॉ. दर्शनपाल
दर्शनपाल यांना सर्व संघटना एकत्र करुन त्यांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेय. ते स्वत: MBBS डॉक्टर आहेत. त्यानंतर ते सरकारी सेवेत होते. आत्ता गंम्मत सांगू का हा माणूस आरोग्य क्षेत्रात खाजगीकरण नसावं या मताचा आहे.
सरकारने लोकांना मोफत आरोग्य सेवा द्याव्यात हा त्यांचा हेतू आहे. म्हणूनच सरकारी दवाखान्यात या माणसाने आयुष्य घालवलं. कधीही खाजगी प्रॅक्टिस केली नाही. २००२ साली रिटायर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं.
४) चौथ्या क्रमांकावर आहेत जगमोहन सिंह
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात शिख विरोधी दंगली उसलल्या. त्यानंतरच्या काळात देखील अनेकजण खलिस्तानवादी झाले असतील. पण जनमोहन सिंह हे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते झाले. किसान युनियनच्या डकोंदा संघटनेचे ते नेते आहेत.
पंजाब मधील प्रमुख सन्माननीय नेत्यांपैकी ते एक समजले जातात. सर्वांनी एकत्र येवून लढावे हीच त्यांची विचारधारा राहिली आहे, म्हणूनच पंजाब, हरियाणा आणि युपीतील ३० हून अधिक शेतकरी संघटनांना एकत्र करण्यात त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे.
५) पाचव्या क्रमांकावर आहेत, सरवन सिंह पंधेर
सरवन सिंह हे किसान मजदूर संघर्ष समितीचे महासचिव आहेत. या संघटनेची स्थापना २००० साली करण्यात आलेली होती. पंजाब भागातील १० जिल्ह्यामध्ये ते सक्रिय आहेत. वय वर्ष ४२ असणारा हा माणूस शिक्षण झाल्या झाल्या शेतकऱ्यांच्या विषयी बोलू लागला.
बर तेव्हा केंद्रात सरकार कॉंग्रेसचे होते व ते कॉंग्रेस विरोधात बोलत होते. प्रश्न हा नव्हता की कोणते सरकार सत्तेत आहे, प्रश्न हा आहे की ते कोणासाठी बोलत आहेत.
तर मित्रांनो उगी आपलं हा खलिस्तानवादी तो खलिस्तानवादी करत बसण्यापेक्षा विषय समजून घ्या नाहीतर आपल्या न्याय मागण्यांसाठी उद्या तुम्ही आवाज उचललात तर पुढचा शिक्का तुमच्यासाठी असेल.
हे ही वाच भिडू
- दिल्लीतल्या आंदोलनात शेतकरी आहेत की खलिस्तानवादी..?
- महाराष्ट्राच्या शेतकरी नेत्याने कर्नाटकात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन उभारलं होतं.
- आंदोलनकर्त्यांना रोखण्याची ही टेक्निक शास्त्रीजींची देण आहे.
bhiduno ha lekh jya mansane lihla aahe tyana salam
मग हे सगळे दलालांची बाजु का घेत आहेत ?