दिल्लीच्या थंडीमुळे भारत पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनामध्ये युद्ध छेडल असतं !!

गोष्ट आहे साठच्या दशकातली.

अजून इंदिरा गांधीनी भारताच्या रॉ या गुप्तहेर संघटनेची स्थापना केली नव्हती. आंतरराष्ट्रीय हेरगिरीचं काम तेव्हा इंटेलिजन्स ब्युरो उर्फ आयबीकडे होतं. पाकिस्तानशी आपले संबंध तेव्हा सुद्धा चांगले नव्हते.

नुकतच ६५ सालच युद्ध होऊन गेल होतं. एकमेकांवर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवली जात होती.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना म्हणजेच आयएसआय आणि भारतीय आयबी याचं उंदीर मांजराप्रमाणे सख्य होतं. प्रत्येकवेळी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु असे. अशातच काहीवेळा विचित्र घटना देखील घडतात. अशीच एक घटना घडली होती दिल्लीमध्ये.

दिल्लीमध्ये पाकिस्तानी दूतावास आहे. या दुतावासात एक ऑफिसर होता. आयबीची पूर्ण खात्री होती कि तो साधा अधिकारी नाही तर तो आयएस आयचा हस्तक आहे. मग काय? त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली. त्याचे फोन टॅप केले होते.

काही ऑफिसर याच कामावर नेमले होते. तो अधिकारी कुठे जातो, कोणा कोणाला भेटतो याची खबर ठेवण्यात येत होते.

अस त्याकाळी दोन्ही देशात केले जाई. महत्वाची गुप्त बातमी आणण्यासाठी शत्रू देशात काही आपले हेर पेरलेले असायचे. पण जर हे हेर सापडले तर त्यांची धडगत नसायची. आयएसआयवाले तर सापडलेल्या हेराकडून माहिती काढून घेण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक द्यायची.

त्यामानाने भारतीय गुप्तहेर संघटना सभ्यता राखून होती, मात्र देशाच्या सुरक्षिततेसाठी असे लपून बसलेले उंदीर शोधून काढणे महत्वाचे असायचे.

जानेवारी महिना सुरु होता. नेहमीप्रमाणे दिल्लीच्या थंडीमध्ये आग पेटली होती. त्यातून त्यादिवशी प्रचंड मोठ्या धुक्याची रजई दिल्लीवर ओढली गेली होती.पण आयबीच्या ऑफिसर्सना आपली ड्युटी पार पडावी लागत होती.

संशयित आयएसआयचा अधिकारी संध्याकाळच्या वेळी आपली कार घेऊन डिनरसाठी बाहेर पडला.

आपल्या घरातून एका हॉटेलवर आला. तिथ कोणाशी तरी भेटला.  दरम्यानच्या काळात आयबीची टीमदेखील त्याच्यामागावरच होती. त्या दिवशी त्याच्या हालचाली खरोखर शंका घेण्यास्पद होत्या.

रात्री जेवण झाल्यावर तो निघाला. आता धुकं एवढ पसरल होतं कि अगदी काही फुटांवरच देखील दिसत नव्हत. तो आयएसएसवाला गुप्तहेर अगदी हळू कार चालवत होता. त्यामुळे मागून त्याला लक्षात येऊन नये म्हणून काही अंतर राखून येत असलेली आयबीची कार देखील अतिशय हळू चालली होती.

काहीवेळ असच सुरु राहील. काही वळणे घेतली गेली. आपण कुठे चाललो आहोत हे कोणालाच काही कळत नव्हत.

अचानक एके ठिकाणी आयएसआयवाल्याने आपली गाडी थांबवला. मागून येत असलेली आयबी ऑफिसर्सची कार देखील थांबली. तो आयएएसवाला काय करतोय याची उत्सुकता त्यांना लागली होती.

तो गाडीतून उतरला आणि मागे फिरुन आयबीवाल्यांच्या कारच्या दिशेने चालत निघाला. आता मात्र भारतीय ऑफिसरनां कळेना नेमक काय चाललय. तो आयएसआयवाला आला, त्याने कारच्या विंडो मधून आत पहिले आणि म्हणाला,

“चहा पिणार?”

मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. बाहेर पाहिलं तर त्यांची गाडी त्या अधिकाऱ्याच्या अगदी घरात कंपाऊंडच्या आत आली होती. धुक्यामुळे त्यांना कळलेच नव्हते. अतिशय लाजिरवाणा प्रसंग ओढवला होता. आयबीवाले रंगेहाथ पाकिस्तानच्या हातात सापडल्या सारखी स्थिती होती.

त्यांनी काहीतरी थातूर मातुर कारण देत तिथून पळ काढला.

फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये ही गोष्ट प्रचंड चर्चली गेली. दोन्ही देशांच्या गृह खात्याच्या प्रवक्त्यांनी एकमेकांवर मोठे मोठे आरोप केले. विशेषतः पाकिस्तान आक्रमक होता.

भारतीय हेर एका पाकिस्तानी दूतावासाच्या अधिकाऱ्याच्या घरात घुसतात याचा मोठा गजहब करण्यात आला.

आयएसआयने भारताला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असं सांगितल. काही दिवसात त्या संशयित माणसाला मात्र काही तरी कारण सांगून परत पाकिस्तानमध्ये बोलवून घेतल. त्याला त्याच्या अजागळपणाची शिक्षा दिली गेली.

हा किस्सा द कावबॉयज ऑफ रॉ या पुस्तकात माजी गुप्तहेर बी.रामन यांनी सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.