दिल्ली सरकारचा जुगाड डेंग्यूच्या रुग्णांसाठी कोविड राखीव बेडचा वापर

देशावर कोरोनाचं असलेलं सावट आता हळू- हळू कमी होत आहे. नवीन रुग्णांची संख्या खालावली असून रिकव्हरी रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण या दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि हे फक्त एक- दोन राज्यांपुरता मर्यादित नाहीत तर देशभरातल्या जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.

म्हणजे आपण राजधानी दिल्लीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या वर्षी १००० पेक्षा जास्त डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातली २८० प्रकरण गेल्या आठवड्यात नोंदवली गेली आहेत. तर गेल्या एका दिवसात सुमारे ७० नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. या आजारामुळे १८ ऑक्टोबरला दिल्लीत पहिला मृत्यू झाला होता. तर एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार जुलै २०२१ पासून आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूमुळे एकूण ६ मृत्यू झाले आहेत.

आता डेंग्यूच्या या वाढत्या संख्येमुळे बेडची कमतरता भासू लागलीये, सफरगंज रुग्णालयात वॉर्ड फुल झाले आहेत. आणि हीच अवस्था आरएमएल, एम्स, मॅक्स, गंगाराम सारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा आहे. ओपीडीमध्येही ५० टक्के रुग्ण डेंग्यूचे आहेत. एवढेच नाही तर यावेळी डेंग्यूचा डेन टू स्ट्रेन सक्रिय असून, तो सर्वात धोकादायक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

आता कोरोना रुग्णांप्रमाणं डेंग्यूच्या या वाढत्या रुग्णांच्या संख्येत बेडची कमतरता भासू नये. म्हणून दिल्ली सरकारने एक तोडगा काढला आहे. 

दिल्ली सरकारने म्हटले आहे की,

 रुग्णालयांना जर गरज पडली तरते ‘वेक्टर’-जनित आजारांनी ग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी कोरोनाव्हायरस रूग्णांसाठी राखीव असलेल्या एक तृतीयांश बेडचा वापर करू शकतात.

शुक्रवारी एका आदेशात म्हटले की,  डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने या रुग्णांसाठी खाटांची मागणी वाढली आहे. याशिवाय कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या अनेक खाटा कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे रिक्त आहेत.

त्यामुळे आरोग्य विभागाने दिल्लीतील सरकारी रुग्णालयांच्या वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षकांना कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या एक तृतीयांश खाटा, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू बेडसह वापरावे, असे निर्देश दिले आहेत.

आता तसं पाहायचं झालं तर डेंग्यूबाबत दिल्ली सरकार सक्रिय आहे. डेंग्यू रोखण्यासाठी स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणीची जबाबदारी तिन्ही एमसीडीची असली तरी डेंग्यूबाबत सरकारने आपल्या स्तरावर पाळत ठेवली आहे.  डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘दस हफ्ते, दस बाजे, दस मिनिट’ ही मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानीतील रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांसाठी राखीव असलेल्या १०,५९४ खाटांपैकी फक्त १६४ रुग्ण आहेत.

या दरम्यान, डेंग्यूच्या मृत्यूच्या संख्येबाबत काही धक्कादायक अहवालही समोर आले आहेत, एका एक्सपर्ट पॅनलने ५ नवीन मृतांच्या आकड्याचा खुलासा केलाय. सोबतच आकडेवारीनुसार, डेंग्यूच्या ३०३ रुग्णांची माहिती एमसीडीकडे नाही. त्याच वेळी, ५९७  प्रकरणे दिल्लीबाहेरची आहेत. म्हणजे एकूण  रुग्णाच्या जवळपास २५ टक्के. 

पॅनेलच्या म्हणण्यानुसार, रुग्णाच्या मृत्यूची वेळ, ठिकाण आणि इतर अनेक गोष्टींचा तपशील आल्यानंतर तपास केला जाईल. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.